Login

ओळखीचे शब्द...! | भाग ३१

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ३१

सुलेखा

१६५० चा काळ.

रात्री शय्येवर पडून मला कधी झोप लागली, समजलेच नाही. आता सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने माझे डोळे उघडले. बाहेर अजूनही उजाडले नव्हते. आज ह्या आठवड्यातील पहिला शिकवणीचा दिवस होता. मी कवींना भेटायला उत्सुक्त होते. पण, ते देखील असतील का? ते आज शिकवणीसाठी येतील ना?

मला काहीच समजत नाही आहे. माझ्या कविता वाचून त्यांना काय वाटले असेल? ते नीट बोलतील ना माझ्याशी? त्यांनी ह्या बद्दल महाराजांना सांगितले तर? तर, माझं काही खरं नाही. पण, ते असं नाही करणार. ते अतिशय साधे भोळे आहेत. आणि मुख्य म्हणजे ते माझ्याकडे पाहताना मी त्यांना पाहिले आहे. त्यांच्या त्या नजरेत वेगळीच आपुलकी असते. पण, तरीही त्यांच्या मनात काय असेल कोण जाणे? काहीच कळायला मार्ग नाही.

मी माझी तयारी करत असताना एका सेविकेला कवींना शिकवणी कक्षात येण्यासाठी निरोप द्यायला सांगितला. त्यांना येऊदेत म्हणजे झालं. मी हवं तर माफी मागीन त्यांची. हे काय बोलतेय मी? मी राजकुमारी आहे, ह्या राज्याची हे मी खरच विसरली आहे का? आज दर्पणात मी नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहे. हल्ली मी स्वतःला आवडू लागली आहे. त्यात आज मी माझे केस मोकळे सोडून ठेवले आहेत. आणि असेच ठेवणार आहे ते असे जास्त सुंदर दिसतात.

मी स्वतःला निरखून पाहत असताना दारात सेविका निरोप घेऊन आली. ' कवी थोड्याच वेळात येतो म्हणालेत.' येतील ना ते नक्की? तिला जाण्यास सांगून मी शिकवणी कक्षाकडे जाण्यासाठी निघाले. मनातले विचार आणि भीती जाता जात नव्हती. शिकवणी कक्षाबाहेर उभे असलेले सैनिकांना मी मुद्दाम काही तरी कामे सांगून तिथून जाण्यास सांगितले.

आता तिथे नजरेत पडेल असं जवळ पास कोणी नव्हतं. मी मग कक्षात प्रवेश केला. माझ्यासोबत मी लावलेल्या अत्तराचा सुगंध देखील आत आला. माझा सुगंध आज मलाच मोहित करत होता. कवी अजून तरी तिथे आले नव्हते. मला आता ते येतील की नाही ह्याची आणखीन भीती वाटू लागली.

मनाचं समाधान करायला आणि मोकळा श्वास घ्यायला मी समोरच्या खिडकी जवळ जाऊन उभी राहिले. मागे माझे लांब सुंदर केस मोकळे सोडले. मन आणि डोकं शांत करून मी समोरचे मनमोहक दृश्य पाहू लागले. ते पाहताना माझे संपूर्ण भान हरपून गेले. तो क्षितिजा आडून वर येणार सूर्य हळू हळू वर येताना किती सुंदर दिसत होता.

प्रेमाचं ही काहीसं असंच असतं ना? ते देखील ह्या सूर्याप्रमाणे उगवले की, संपूर्ण तन, मन उजळवून टाकतं. पण हे असं कधी कसं होतं आपल्याला काहीच कळत नाही. फक्त एका गोष्टीत प्रेमाचं आणि सूर्याचं वेगळं असतं ते म्हणजे अस्ताला जाणं.

निसर्गाच्या नियमानुसार सूर्याला रोज अस्ताला जावं लागत. पण , प्रेमाचं असं नसतं. ते कधीच अस्ताला जात नसतं. ते उलट रोज नव्याने आणखीन वाढत उजळत असतं. हे काय विचार करतेय मी? वाह... कवींची सवय लागली वाटतं? विचार करता करता मी स्वतःशीच हसले.

" मोकळ्या कुंतलांचा सुगंध वेड लावे मनाला,
तेजस्वी काया लाजवे आकाशातल्या सूर्याला."

मी स्मित करत असतानाच माझ्या कानावर कवींच्या गोड आवाजात ह्या दोन ओळी पडल्या आणि मी तशीच स्मित करत मागे फिरले. मागे माझ्या काही अंतरावर कवी उभे होते. ते अगदी प्रसन्न दिसत होते. ते एकटक माझ्याकडे पाहत होते. त्यांची ते नजर सगळ काही सांगत होती.

मी हळू हळू पावले टाकत त्यांच्या जवळ जाऊ लागले. चालताना माझ्या पैंजणांचा आवाज येऊ लागला. आज मी मुद्दाम त्यांच्या समोर पैंजण घातले होते. पैंजणांचा आवाज येताच ते माझ्या पावलांकडे पाहू लागले. त्यांना आता नक्कीच स्पष्ट झाले होते की, त्या दोन ओळी लिहिणारी मीच आहे.

त्यांच्या जवळ पोहोचून मी त्यांना काय म्हणालेत ते विचारले. मी ते स्पष्टच ऐकले होते. पण मला त्या माझ्या प्रशंसेकरिता म्हटलेल्या ओळी पुन्हा ऐकण्याची इच्छा होती.

त्यांना वाटले मी त्यांच्यावर रागावले म्हणून ते माफी मागू लागले. त्यावर मीच त्यांना कसं सांगू? की, मला आवडल्या आणि मला त्या ओळी पुन्हा ऐकायला आवडतील.

" मोकळ्या कुंतलांचा सुगंध वेड लावे मनाला,
तेजस्वी काया लाजवे आकाशातल्या सूर्याला."

ते त्या ओळी पुन्हा म्हणाले, आणि चेहऱ्यावर गोड स्मित आणून माझ्या सुंदर दिसण्याची प्रशंसा करू लागले. त्यांच्या त्या बोलण्याने माझे मन मोहून गेले. मी माझी राहिले नाही. मी अतिशय प्रेम भरल्या नजरेने त्यांच्या नजरेत पाहू लागले. त्यांच्या नजरेत देखील मला तेच दिसत होते. आम्ही दोघे एकमेकांच्या आणखीन जवळ आलो आणि आमच्या नकळतच एकमेकांचे हात हातात घेतले.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all