Login

ओळखीचे शब्द...! | भाग ३४

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ३४

अदिती

२०१५ चा काळ मुंबई.

वेदांशना विचारण्यासाठी प्रश्न तयार करून झाल्यावर मी कॉम्प्युटरवर फेसबुक चालू केलं. विचार केला संध्याकाळ आधी पुन्हा एकदा भेटण्याचं त्यांच्याशी नक्की करून घ्यावं. फेसबुक चालू करून दुसरं काही न करता मी त्यांना मॅसेज केला. पुढील मिनिटात त्यांनी मॅसेज बघितला. ते बहुतेक फोन मध्ये फेसबुक वापरत असावेत. पुढील थोडा वेळ बोलून पुन्हा एकदा भेटण्याचं आमचं नक्की झालं.

अजून तरी आम्ही एकमेकांना फोन नंबर दिले नव्हते. मला ही ते समोरून विचारायला कसे तरी वाटत होते. म्हणून मी लाल रंगाचा ड्रेस घालून येणार असल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी ही ते काळया रंगाचे शर्ट घालणार असल्याचं सांगितलं. लाल आणि काळ्याचे कॉम्बिनेशन वाह भारीच. उगाच माझ्या डोक्यात काही विचार आला आणि मी स्वतःशीच हसले. भेटण्याचं एकदा शेवटच नक्की करून मग मी कॉम्प्युटर बंद केला.

संध्याकाळ होताच आई तिच्या मैत्रिणीकडे निघून गेली. ' बरं झालं.' मी मनातल्या मनात म्हटलं. आई घराबाहेर पडताच मी तयारी करायला घेतली. ठरल्या प्रमाणे मी कपाटातून माझा आवडता लाल रंगाचा ड्रेस काढला. तो ड्रेस घालून आज बऱ्याच दिवसांनी माहित नाही का? पण छान तयार झाली. केस मात्र आज मोकळे सोडले. माहित नाही का? पण, असंच मन झालं. मी अशी केस मोकळे सोडून कधी जास्त बाहेर पडत नसे. पण आज माझं मन काही तरी वेगळंच वागत होतं. ते माझ्याही समजण्या पलीकडचे होते.

तयारी करून झाल्यावर मी घरातून बाहेर पडले. रिक्षा पकडून स्टेशनला आले. तिथून ट्रेनने गोरेगावला पोहोचले आणि कॅफेसाठी रिक्षा पकडली. रिक्षात बसल्यावर माझे काळीज अचानक धडधडू लागले. हे काय होत आहे माझे मलाच समजत नव्हते. कशी असेल आमची पहिली भेट काय माहित.

विचार करता करता रिक्षा कॅफेसमोर पोहोचली. मला पाच मिनिटे उशीरच झाला होता. रिक्षातून उतरण्याआधी मी एक दीर्घ श्वास घेतला. मग उतरून रिक्षाचे पैसे देऊन मी कॅफे मध्ये प्रवेश केला.

वाह... आत शिरताच ते कॅफे बघून मुखातून शब्द बाहेर पडला. मी आजूबाजूला कोणी काळया रंगाचा शर्ट घेतलेलं कोणी दिसत आहे का पाहू लागले. बहुतेक ते अजून आले नव्हते.

" येस मॅडम या ना बसा, आपल्याला काय हवंय?"
मी उभी राहून विचार करत असताना एका वेटरने येऊन मला प्रश्न केला.

" अ... मी एका सरांना भेटायला आलेय. इथे कोणी काळया रंगाचे शर्ट घातलेले व्यक्ती आले होते का?"
मी वेटरला प्रश्न केला.

" हा, एक सर इथे आले तर होते. ते इथून फेरी मारून मग कॅफेच्या वरच्या बाजूला गेले. ' मॅडम आल्यावर ऑर्डर देतो' म्हणाले. बहुतेक ते तुमचीच वाट बघत असावेत."
थोडा विचार करून त्याने उत्तर दिले आणि मला वरच्या बाजूला जाण्यासाठी पायऱ्या दाखवल्या.

मी त्याचे आभार मानून हळू हळू पायऱ्या चढत वर जाऊ लागले. माझ्या हृदयात होणारी घालमेल मलाच समजत नव्हती. मी वर पोहोचताच समोर पाहिले तर, ते पाठमोरे उभे होते.

तेच असावेत ते, कारण त्यांच्या शिवाय तिथे कोणी नव्हते. आणि त्यांनीच काळया रंगाचे शर्ट घातले आहे. ते समोर मावळतीला जाणाऱ्या सूर्याला पाहण्यात मग्न होते. आणि मी त्यांना. हा क्षण या आधी कधी घडून गेला आहे असे मनाला वाटत होते. पण कधी? मी तर आज त्यांना पहिल्यांदाच भेटत आहे.

लगेच भानावर येत मी हळू हळू पावले पुढे टाकली. आणि चालत त्यांच्या जवळ पोहोचले. त्यांना त्यांच्या नावाने हाक मारली. माझ्या बोलण्याने ते भानावर आले.

त्यांनी मागे वळून माझ्याकडे पाहिले आणि ते एकटक मला पाहतच राहिले. त्यांच्या त्या नजरेने मला लाजायला झाले. आमच्या दोघांची ओळख पटली. मग आम्ही बाजूला असलेल्या टेबलवर समोरासमोर बसलो.

मी खुर्चीवर सावरून बसले. बसल्यावर माझे मोकळे केस हळूच एका बाजूला करून पुढे घेतले. मी बसलेल्या जागेवरून ते बघत असलेले सुंदर सूर्य मावळतीचे दृश्य मला दिसत होते.

" किती सुंदर दृश्य आहे नाही? खरंच मावळत असला तरी सूर्य त्याच्या किरणांनी संपूर्ण आसमंत उजळवून टाकतो. किती तरी रंगांच्या छटा उमटवतो. खरंच निसर्गाच्या सौंदर्याला तोड नाही."
मी समोरच दृश्य पाहत म्हणले.

" हो ना खरंच पण काही सौंदर्य असे असते की ज्या पुढे निसर्गाचे सौंदर्य देखील फिके वाटते."
ते माझ्याकडे बघून गोड स्मित करत म्हणाले.

मी त्यांच्याकडे बघत हलकेच स्मित केले. त्यांचे बोलणे देखील त्यांच्या कवितांसारखे सुंदर आणि गोड होते. इतक्यात वेटर आमची ऑर्डर घेण्यासाठी आला.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all