Login

ओळखीचे शब्द...! | भाग ३७

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ३७

शाश्वतवर्ण

१६५० चा काळ.

" नाही राजकुमारी... मला तुम्ही..."
मी खिडकीतून बाहेर पाहत त्यांना म्हणालो. मी ते वाक्य पूर्ण ही करू शकलो नाही.

" हेच इथे माझ्या नजरेत पाहून सांगा..."
राजकुमारी माझ्याकडे पाहत म्हणाल्या.

ही गोष्ट मी त्यांच्याकडे पाहून बोलू शकत नव्हतो हे मला चांगलंच माहित होतं. मी काहीच न बोलता तसाच बाहेर शून्यात बघत राहिलो. काय बोलावे, मला समजत नव्हते. त्यांनी त्यांच्या मनातले सगळे काही मला सांगितले होते. पण मी हे त्यांना सांगू शकत नव्हतो. सांगू तरी कोणत्या तोंडाने? त्या राजकुमारी आहेत, त्या काही बोलू शकतात. पण, मी... मी... एक त्यांच्या दरबारातला एक साधा कवी आहे. मला माझ्या मर्यादा ओळखून वागायला हवे. जरी मनात काही असले तरी ते मनातच ठेवायला हवे. जर हे महाराजांपर्यंत पोहोचले तर, त्याचा परिणाम काय होईल ह्याचा मी विचार ही करू शकत नाही.

" कसला विचार करताय कविराज? मला माझे उत्तर हवे आहे, ते ही आत्ताच. जर मी तुम्हाला नसेल आवडत तर ते माझ्या नजरेत बघून सांगा मगच मी ते मान्य करीन."
राजकुमारी मला बजावून म्हणाल्या.

राजकुमारी हट्टाला पेटल्या होत्या. पण, किती ही काही झालं तरी मी त्यांच्याकडे त्यांच्या त्या सुंदर नजरेत पाहून खोटं बोलू शकणार नव्हतो. आणि हे त्यांना चांगलेच माहित होतं. मी तसाच मान खाली घालून उभा राहिलो. त्या माझ्या बाजूने हलायला तयार नव्हत्या. मी अतिशय बिकट परिस्थितीत फसून गेलो. काही वेळापूर्वी जे झालं ते फार चुकीचे झाले असे मनाला वाटू लागले. किती ही केलं तरी माझ्या मनातलं माझ्या ओठांवर येत नव्हतं. ते येणं देखील शक्य नव्हतं. हे राजकुमारींनी समजायला हवे होते. त्यांनी मला पेचात अडकवले आहे. त्यांच्या नजरेत न बघता ही मला त्यांची ती नजर जाणवत होती. त्यांची नजर माझ्यावरून हलत नव्हती.

" राजकुमारी जे झालं त्यासाठी मी माफी मागतो. आपण हा विषय पुढे नको वाढवूया. आपण तुमच्या कवितांच्या शिकवणीकडे लक्ष देऊ."
थोडीशी हिंमत करून मी तशीच मान खाली करून त्यांना म्हणालो.

" हे माझं उत्तर नाही आहे कविराज. मला माझे उत्तर हवे आहे. आणि तरच मी तुमच्याकडून पुढे कविता शिकेन. अथवा आपण ही शिकवणी थांबवूया. जोवर मला हवं तसं माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोवर माझं शिकवणीत मन देखील लागणार नाही."
बोलताना त्या काहीशा हळव्या झाल्याचं त्यांच्या आवाजावरून मला जाणवलं.

त्या ऐकतील तर राजकुमारी कसल्या. त्यांच्या मधुर आवाजातली ती विनवणी खूप गोड वाटत होती. पण, ते मला नको होतं.

" हृदयात सख्या तुझ्या, दडली काय अशी भावना?
आसुसले मन माझे ऐकण्यास एकदा तरी सांगना."

त्यांनी लगेच कवितेच्या दोन ओळीत त्यांच्या भावना मांडल्या. त्या कानावर पडताच मी लगेच त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत पहिले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा अश्रूंनी भरल्या होत्या. त्या केविलवाण्या नजरेने एकटक माझ्याकडे पाहत उत्तराची वाट पाहत होत्या.

त्यांच्या त्या सुंदर खोल नजरेत पाहून शेवटी मला जे वाटलं होतं तेच झालं. मी त्यात पुन्हा हरवून गेलो. मला हेच नको होतं. म्हणून मी त्यांच्या नजरेत पाहणे टाळत होतो. त्यांच्या नजरेने आता पूर्णपणे माझ्या हृदयाचा ताबा घेतला. आता माझे हृदय माझ्या ताब्यात राहिले नव्हते. मी त्यांच्या खोल नजरेत स्वतःला पूर्णपणे हरवून बसलो. आता माझ्या मनातले शब्द माझ्या ओठांवर आपसुक उमटणार होते.

" राजकुमारी, झाली का तुमची शिकवणी? महाराणींनी तुम्हाला बोलावणे धाडले आहे. त्यांचे तुमच्याकडे काही तरी महत्वाचे काम आहे. कोणी सेवक जवळ पास दिसला नाही म्हणून मी स्वतः तुम्हाला निरोप द्यायला आलो. म्हटलं तेवढेच तुमचे दर्शन होईल. आज काल तुम्ही शिकवणीत व्यस्त असल्यामुळे तुमचे दर्शन फार कमी घडते."
माझ्या ओठांमधून शब्द बाहेर पडणार इतक्यात दारातून सेनापती अंगेश आत येऊन राजकुमारींना म्हणाला.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all