Login

ओळखीचे शब्द...! | भाग ४०

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ४०

वेदांश

२०१५ चा काळ मुंबई.

कॅफेच्या इथून अदितीला रिक्षात बसवून मग मी घरी जायला निघालो. येताना काही ट्रॅफिक चुकवू शकलो नाही. कसा बसा ट्रॅफिक पार करून आईने सांगितलेले काही समान घेऊन मी बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. बाईक पार्किंगमध्ये उभी करून मी घरी जाण्यासाठी निघालो. पायऱ्या चढत असताना मला फोनचा आवाज आला. बाहेर काढून बघितलं तर त्यावर अदितीचा घरी पोहोचल्याचा मॅसेज होता. मीच तिला तो करायला सांगितला होता. मग तिच्या मेसेजेला ओके म्हणून रिप्लाय देऊन मी घरी पोहोचलो.

घरी पोहोचून फ्रेश होऊन चहा घेत आई सोबत गप्पा मारल्या. तिला आजच्या भेटी बद्दल सांगितले. उद्या सकाळी लवकरच बाहेर जायचं असल्याबद्दल देखील सांगितले. मग ती तिच्या कामाला लागली.

मी सहज बसून आजच्या भेटी बद्दल विचार करत असताना पुन्हा मला अदितीचा मॅसेज आला. मी फोन हातात घेऊन तो उघडून बघितला.

अदिती : मी मीनाक्षी सोबत बोलले. सकाळी सात वाजता आपल्याला बोरीवली बस डेपो वरून तिथे जायला बस मिळेल.

मी : अच्छा, चालेल मग मी पण सकाळी तिथेच बस डेपोवर भेटीन तुम्हाला. निघालीस की मला फोन किंवा मॅसेज कर.

अदिती : हो चालेल. भेटूया मग सकाळी. जेवण झालं का तुमचं?

उद्याच भेटायचं ठरवून मग मेसेजवरच आमच्या आणखीन थोड्या गप्पा झाल्या. आम्ही एकमेकांच्या घरच्यांबद्दल जाणून घेतले. आमच्या घरी मी आणि आई आम्ही दोघेच राहत असल्याचे तिला सांगितले. मग तिने माझ्या बाबांबद्दल विचारपूस केली. ते आम्हाला सोडून गेल्याच तिला सांगितले. त्या बद्दल तिला वाईट वाटल्याचे तिने सांगितले.

मग पुढे तिने तिच्या परिवाराबद्दल देखील मला सांगितले. आम्ही दोघे आता छान मोकळे पणाने बोलू लागलो होतो. तिने सांगितले की, तिची आई तिला लहान असतानाच सोडून गेली. आता आहे ती तिची सावत्र आई आहे. जी तिचा खूप राग राग करते. कारण तिच्या बाबांनी त्यांना दुसरं मुलं होऊ दिलं नव्हतं. त्यांनी अदितीसाठीच तिच्याशी लग्न केलं होतं. तिच्या बाबांचा तिच्यावर खूप जीव होता, पण ते कामानिमित्त बाहेर असल्यामुळे तिला आईची माया मिळावी म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं. पण ते फसलं होतं. अदितीला तिच्याकडून कधीच आईची माया मिळाली नाही. तिने सगळं आपुलकीने मला सांगितलं. एका भेटीतच आम्ही बरेच जवळ आलो.

मग काही वेळाने आम्ही सकाळी भेटूया म्हणून एकमेकांचा निरोप घेतला. आज मला कोण जाणे का? पण, खूप छान वाटत होतं. हे तिला भेटल्या मुळे असावं का? काय माहित. चला, जेऊन  झोपूया लवकर सकाळी लवकर उठावं लागेल. जेवण वगैरे आवरून मी सकाळसाठी माझी बॅग तयार करून लवकर झोपी गेलो. सकाळी मला कसलीच गडबड नको होती.

सकाळचा गजर वाजल्यावर मी लगेच उठलो. उठून बरोबर वेळेत माझी तयारी आवरली. मला कुठे जायचं म्हणजे माझी माझ्या आधी उठून माझ्यासाठी चहा नाष्टा करून तयार होती. सोबत मला तिथे खायला म्हणून एक डब्बा देखील भरून ठेवला. माझी आई म्हणजे खरंच ग्रेट आहे. 

मी नाष्टा करत असताना मला अदितीचा मॅसेज आला. तिने ती निघाली असल्याचं मला कळवलं. मी मग नाष्टा करून डब्बा बॅग मध्ये भरला आणि मग आईचा निरोप घेऊन बस डेपो मध्ये जाण्यासाठी निघालो. आज बाईक सोबत न घेता मी रिक्षाने बस डेपो जवळ पोहोचलो. आणि तिथे जाऊन बसची माहिती घेऊ लागलो.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all