दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ४१
शाश्वतवर्ण
१६५० चा काळ.
रात्री बागेत भेटायचं सांगून राजकुमारी तश्याच निघून गेल्या. त्या बाहेर गेल्यापासून मी किती तरी वेळ तिथे तसाच स्तब्ध उभा होतो. काय करावे मला समजत नव्हते. मी त्यांच्या त्या डोळ्यांमध्ये हरवून माझ्या मनातलं बोलणारच होतो. तितक्यात नशीब कोठून सेनापती अंगेश आले. आणि जर मी माझ्या मनातलं राजकुमारींना बोलताना त्यांनी ऐकलं असतं तर? काय घडलं असतं ह्याचा मी विचार ही करू शकत नाही. तिथून निघून मी माझ्या घरात येऊन असाच विचार करत बसून आहे.
सकाळी घडलेल्या गोष्टीमुळे कशातच मन लागत नाही आहे. सारखा तो घडलेला गोड क्षण डोळ्यांसमोर येतोय आणि मग सगळंच थांबून जातं. विचार करता करता संध्याकाळ झाली मी खिडकीतच बसून राहिलो. विचार करता करता मला काही तरी आठवलं आणि मी महालाच्या दिशेला मान वळवून पाहिले. तिथे एका खिडकीतून राजकुमारी माझ्या दिशेला पाहत असलेल्या मला दिसल्या. तश्याच मोकळ्या केसांमध्ये. सगळे केस एका बाजूने पुढे करून हळूच आपल्या सुंदर केसांवरून हात फिरवत माझ्याकडे स्मित करत पाहत होत्या.
त्यांना तसं बघून मला अचानक त्यांच्या त्या सुंदर मोकळ्या केसांचा सुगंध आठवला. आताही मला तो सुगंध जाणवू लागला. जणू त्या सुगंधाचा ठसा माझ्या मनातच उमटला होता. त्या खरंच खूप सुंदर आहेत. त्यांच्या सौंदर्याला सीमा नाही.
मला ही त्या पाहताच क्षणी आवडू लागल्या होत्या, पण मी हे त्यांच्या समोर कसं कबूल करू. त्या ही नुसता वेडा हट्टा धरून बसल्या आहेत. रात्री मी भेटून त्यांना काय सांगणार आहे?
त्या आधी मी रात्री जाऊ की, नको? हाच विचार करतोय. ते तलाव बागेत असले तरी महालापासून खूप लांब आहे. महालाला लागून असलेली बाग किती तरी दूरवर पसरलेली आहे. तिथेच बागेच्या शेवटी भरपूर झाडांच्या मध्ये एक सुंदर तलाव आहे. तिथे जनावरांच्या भीतीने दिवसा जास्त कोणी जात नाही तर रात्रीचा प्रश्च येत नाही.
त्यांना कसली भीती नाही का वाटत? कसलीच भीती नाही त्यांच्या मनात. मनातलं सगळं सांगून मोकळ्या झाल्या. आणि सोबतच मला ही माझ्या मनातले सांगायला भाग पाडत आहेत. मी कसं आणि काय बोलणार त्यांच्या समोर? त्या ह्या राज्याच्या राजकुमारी आहेत. जरी मी त्यांना माझ्या मनातलं सांगितलं तरी पुढे काय होणार आहे?
मला वाटतंय रात्री मी तिथे नको जायला. उगाच नको ते घडण्याच्या आधी आम्हाला आमच्या भावनांवर आवर घालायला हवा, पण त्या म्हणाल्या की, जर मी नाही आलो तर त्या मला पुन्हा कधीच दिसणार नाहीत. हे मला चालेल का?
नाही, मला देखील सवय झाली आहे त्यांची, त्यांचा सहवास आवडू लागला आहे. त्या दिसणार नाहीत म्हणजे शिकवणी बंद करतील. काही भेटीतच आम्ही बरेच जवळ आलो आहोत. मला त्यांच्या शिवाय रहावणार नाही, पण जर मी त्यांच्या समोर गेलो तर त्यांच्या सहवासात जाताच माझ्या मनातलं माझ्या नकळत मी त्यांना सगळं सांगून टाकीन हे नक्की.
काय करू? काहीच समजत नाही आहे. राजकुमारींनी मला अतिशय कठीण परिस्थितीत अडकवलं आहे. त्या अजून ही खिडकीतून त्याच प्रेम भरल्या नजरेने माझ्या दिशेला पाहत आहेत.
" राजकुमारी आवरा स्वतःला..."
मी त्यांच्याकडे पाहत मनाशी म्हणालो आणि खिडकीतून मागे सरकलो.
मी त्यांच्याकडे पाहत मनाशी म्हणालो आणि खिडकीतून मागे सरकलो.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा