Login

ओळखीचे शब्द...! | भाग ४२

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ४२

अदिती

२०१५ चा काळ मुंबई.

मी सकाळी लवकरच रिक्षाने बस डेपो बाहेर पोहोचले. ते बहुतेक आलेच असणार. त्यांना वेळेत पोहोचायची सवय आहे हे आमच्या पहिल्या भेटीतच कळले. मी बस डेपोच्या आत जाऊन त्यांचा शोध घेऊ लागले. तेव्हा मला डेपोच्या काउंटर जवळ ते उभे असलेले दिसले. आज त्यांनी टीशर्ट जीन्स घातली होती खूप छान दिसत होते ते.

अरे, त्यांना बघताच माझ्या मनात हे कसले वेडे विचार. खरंच काही खरं नाही माझं. चला बिचारे कधीचे येऊन उभे राहिले असतील काय माहित? मी चालत त्यांच्या जवळ पोहोचले.

" हाय, सॉरी मला उशीर तर नाही झाला ना?"
त्यांच्या जवळ पोहोचून मी त्यांना स्मित करत म्हणाले.

मला समोर बघताच ते एकटक माझ्याकडे बघतच राहिले. त्यांचं हे असं बघणं मला खरंच लाजवतंय. मला बघण्याच्या नादात त्यांनी मी विचारलेला प्रश्न देखील ऐकला नाही वाटतं, पण इतकं काय आहे बघण्यासारखं माझ्यात? आज मी पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. काही जास्त तयारी देखील केली नाही नेहमीची एक छोटी टिकली आणि बस. काय माहित खरी सौंदर्याची व्याख्या कवींनाच माहीत.

" अहो, वेदांश... उशीर तर नाही झाला ना मला?"
मी मुद्दाम पुन्हा त्यांना म्हणाले. त्याने ते भानावर आले.

" आ... नाही, मी देखील आत्ताच आलोय. येऊन बस बद्दल विचारलं. ते म्हणाले ही समोरची बस गेल्यावर आपली बस येईल."
ते स्मित करत मला म्हणाले. बोलताना माझ्या चेहऱ्यावरची त्यांची नजर काही हटत नव्हती.

" अच्छा चालेल."
मी चेहऱ्यावर आलेली केसांची बट कानामागे करत म्हणाले.

" खूप सुंदर दिसतेस आज..."
अचानक बहुतेक त्यांच्या देखील नकळत त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले.

" थँक्यू..."
माझ्या मनाच्या खोलवर गेलेले ते शब्द ऐकून मी आभार मानले.

" पण हे काय? तू एकटीच म्हणजे तुझी मैत्रीण सुद्धा येणार होती ना? मागून येतेय का?"
त्यांनी मला प्रश्न विचारला.

" नाही ती नाही येत आहे. तिला अचानक कसले तरी काम आले म्हणून तिने येणं रद्द केलं. आपलं ठरलं होतं म्हणून म्हटलं आपण जाऊन येऊ."
मी त्यांना म्हणाले.

" काही हरकत नाही. असं ही ती फक्त आपल्या सोबत बस मधूनच असणार होती. त्याच्या पुढचा प्रवास तर आपल्याच करायचा होता. बरं घरी सांगितलंत ना मग तसं?"
त्यांनी मला प्रश्न केला.

" हो, म्हणजे सांगितलं तर आहे. पण, मीनाक्षी सोबत आहे असं सांगितलंय. आईला तसेच सांगणे गरजेचे होते नाही तर मला यायला नसते मिळाले."
मी त्यांना जे होते ते सांगितले. त्यांनी माझ्या बोलण्यावर स्मित करत होकार दिला.

काल त्यांना भेटून मी घरी जाताना मीनाक्षीला फोन केला होता. पण, सोबत यायला नाही. माहिती काढायला. ती बहुतेक कालच तिच्या मामाकडे पोहोचली आहे. मला आमचा प्लान कॅन्सल नव्हता करायचा. म्हणून मी घरी देखील ती सोबत आहे आणि मी तिच्या सोबतच जाणार आहे असं सांगितलं होतं. बाबांनी फक्त आधी नीट विचारपूस केली आणि लगेच परवानगी दिली. आई थोडी कटकट करत होती, पण बाबांनी परवानगी दिली म्हंटल्यावर ती जास्त काही बोलू शकली नाही.

वेदांश ह्यांना मी मुद्दाम आधी काही सांगितलं नाही. मनात भीती होती की, त्यांनी भेटणं रद्द नाही करावं. आणि शेवटी आम्ही आता भेटलो. मनाला छान वाटतंय.

" मॅडम, चला आपली बस आली."
मी विचार करत असताना त्यांची हाक माझ्या कानावर आली.

आमची बस स्टँडला लागली होती. आम्ही दोघे जाऊन बस मध्ये बसलो आणि गप्पा करत करत आमच्या सुंदर प्रवासाला छान सुरुवात झाली.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all