Login

ओळखीचे शब्द...! भाग ४३

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ४३

सुलेखा

१६५० चा काळ.

ते खिडकीतून असे अचानक आत का गेले असावेत? संध्याकाळच्या वेळी मी खिडकीत उभी राहून त्यांना पाहत होते. आज रात्री आमची भेट होणार होती. माझ्या मनाला अतिशय आनंद होत होता. तो मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हते. पण, हा आनंद मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे. मला खरंच एकदा जाणून घ्यायचंच आहे की, त्यांच्या मनात नक्की आहे तरी काय? सकाळी त्यांना इतकं विचारून पण, ते काही बोलले नाहीत आणि बोलायला जाणार इतक्यात कोठून तो मूर्ख सेनापती मध्ये आला. म्हणून रात्रीसाठी महालापासून लांबची जागा निवडली. तिथे आम्हाला छान निवांत मिळेल. कोणी मध्ये मध्ये करायला येणार नाही. तिथे फक्त मी आणि तेच असू.

पण, हे काय ते असे अचानक मागे सरकून आत का गेलेत? आज रात्री त्यांना सांगितल्या प्रमाणे ते येतील ना तिथे? आणि नाही आलेत तर? तर काय, सांगितल्या प्रमाणे मी त्यांना कधीच दिसणार नाही. ते जसा हट्ट धरून बसलेत तसा माझा देखील हा हट्टच आहे. अंधार पडायला आता फक्त काही वेळ शिल्लक आहे. मी तयारी करून घेते. मग संपूर्ण महाल शांत झाला की निघेन. आज वेळ ही अगदी कासवाच्या गतीने चालला आहे.

बघता बघता अंधार पडला. संपूर्ण महाल शांत झाला. मी माझी तयारी आटपून बसले होते. इतक्यात माझ्या खास दासीने माझ्या कक्षात येऊन बागेत जाणारा रस्ता पूर्णपणे मोकळा असल्याचा मला निरोप दिला. तिला मी माझे कपडे घालून कक्षात शय्येवर पडून राहायला सांगितले होते.

मी लपत छपत महालाच्या बाहेर निघाले. रात्रीच्या वेळी बाहेर थंडीचा चांगलाच मारा होता. म्हणून मी माझ्या भोवती शाल गुंडाळून घेतली. मग मी सावधपणे पाऊले टाकत तलावाच्या दिशेला निघाले. मनात भीती तर होतीच, पण सोबतच त्यांना भेटण्याचा आनंद देखील होता. माझ्या कोणी माघावर तर नाही ना? म्हणून मी मागे वळून देखील बघत होते.

बघता बघता मी तलावा जवळ पोहोचले. तिथे दूरवर चांदण्यांच्या उजेडात मला तलावा किनारी एक आकृती दिसली. ते नक्की कोण होतं, हे मला माहित नव्हतं. म्हणून मी गुपचुप पावले टाकत त्यांच्या आणखीन जवळ गेले. तेव्हा मला समजले ते कवी होते. ते वर आकाशात चंद्राला पाहत बसले होते. ते माझ्या आधीच तिथे येऊन थांबले होते.

त्यांना पाहून मला आनंद झाला मी थेट त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले. मला समोर बघताच ते एकटक माझ्याकडे पाहत राहिले. चंद्र प्रकाशात माझी निखळ त्वचा आणखीन उजळून दिसत होते. त्यांची नजर काही माझ्यावरुन हलत नव्हती. मी देखील त्याच प्रेम भरल्या नजरेने त्यांना पाहू लागले.

" कवी, चला त्या झाडाखाली जाऊन उभे राहू. मला तुमच्या मनातलं ऐकून घ्यायचं आहे. कोणी आलं तरी तिथे आपण कोणाला नाही दिसणार."
मी त्यांच्या जवळ जात म्हणाले.

" पण, राजकुमारी... तुम्ही ह्या राज्याच्या राजकुमारी आहात. हे कसं शक्य आहे? कृपा करून तुम्ही हट्ट सोडा..."
ते माझ्याकडे पाहत म्हणाले.

मी काही न बोलता त्यांचा हात धरला आणि तिथून काही अंतरावर असलेल्या एका झाडाखाली घेऊन आले. त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन मी अगदी त्यांच्या समोर उभी राहिले. ते मला मन भरून पाहू लागले. मी त्यांना अडवले नाही. त्यांच्यासाठीच आज मी सजले होते. मोकळे केस, डोळ्यांमध्ये काजळ, नवीन साडी, सजून झाल्यावर मीच मला आवडू लागले होते. झाडाखाली येत असतानाच माझ्या खांद्यावरची शाल खाली पडली होती पण, मी ती उचलली नाही.

आम्ही दोघे एकमेकांच्या नजरेत हरवून गेलो. एकमेकांसोबत नजरेची भाषा बोलू लागलो.

" कवी, मी कोण आहे? काय आहे? हे सगळं बाजूला ठेवून एकदा मला तुमच्या मनातली गोष्ट सांगा. मला ऐकायची आहे. प्रेम हे प्रेम असतं. ते कधीच ठरवून केलं जात नाही. आणि त्यात जुळतात ती मने असतात आणि मनांना ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत कविराज..."
मी त्यांच्या नजरेत खोलवर पाहत म्हणाले.

" राजकुमारी... मला देखील खूप आवडता..."
शेवटी मला हवे असलेले शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले.

ते स्मित करत माझ्या डोळ्यांमध्ये पहात म्हणाले. पुढचा एक ही क्षण वाया न घालवता आम्ही दोघे एकमेकांच्या बाहुपाशात घट्ट समावून गेलो. ह्या मिठीच्या गोडव्याला कसलीच तोड नव्हती. आम्ही आमच्या मनातील आनंद मिठीतून व्यक्त करत होतो. तसेच एकमेकांच्या मिठीत राहून मागे सरकलो आणि त्यांनी माझी पाठ झाडाला टेकवली.

" मला देखील तुम्ही अगदी पाहतच क्षणापासून आवडू लागला होतात. पण, माझी कधी सांगायची हिंमत झाली नाही..."
मला घट्ट मिठीत घेऊन ते म्हणाले.

त्यांचे हात मला हळूच माझ्या पाठीवरून फिरताना जाणवत होते. त्यांच्या ह्या स्पर्शाने माझ्या संपूर्ण अंगावर शहारे आले होते. ते हात हळूच सरकत सरकत खाली साडीच्या आत कंबरेवर आले आणि... तिथेच मी संपले. मी स्वतःला पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन केलं. माझे डोळे मिटून मी ह्या गोड क्षणाचा आनंद घेऊ लागले.

पुढे मला त्यांचे ओठ माझ्या कपाळाला टेकलेले जाणवले. मी त्यांना आणखीन घट्ट मिठी मारली. मग त्यांचे ओठ माझ्या दोन्ही डोळ्यांवर जाणवले. मग माझ्या नाकावर आणि दोन्ही गालांवर. त्यांचे हात माझ्या कंबरेवरून फिरू लागले.

माझ्या गालावरून त्यांचे ओठ माझ्या ओठांसमोर आले. मला  त्यांचा वाढलेला श्वास माझ्या ओठांवर जाणवू लागला. माझे ओठ आपसुक त्यांच्या ओठांजवळ ओढले गेले आणि बघता बघता आमचे ओठ एक झाले.

आमच्या ओठांसोबत आम्ही एक झालो. आम्ही एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेलो. वाऱ्यातील गारवा आता पूर्णपणे निघून गेला होता. आम्हाला आता फक्त एकमेकांच्या शरीराची उष्णता जाणवू लागली. तीच आम्हाला एकमेकांजवळ जास्तीत जास्त ओढत होती. आम्ही आता दोन जीव एक प्राण झालो होतो.

तो चंद्र आमच्या ह्या क्षणाचा साक्षीदार होता. ही आजूबाजूची झाडे, हा सुंदर तलाव जणू शांततेत आमच्या क्षणाची साक्षी देत होते. संपूर्ण वातावरण प्रेममय झाले होते.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all