दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ४४
वेदांश
२०१५ चा काळ मुंबई.
गप्पा करता करता आम्ही कधी ठरलेल्या बस डेपोला पोहोचलो कळलेच नाही. संपूर्ण प्रवासात आमच्या अगदी भरपूर गप्पा झाल्या. तिला खूप बोलायला लागतं. मुलींचा मुळात स्वभावच असतो तो, पण तरी त्या अशा कुठे ही, कोणा जवळ बडबड करत नाहीत. त्यांच्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्ती सोबतच त्या इतकं बोलू शकतात. ती जवळीक मला आज तिच्या सोबत जाणवली. आम्ही अगदी आमच्या लहानपणा पासूनच्या शाळेतल्या सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या. ती आज फारच आनंदी वाटत होती. गप्पा करता करता प्रवास कधी संपला कळलेच नाही. खरं तर तो कधी संपूच नये असे वाटत होते.
बस डेपोला पोहचून तिथून बाहेर निघून एका हॉटेल मध्ये नाष्टा करून, आम्ही ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा केली. तो महाल डेपो पासून आत गावात बराच लांब होता. जास्त लोकांना त्याबद्दल माहीत देखील नव्हते. म्हणून तिथे फारच कमी लोकांचे येणे जाणे होते. तो बऱ्याच आत जंगलात डोंगरा जवळ होता. आम्हाला रिक्षातून उतरून तिथे थोडा पायी प्रवास करावा लागणार होता. बहुतेक तिथे आम्हाला नेटवर्क देखील मिळाले नसते म्हणून मी आधीच आईला फोन करून कळवलं. अदितीने देखील तिच्या बाबांना फोन करून पोहोचल्याबद्दल कळवले. रिक्षातून जाताना रिक्षा वाल्याने आम्हाला बरीच माहिती दिली. तो तिथल्या जवळच्याच गावचा स्थायिक असल्यामुळे त्याला त्याबद्दल बरीच माहिती होती.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या काळात भीमराज ह्यांच्या राज्यावर बरेच मोठे आक्रमण झाले. त्यात त्यांचे संपूर्ण राज्य उध्वस्त झाले. त्यांनी शत्रूंना तर मात दिली पण, त्यांचे बरेच नुकसान झाले. त्यांची सगळी संपत्ती वाया गेली. पुढे शत्रूंच्या भीतीने त्यांचे वंशज त्या महालापासून दूरच राहिले. म्हणून आता ते सगळं नक्की कोणाचं हा कोर्टात वाद सुरू आहे. सरकारने ते सध्या आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्यांच्या माहितीनुसार तिथे कुठेतरी त्या काळातील जुनी पुस्तके देखील आहेत, पण ती वाचायला जास्त कोणी रस घेत नाही. पण, आमच्या कामाची ती पुस्तकेच होते. त्याबद्दल ऐकून आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.
बघता बघता त्यांनी आम्हाला जंगलाच्या बाहेरच्या रस्त्याला सोडलं. तिथे आत रिक्षा जाणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही उतरून त्यांनी सांगितल्या दिशेला चालू लागलो. इथे पोहोचता पोहोचता आम्हाला दुपारचे बारा वाजले होते. आजूबाजूला मोठमोठे झाडे असल्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता. बस मधून उतरून आम्ही आधी खाऊन घेतलं होतं त्यामुळे भुकेचं देखील इतकं काही वाटतं नव्हतं.
आम्ही पुन्हा छान गप्पा मारत तो जंगलातला प्रवास करू लागलो. पुढचे पंधरा मिनिटे चालून आम्ही त्या भल्यामोठ्या महाला समोर पोहोचलो. ते बघून आमचे तोंड उघडेच्या उघडेच राहिले. किती तो मोठा महाल. आम्ही एकमेकांना बघून ठरल्या जागी पोहोचल्याचा आनंद व्यक्त केला आणि आत जाऊ लागलो.
तिथे बाहेर आम्हाला दोन वॉचमन भेटले. आम्ही त्यांना तिथे अभ्यासानिमित्त रिसर्च करायला आलो असल्याचं सांगितलं. अदितीने तिच्या कॉलेज आणि प्रोजेक्ट विषयी त्यांना सांगितलं. तेव्हा कोणत्याही वास्तूला हात लावू नका सांगून त्यांनी आम्हाला आत जाऊ दिलं. तिथे आत आधीच पाच सात माणसे गेली होती.
आम्ही पुढे जाऊ लागलो. पुढे जाऊन आत महालाच्या दरवाजातून आत पाय ठेवला. मी पुढे गेलो, पण अदितीचे पाय तिथेच दारात अडकले. मी मागे वळून तिच्याकडे बघितले. ती दरात उभी राहून संपूर्ण महाल पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर मला वेगळेच भाव जाणवत होते. मी तिला हाक मारून काय झाल्याचे विचारले.
" आ... अहो काही नाही. किती भव्य आहे नाही? सरकारच्या हातात असून देखील ह्याची देखरेख नीट होत नसल्याची दिसते. किती घाण झाली आहे. या घाणी खाली किती छान सौंदर्य लपले असेल ना?"
ती सगळी कडे डोळे फिरवत म्हणाली.
ती सगळी कडे डोळे फिरवत म्हणाली.
" हो ना, मग काय आता आपण घ्यायचं का हे साफ करायला? चला आता आपण तुमच्या प्रोजेक्टसाठी आलोय विसरू नका."
मी तिची मस्करी करत म्हणालो.
मी तिची मस्करी करत म्हणालो.
माझ्या बोलण्यावर हसत ती पुढे आली. आम्ही आतून संपूर्ण महाल फिरू लागलो. खरंच आतून खूपच सुंदर आणि भव्य आहे महाल. पण, आल्यापासून पाहतोय माझ्या पेक्षा जास्त अदिती इथे जास्त रमली आहे. ती अगदी सगळं काही विसरून प्रत्येक गोष्टी जवळून पाहत आहे. मी तिला डिस्टर्ब नाही केलं. शेवटी तिच्या प्रोजेक्टचा प्रश्न आहे. करुदेत तिला काही.
पण हे काय ती हळू हळू चालत वरच्या दिशेला जाऊ लागली. माझं देखील इथे बरंच काही बघून झालं होतं. मी देखील तिच्या मागून वर जाण्यासाठी निघालो. वर गेल्यावर रांगेत बऱ्याच खोल्या होत्या. इतर माणसं देखील त्या खोल्यांमध्ये फिरत होती.
रिक्षावाल्याने सांगितल्यापैकी काही गोष्ट मी आधी वाचली होती. अदिती पहिल्या मोठ्या खोलीच्या आत शिरली. मी बाहेरच्या मधल्या भागात फिरू लागलो. तिथे असलेल्या जुन्या वस्तू हत्यारे वगैरे पाहू लागलो. तिथली वस्तूंची काळजी नीट घेतली जात नव्हती हे अगदी स्पष्ट दिसत होते.
मी चालता चालता एका खोली जवळ पोहोचलो. त्या खोलीत मी प्रवेश केला. ही खोली फार मोठी होती. ही नक्कीच राजपरीवरातील कोणाची तरी असणार हे नक्की होतं. आत सगळीकडे मी फिरू लागलो. प्रत्येक गोष्ट पाहू लागलो. फिरता फिरता मला एका भिंतीवर एक भला मोठा फोटो दिसला. तो धुळीने माखल्यामुळे काहीसा स्पष्ट दिसत नव्हता. पण, वर वर दिसणारा तो चेहरा ओळखीचा जवळचा वाटत होता. म्हणून मी पुढे होऊन हाताने त्यावरची धूळ बाजूला केली आणि पाहतो तर काय तो चेहरा अगदी हुबेहूब अदिती सारखा दिसत होता.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा