Login

ओळखीचे शब्द...! | भाग ४५

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ४५

शाश्वतवर्ण

१६५० चा काळ.

शेवटी विचार करून करून मला रहावलं नाही आणि मी त्यांच्या आधीच तलावा जवळ जाऊन बसलो. मी विचार केला की, त्यांना शेवटचं सांगीन या पुढे हा विषय नको म्हणून. तिथे जाऊन मी त्या येण्याची वाट बघत एका दगडावर बसून समोर आकाशात दिसणाऱ्या चंद्राला पाहू लागलो. त्याला पाहताना त्याच्यात मला राजकुमारीच दिसत होत्या. मला हे काय झालंय? मी त्यांच्याशी कसं आणि काय बोलणार आहे देव जाणे...!

मी विचार करत बसलेला असताना अचानक त्या माझ्या समोर आल्या. त्या आता आधी पेक्षा जास्तच सुंदर दिसत होत्या. त्यांना पाहताना मी माझे भान हरपून गेलो. मला त्यांना काय बोलायचे होते अगदी पूर्णपणे विसरून गेलो.

त्या मला कधी या झाडांच्या मध्ये एकांताच्या ठिकाणी घेऊन आल्या, मला माझेच समजले नाही. बघता बघता मी त्यांना जवळ घेऊन माझ्या मनातली गोष्ट सांगितली. आम्ही पूर्णपणे एकरूप झालो. स्वतःचे भान हरपून एकमेकांच्या प्रेमात वाहून गेलो. पूर्णपणे प्रणयात बुडालो.

बऱ्याच वेळा नंतर मग त्या शांतपणे माझ्या छातीवर केस मोकळे सोडून पडून होत्या. मी त्यांच्या सुंदर मोकळ्या केसांमधून हात फिरवू लागलो. दोघांच्याही मनामध्ये आनंद होता, समाधान होतं. ते सगळं आम्हाला आमच्या स्पर्शातूनच जाणवत होतं.

" चंद्राच्या शीतल छाये खाली, जवळी तुमच्या आले.
मिठीत येऊनी सजना तुमच्या, तुमचीच होऊनी गेले."
बराच वेळ शांत राहून मग त्या दोन सुंदर ओळी म्हणाल्या.

"सौंदर्य तुमचे पाहताना, लाजला बघा चंद्रही नभी.
जवळूनी पाहुणी तुम्हा, मिठीत घेण्या जाहलो लोभी."
त्यांच्या ओळींना उत्तर म्हणून मी त्यांना जवळ मिठीत घेत म्हणालो.

"मिठीत तुमच्या विसरुनी गेले, सजना जग हे सारे.
अंतर मनामध्ये आता आपुल्या, वाहू द्या प्रेमाचे वारे."
माझ्या मिठीत येऊन त्या गोड स्मित करत माझ्या कडे पाहत म्हणाल्या.

"प्रेमाची भावना मनी जागली, तुम्हा पाहताच क्षणी.
त्याच क्षणापासून मनात माझ्या, साठवल्या गोड आठवणी."
त्यांच्या सुंदर डोळ्यांमध्ये पाहत मी प्रेमाने त्यांना म्हणालो.

"तुमच्या आधीच मी पाहिले तुम्हा, पाहुनी झाले वेडी.
समजेना झाले बोलू कशी, कशी लावू लाडी गोडी."
वाह...त्यांच्या गोड आवाजात त्यांचे हे गोड शब्द माझ्या मनावर जादू करत होते.

"म्हणुनी माझ्यासाठी तेव्हा, लिहिल्या दोन ओळी गोड.
त्याचं क्षणी प्रिये वाटली होती, माझ्या वेड्या मनी ओढ."
त्यांच्या त्या गोड ओळी ऐकून मी उत्तर म्हणून त्यांना म्हणालो.

आमची मिठी पुन्हा एकदा घट्ट झाली. थोडी थोडी करून आमच्या कडून छान सुंदर एक कविता रचली जात होती. जी आमच्या दोघांची होती. आमच्या दोघांच्या प्रेमाची प्रतीक होती ती. ही कविता अंतर मनात कोरली जात होती. नसानसात भिनली जात होती. ती कविता म्हणजे आमचे प्रेमच होते, जे आम्ही शब्दांच्या रूपात पूर्ण करत होतो.

"ओढ वेड्या मनांची आपणास, जवळ घेऊनी आली.
जवळी येऊनी सजना प्रेमाच्या, पर्वास सुरुवात झाली."
माझ्या ओळी ऐकून स्मित करत राजकुमारी म्हणाल्या.

"पर्व सुखद प्रेमाचा तरी, मनी वाटे दुराव्याची भीती.
या जन्मी होऊ का एकात्म? मनी प्रश्न माझ्या किती."
मला मध्येच दुराव्याच्या विचाराने उदासीन होऊन मी या ओळी म्हणाली आणि मी शांत झालो.

" कवी... कविता अजूनही पूर्ण झालेली नाही."
त्या मला घट्ट मिठीत घेत माझ्याकडे गोड स्मित करत म्हणाल्या.

आम्ही दोघे एकमेकांमध्ये गुडूप असताना आमच्या कानावर अचानक कसली तरी कुजबुज ऐकू आली.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all