Login

ओळखीचे शब्द...! | भाग ४७

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ४७

सुलेखा

१६५० चा काळ.

"पर्व सुखद प्रेमाचा तरी, मनी वाटे दुराव्याची भीती.
या जन्मी होऊ का एकात्म? मनी प्रश्न माझ्या किती."

पुढच्या दोन ओळी कवी उदासीन होऊन म्हणाले म्हणून ती कविता अजूनही पूर्ण झालेली नाही अशी मी त्यांची समजूत काढू लागले. आम्ही दोघे मिळून केलेल्या ह्या कवितेचे एक एक अक्षर माझ्या मनावर कोरले गेले, जन्मोजन्मांसाठी!

पण आमची कविता पुढे जाणार इतक्यात आमच्या कानावर कोणाची तरी कुजबुज ऐकू आली आणि आमचे लक्ष तलावाच्या दिशेला गेले. आम्ही असलेल्या जागे पासून ती जागा स्पष्ट दिसत होती. तिथे दूरवर आम्हाला बऱ्याच आकृत्या दिसल्या. आम्ही दोघे ही सावध झालो.

आम्ही आहोत तिथून बाहेर निघणे आता शक्य नव्हते. थोडा वेळ निरीक्षण केल्यावर मला समजले की, ते आमच्याच राज्याचे सैनिक आहेत. पण, आता ह्या वेळी ते इथे काय करत आहेत? काही कामासाठी वगैरे आले असावेत का? काहीच कळायला मार्ग नाही. कवींच्या चेहऱ्यावर भीती दाटून आलेली दिसत होती. तीच भीती माझ्या मनात देखील दाटून आली होती.

" कवी हे सैनिक बहुतेक काही कामानिमित्त इथे आले असावेत. ते काही वेळातच इथून निघून जातील, तुम्ही नका काळजी करू."
मी त्यांना धीर देत म्हणाले.

" राजकुमारी सुलेखा... जिथे कुठे लपून बसला असाल तिथून बाहेर या. आम्हाला माहीत आहे तुम्ही इथेच कुठे तरी आहात. तुम्ही जर स्वतःहून आला नाहीत तर आम्हाला तुम्हाला शोधून काढायला वेळ लागणार नाही. आणि... हा सोबत कवींना देखील घेऊन या..."
तो आवाज ऐकून माझ्या काळजात धस्स... झालं. तो राजकुमारांचा आवाज होता.

राजकुमार इथे कसे? ते कधी आले? आणि आलेत तर ते सरळ इथे कसे? हे काय त्यांच्या हातात माझी मघाशी तिथे पडलेली शाल आहे. त्यांच्या बाजूला तो हरामखोर सेनापती उभा आहे. नक्की ह्यानेच राजकुमारांचे कान भरून त्यांना इथे आणले असणार.

माझ्या समोर आता काहीच पर्याय उरला नव्हता. ती जागा पूर्णपणे सैनिकांनी घेरली गेली होती. मी कवींना तिथेच लपून रहायला सांगून मी थोडीशी बाजूला जाऊन वेगळ्या वाटेने बाहेर निघाले. जेणेकरून आम्ही नक्की कुठे होतो हे कोणाला कळू नये आणि कवी होते तिथे सुखरूप रहावे.

मी बाहेर येऊन त्या सगळ्यांसमोर आले. तिथे राजकुमार, सेनापती आणि इतर सैनिक घेरा करून उभे होते. मी काही बोलणार इतक्यात त्यांच्या मागून काही सैनिक माझ्या कक्षात माझे सोंग घेऊन झोपून असलेल्या माझ्या दासीला ओढत आणत होते. तिला बघून मी थक्क झाले. ती स्वतःला सोडवून घेण्यासाठी जोरजोरात रडत होती.

" राजकुमार मी तुमच्या पाया पडते तिला सोडा तिची बिचारीची काहीच चूक नाही."
मी राजकुमारांचे पाय धरून त्यांना विनवण्या करत बोलू लागले.

" चूक कशी नाही राजकुमारी? तिची एवढी हिंमत, राजकुमारी त्यांच्या कक्षात नसताना ती त्यांच्या शय्येवर झोपते. तिला तिच्या कृत्याची चांगलीच शिक्षा मिळणार. घेऊन जा रे तिला कैद करून ठेवा."
राजकुमारांनी कठोर शब्दात तिला घेऊन जाण्याचा आदेश दिला.

तिला ते पुन्हा तसेच ओढत तिथून घेऊन जात होते. मी रडत रडत ती जात असलेल्या दिशेला स्तब्ध होऊन पाहत होते. ती मोठमोठ्याने तिला सोडण्यासाठी विनवण्या करत होती.

" चल हरामखोरा, ज्या थाळीत खातोस त्यातच छेद करतोस? राजकुमार तुला आता काही सोडत नाहीत. राजकुमार हा बघा, हा कवी तिथे लपून बसला होता."
मी तिच्या दिशेला पाहत असताना मागून सेनापती कवींना ओढत असल्याचं माझ्या कानावर ऐकू आलं.

ते ऐकून माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. मी झटकन मागे फिरून बघितलं. मी त्यांना काही बोलण्या आधीच त्यांनी त्यांना तिथून शोधून बाहेर आणले. तो त्यांना मारून ओढत आणत होता. माझ्याकडे विचित्र स्मित करत बघत होता. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहायला  होते. मला आपसुक रडू कोसळले.

" रा... राजकुमार... सोडा त्यांना. मी तुमच्या पाया पडते. त्यांना काही करू नका. मी तुमचं सगळं ऐकेन पण त्यांना काही करू नका. राजकुमार, सावत्र असले तरी मी तुमची बहीण आहे, कृपा करून माझे इतके ऐका."
मी रडत त्यांचे पाय पकडून त्यांच्याकडे कवींच्या जीवाची भीक मागू लागले.

" थांबा सेनापती..."
राजकुमारांनी त्याला थांबायचा आदेश दिला. ते बघून मला हायसे वाटले.

" राजकुमारी, ह्याची लायकी तरी आहे का? हा तुमच्याही प्रेम करतो? तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात पाडतो?
हिंमत तरी कशी होते रे तुझी? तुला ह्याची शिक्षा नक्की मिळणार... सेनापती ह्याला चांगलीच समज द्या आणि त्याला भुयारात बंदी बनवून कैद करून ठेवा. राजकुमारी तुम्ही चला आमच्या सोबत."
राजकुमारांनी त्यांना आदेश देऊन माझा हात घट्ट धरला.

माझा हात धरून ते मला ओढतच महालाच्या दिशेने घेऊन जाऊ लागले. मी रडत हात सोडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या कडे सुटकेसाठी विनवण्या करू लागले. ते माझ्याकडे पाहत देखील नव्हते. मी तशी पुढे चालताना मागे वळून पाहत होते. मागे तो क्रूर सेनापती अगदी निर्दयीपणे त्यांना मारत होता. कवी तसेच मार खात डोळ्यांमध्ये अश्रू आणून माझ्या दिशेला हात करत होते. त्यांना हा असा दुरावा सहन झाला नव्हता. ते बघून माझ्या काळजाचे तुकडे तुकडे होत होते.

राजकुमारांनी मला महालात आणून माझ्या कक्षात कोंडून ठेवले. मी सुटकेसाठी अजूनही त्यांच्याकडे विनवण्या करू लागले. पण, ते माझं ऐकून घ्यायला तयार नव्हते.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all