Login

ओळखीचे शब्द...! | भाग ४९

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ४९

शाश्वतवर्ण

१६५० चा काळ.

राजकुमारींनी सांगितल्या प्रमाणे मी होतो तिथेच थांबून राहिलो. त्या एकट्या राजकुमारांसमोर गेल्या. खरं तर मला त्यांना असं संकटात टाकून लपून राहणं पटत नव्हतं. पण, जाताना त्यांनी मला त्यांची शपथ घातली होती. त्या राजकुमारांचे पाय पडून रडत असताना माझ्या काळजात धस्स होत होतं.

मी तसाच बाहेर पाहत असताना अचानक माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला. मी मागे वळून बघितले तर ते सेनापती अंगेश होते. त्यांनी मला शोधून काढले होते. मी त्यांना काही बोलणार त्या आधीच त्यांनी हातातील तलवारीच्या मुठीने माझ्या डोक्यावर जोरदार वार केला. मग त्यांनी माझे केस धरून मला बाहेर त्यांच्या समोर ओढत आणले.

तिथे आणून देखील त्यांचे मला मारणे चालूच राहिले. मला मार खाताना बघून राजकुमारी मोठ्याने रडू लागल्या. राजकुमारांकडे मला सोडण्यासाठी विनवण्या करू लागल्या. पण, राजकुमारांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. ते सेनापतींना आदेश देऊन राजकुमारींचा हात पकडून त्यांना ओढत घेऊन जाऊ लागले.

मला हा दुरावा सहन होत नव्हता. राजकुमारी माझ्यापासून दूर दूर आणखीन दूर जाऊ लागल्या. सेनापतींचं मला मारणे चालूच होते. पण, त्या मारा पेक्षा राजकुमारी माझ्यापासून कायमच्या दूर जात असल्याचं दुःख मला जास्त होत होतं. मी डोळ्यांमध्ये अश्रू आणून हात त्यांच्या दिशेला केला. जणू त्यांना थांबण्याचा वेडा प्रयत्न करत होतो. ज्याचा इथे काहीच उपयोग नव्हता.

मी मार खात, त्या अगदी अंधारात गुडूप होई पर्यंत मी त्यांना पाहत होतो. माझ्या शरीराला झालेल्या जखमांपेक्षा माझ्या मनाला प्रचंड वेदना होत होत्या. मला माहित होते की, आता आमची भेट कधीच होणार नाही. माझ्या मनाचे अगदी तुकडे तुकडे झाले होते. त्या दुःखात मला इतके देखील भान नव्हते की, माझ्या शरीरातून प्रत्येक ठिकाणी जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते.

राजकुमारींच्या दिशेला लांब केलेला हात सेनापतींनी हातात धरला आणि हाताच्या मधल्या बाजूला वरून जोरात लाथ मारली. माझा हात मधून तुटला. मी वेदनेने ओरडलो कळवळलो, पण त्यांना मात्र माझी दया आली नाही. समोर राजकुमारी दिसेनाशा झाल्यावर. सेनापतींनी सैनिकांना मला त्या भुयारात असलेल्या कोठडीत डांबायला सांगितले. ते सगळे मला ओढत घेऊन जाऊ लागले.

इतका मार खाऊन माझ्या अंगात त्राण उरले नव्हते. माझे डोळे बंद झाले. पाय जमिनीला घासत होते. माझा श्वासच मी जिवंत असल्याची ग्वाही देत होता. नाही तर असा मी निष्प्राण झालो होतो.

त्यांनी मला त्या अंधाऱ्या कोठडीत जवळ जवळ फेकलच. मी जमिनीवर त्या अंधारात तसाच पडून राहिलो. किती वेळ ते माहित नाही. तिथे सकाळ किंवा रात्र झाल्याचं काहीच समजत नव्हतं. फक्त अधून मधून तिथे असलेला एक सैनिक, तिथे कोणी नसताना येऊन मला बघत होता माझी विचारपूस करत होता. त्याला बहुतेक माझ्यावर दया आली होती. मला जिवंत राहण्यासाठी जेवढं अन्न गरजेचं आहे तेवढंच दिलं जात होतं.

मला खरं तर माझी काहीच फिकीर नव्हती. मला राहून राहून राजकुमारींची काळजी वाटत होती. त्यांना एकदा तरी भेटायची इच्छा होत होती. मी त्या सैनिकाला त्यांच्याबद्दल विचारत होतो. पण, त्याला देखील पुरेसी माहिती नव्हती. त्याची बायको महालात कामाला असल्यामुळे त्याला इतकं माहित होतं की, राजकुमारींना त्यांच्या कक्षात कोंडून ठेवले आहे. त्यांचे खूप खूप हाल केले जात आहेत. आणि त्या देखील माझ्या भेटीसाठी तरसत आहेत.

अगदी कमी वेळातच राजकुमारी आणि मी खूप जवळ आलो होतो. इतके जवळ की, दोन जीव एक प्राण झालो होतो. त्यांचा विरह मला सहन होत नव्हता. मला त्यांना मनापासून एकदा तरी बघायची इच्छा होती आणि त्या नंतर मी मेलो तरी चाललं असतं.

मी माझी इच्छा त्या सैनिकाकडे किती तरी वेळ बोलून दाखवली. पण, त्याची इच्छा असून देखील तो ह्या बाबतीत काही करू शकत नव्हता.

पण एकदा तो माझ्या कोठडीच्या दारा जवळ आला. आज रात्री सैनिकांची जंगी मेजवानी असल्यामुळे सगळे सैनिक तिथे व्यस्थ असतील. त्यामुळे तो मला घेऊन माझ्या घरा जवळ घेऊन जाणार होता. जिथून महालात वर खिडकीत मला राजकुमारींना बघता येणार होते. त्यांना देखील तसे कळवण्यात आले होते. बहुतेक त्यांनीच ही योजना आखली होती. त्यांना देखील मला बघायची खूप इच्छा होत होती.

ठरल्या प्रमाणे सगळे सैनिक त्यांच्या मेजवानीत व्यस्थ झाले. इथे भुयारातून कोणाचे पळणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी इथे फक्त एकच सैनिक ठेवला जो माझी मदत करणार होता. योग्य वेळ बघून त्याने मला बाहेर काढले.

आम्ही दोघे लपत छपत माझ्या घराजवळ पोहोचलो. तिथे राजकुमारींची खिडकी दिसेल असा आडोसा बघून उभा राहिलो. तो सैनिक आजूबाजूला लक्ष देण्यासाठी बाहेर मोकळ्यावर उभा राहिला.

मी उभा राहून राजकुमारींच्या खिडकी जवळ पाहू लागलो. पुढच्याच क्षणी राजकुमारी खिडकीत आल्या. त्यांना पाहून माझ्या आनंदाला सीमा राहिली नाही. मी एकटक प्रेमाने त्यांच्या दिशेला पाहत राहिलो. त्या देखील प्रेमाने माझ्याकडे पाहत होत्या. आज देखील ह्या क्षणाचा चंद्र साक्षीदार होता.

राजकुमारी हाताने डोळ्यांमधले अश्रू पुसताना मला जाणवलं. बहुतेक त्यांना माझी अवस्था बघवत नसेल. पण, त्यांना मी कसं सांगू की, त्यांना पाहून मी सगळं काही विसरून गेलो आहे.

पण हे काय? राजकुमारींनी खालून आपल्या हातात धनुष्य उचलला. त्याच्यावर बाण चढवून त्याचे टोक माझ्या दिशेला वळवले.

राजकुमारी हे काय करत आहेत? पण, मी माझे विचार जागीच थांबवले. मला हवी असलेली गोष्ट आता पूर्ण झाली होती. मी त्यांच्याकडे बघून स्मित करू लागलो. त्यांच्या डोळ्यांमधून मात्र मला घळा घळा  अश्रू वाहताना दिसले.

पुढच्याच क्षणी त्यांच्या हातातून बाण सुटला आणि तो सरळ माझ्या छातीच्या आर पार झाला आणि मी तसाच खाली कोसळलो. माझ्या प्रेमाच्या हातून मला मरण येत आहे या पेक्षा आनंदाची गोष्टी कोणती?

माझे डोळे हळू हळू मिटू लागले. मिटताना डोळ्यांसमोर राजकुमारींचा चेहरा आणि त्यांच्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण येऊन गेले...!

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all