दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ५०
अदिती
२०१५ चा काळ मुंबई.
हा आकाश आणि त्याची ही माणसे कवींना कुठे घेऊन जात आहेत? त्या दिशेला... त्या दिशेला तर ते तलाव आहे आणि... आणि ती भुयारातील कोठडी. म्हणजे हा आकाश म्हणजेच, अंगेश? नाही... विचार करून माझं डोकं सुन्न झालं. कवींच्या जीवाला धोका आहे.
मी तशीच मागे फिरून हातात ते कागद तसेच घेऊन, त्या कक्षातून बाहेर धावत सुटले. धावत महालाच्या खाली उतरून ते सगळे गेलेत त्या दिशेला धावू लागले. धावताना माझे डोळे अश्रूंनी भरले होते. कवी मला तुम्हाला पुन्हा गमवायचे नाही.
धावत धावत मी त्या तलावा जवळ पोहोचले आणि स्तब्धच झाले. हा सगळा परिसर बघताना मला ती रात्र आठवली आणि मी आठवणीत गुंग झाले. ते गोड क्षण पुन्हा डोळ्यांसमोरून गेले. पण, त्या नंतरचा तो थरार आठवून माझ्या अंगावर काटा आला. मी शुद्धीवर आले. तिथे उभी राहून आजूबाजूला पाहू लागले. पण, मला तिथे कोणीच दिसत नव्हतं. कवींना घेऊन ते सगळे कुठे गेले असतील? कवींना त्यांनी काही केलं तर नसेल ना?
माझ्या जिवाचं पाणी पाणी झालं. काय करावं मला सुचत नव्हतं. तेव्हा मला अचानक त्या भुयाराची आठवण झाली. ते नक्की कुठे आहे हे मला आठवत नव्हते. मी मेंदूवर आणखीन थोडा जोर देऊन विचार करायचा प्रयत्न केला. मला अचानक आठवले आणि मी त्या दिशेला धावत सुटले. तिथून काही अंतरावर भुयाराचे तोंड उघडत होते.
मी धावतच तिथे आत शिरले. पण, तिथे कोणीच नव्हते. आत अंधार असल्यामुळे मी फोनची टॉर्च चालू केली. टॉर्चचा उजेड जमिनीवर पडताच माझ्या काळजात चर्र... झालं. खाली मला कवींची बॅग आणि जमिनीला रक्त लागलेलं दिसलं. ते बघून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.
मी तशीच धावत तिथून बाहेर आले आणि कवींना हाका मारू लागले. धावत सगळीकडे त्यांचा शोध घेऊ लागले. पुन्हा धावत तशीच तलावा जवळ पोहोचले. मला ते कुठेच दिसत नव्हते.
पुढच्याच क्षणी मला अचानक पाण्यात जोरात काही तरी फेकल्याचा आवाज आला. मी आवाज आला त्या दिशेला धावत सुटले. एका ठिकाणी किनाऱ्यावर थांबून पहिले तर, समोर मला एका होडीत आकाश आणि त्याच्या सोबतची माणसे दिसली. त्यांनी पाण्यात काही तरी फेकले होते. कवी वेदांश?
माझ्या काळजात धडकी भरली. मी पुढचा मागचा कसलाच विचार न करता पाण्यात उडी टाकली. ते सगळे तो पर्यंत तिथून निघून किनाऱ्याकडे चालले होते. मी तिथे असल्याचं त्यांना समजलं नाही. लहान असताना बाबांनी मला गावी नदीत पोहायला शिकवले होते. मी स्विमिंगचा क्लास पण केला होता. त्यांची होडी असलेल्या ठिकाणी मी पोहोचले आणि आत पाण्यात डुबकी मारली.
हात पाय मारताना मला कोणाचा तरी हात हाताला लागला. मी लगेच तो घट्ट धरला. त्यांना माझ्या जवळ ओढलं. ते कवी होते! मी त्यांना घेऊन हळू हळू किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागले. बघता बघता किनाऱ्यावर पोहोचले. किनाऱ्यावर पोहोचून कवींना बाहेर मोकळ्यावर झोपवले. कवींचे डोळे उघडत नव्हते श्वास थांबल्या सारखा वाटत होता. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागले.
माझे आजूबाजूला अजिबात लक्ष नव्हते. पण, मला अचानक काही अंतरावरून बंदुकीचा आवाज आला. त्या सोबत आणखीन कसला तरी आवाज आला. मी त्या आवाजाच्या दिशेला पाहिले. तिथे आकाश आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी पकडले होते. आणि हे काय बाबा...? बाबा इथे काय करत आहेत?
पोलिसांसोबत बाबा उभे असलेले मला दिसले. मी मोठ्याने त्यांना हाक मारली. ते धावतच माझ्या जवळ आले. पोलिसांनी सगळी घटना नीट समजावून घेतली. ते सगळे पोलिसांना बघून पळत असतानाच पोलिसांनी त्यांच्या पायावर गोळी घातली होती. कोणास ठाऊक का? मी बाबांना महाराज म्हणून संबोधले होते. मघाशी पहिल्या खोलीत मी जो महाराजांचा फोटो पाहिला होता तो हुबेहुब बाबांसारखा होता.
" अदिती बेटा, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना?"
माझ्या जवळ येऊन बाबांनी मला विचारले.
माझ्या जवळ येऊन बाबांनी मला विचारले.
" हो बाबा, पण कवी..."
मी कवींच्या डोक्यावरून हात फिरवत रडत बाबांना म्हणाले.
मी कवींच्या डोक्यावरून हात फिरवत रडत बाबांना म्हणाले.
कवी डोळे उघडत नव्हते. माझ्या मनात भीतीने घर केले होते. बाबा, मी आणि इतर पोलिस अधिकारी त्यांच्या छातीवर पोटावर दाब देऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागलो.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा