Login

ओळखीचे शब्द...! | भाग ५१

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ५१

सुलेखा

१६५० चा काळ.

राजकुमारांनी मला महालात आणून माझ्या कक्षात कोंडले. मी त्यांच्या जवळ मला सोडण्याचा किती तरी प्रयत्न केला. पण, कोणी माझे ऐकून घ्यायला तयार नव्हते. खरं तर महाराज महालात उपस्थित नव्हते. ते काही कामानिमित्त राज्याबाहेर गेले होते. ते आठवडाभराने परतणार होते. त्यांच्या शिवाय माझं ऐकून घेणारं इथे कोणी नव्हतं. हे सगळं महाराणी, तो सेनापतीने आणि राजकुमारांनी मुद्दाम घडवून आणले होते. मी त्यांच्या समोर कमजोर पडले. त्यांच्या सोबत संपूर्ण सैन्य होतं. मी माझ्या प्रेमाला नाही वाचवू शकले. त्यांनी कवींसोबत काय केले असेल? त्यांना मारून तर टाकले नसेल ना? माझं रडणं थांबता थांबत नव्हते.

दुसऱ्या दिवशी महाराणी माझ्यासाठी जेवण घेऊन आल्या. त्यांचा इथे येण्याचा उद्देश वेगळाच होता. त्या मला कवींचा नाद सोडून सेनापती सोबत लग्न करायला सांगत होत्या. त्या सेनापतीने ह्या सगळ्यांवर अशी काय जादू केलीय देव जाणे. मी कवींशिवाय कोणाचाही विचार करणे शक्य नाही, हे त्यांना बजावून सांगितले. त्या रागाने तश्याच तिथून निघून गेल्या. महाराज जर इथे असते तर त्यांनी माझं म्हणणं तरी ऐकून घेतलं असतं. इतके कठोर नसते वागले ते... महाराज... कुठे आहात तुम्ही? पण, आता महाराज आलेत की, जे काही ही लोकं त्यांना सांगतील तेच ते खरे मानणार.

मला त्यांनी तिथेच कैद करून ठेवले. कक्षात बसून मी कवींच्या आठवणीत आमची शेवटची अपूर्ण कविता लिहून काढली. रात्री एक दासी माझ्यासाठी जेवण घेऊन आली. मला काहीच खाण्याची इच्छा नव्हती, म्हणून मी तिच्याकडे बघितले सुद्धा नाही.

" जेऊन घ्या राजकुमारी, जेवणात आज तुमचे आवडते पदार्थ आहेत आणि सोबतीला तुमच्या जिभेसोबत मनही तृप्त होईल असं काही तरी देखील आहे."
ताट खाली ठेवत ती मला म्हणाली.

तिचे शेवटचे वाक्य ऐकून मी तिच्याकडे पाहिले.मी तिच्याकडे पाहताच तिने माझ्या डोळ्यांमध्ये पाहून डोळे मिचकावले. तिला नक्कीच काही तरी सांगायचे होते. बाहेर सैनिक तैनात असल्यामुळे ती मोकळे पणाने काही बोलू शकत नव्हती. पण, तिच्या बोलण्यावरून मला इतके समजले की, जेवणासोबत काही तरी आहे.

" मी जेवते तू जा, आणि दरवाजा नीट बंद करून घे. थोड्या वेळाने ताट घ्यायला ये."
मी तिला म्हणाले.

माझं बोलणं ऐकून ती निघून गेली. ती गेल्यावर मी तिने आणलेले ताट जवळ घेतले. त्यात नीट पाहिले पण, माझ्या कामाचे असे काहीच दिसत नव्हते. मग मला तिचे बोलणे आठवले. माझ्या आवडीच्या पदार्थासोबत काही तरी आहे. माझा आवडीचा पदार्थ म्हणजे भात हे सगळ्यांना माहित होतं. ताटात मला भात दिसला मी त्यात हात टाकून तो थोडा बाजूला केला तर मला त्यात एक चिट्टी मिळाली. मी ती बाहेर काढून वाचू लागले.

ती चिट्टी वाचताना माझ्या काळजाचे पाणी पाणी होत होते. त्यात लिहिले होते की, महाराणी आणि सेनापतीने मिळून अगदी निर्घुणपने कवींच्या हत्येचा कट रचलाय. ते त्यांच्या कोठडीत किती तरी विषारी किटके सोडणार आहेत. ज्यामुळे कवींचा हळू हळू आणि खूप वेदना दायक पद्धतीने मृत्यू होणार आहे. ते वाचून माझ्या पाया खालची जमीनच सरकली.

त्यांचा गुन्हा तरी काय? माझ्यासाठी ते इतकं सगळं सहन करत आहेत. हे सगळं वाचून माझं डोकंच सुन्न झालं. त्यांना मारायचं म्हणून त्यांनी उद्या सगळ्या सैनिकांना मेजवानी घातली. किती निर्दयी लोकं आहेत.

मी लगेचच स्वतःला सावरले. डोक्यात काही तरी योजना आखली आणि कागदावर लिहून काढली आणि तो कागद भाताच्या मध्ये ठेवून भाताने झाकला आणि तिची वाट पाहू लागले. काही वेळाने दार उघडून ती आत आली.

" माझा आवडीचा पदार्थ खाण्याची आज माझी इच्छा नाही आणि माझ्या माणजवळीची गोष्ट देखील मला नको आहे."
ती आत येताच मी तिला म्हणाले.

मला काय म्हणायचं होतं ते तिला नीट समजलं ती ताट उचलून तिथून निघून गेली. दुसरा दिवस उगवला. मला रात्रभर झोप लागली नाही. मी दिवसभर याच विचार झुरत राहिले. बघता बघता रात्र झाली. मी ठरवलेल्या योजनेची सुरुवात करायची वेळ झाली होती. मी खिडकीत कवींच्या घरच्या दिशेला पाहत उभी राहिले. कवींना बघायची माझी खूप इच्छा झाली होती. त्यांचा हा विरह मला सहन होत नव्हता.

शेवटी तो क्षण आला. कवी माझ्या नजरे समोर आले. मी त्यांना मनभरून पाहू लागले. ते देखील मला प्रेमाने पाहत होते. त्यांच्या मनाला झालेला आनंद मला त्यांच्या नजरेतून समजत होता. पण, माझ्या डोळ्यांमध्ये मात्र निराशाच होती.

पुढच्याच क्षणी मी बाजूला असलेला धनुष्य हातात घेतला. त्यावर बाण चढवून मी त्याच्या दिशेला रोखून धरला. माझे डोळे अश्रूंनी भरले. ते देखील आता समोर शांतच होते.

' मला माफ करा कवी...'
स्वतःशी इतकंच बोलून मी बाण सोडला जो त्यांच्या छातीच्या आर पार गेला. आणि ते खाली कोसळले. ते बघून मी स्वतःला सावरू शकले नाही. मी तशीच मागे फिरून कक्षातला पेटता दिवा घेतला आणि माझ्या साडीला लावला. माझ्या साडीने पेट घेताच, मी आरडा ओरडा केला त्यामुळे बाहेर उभे असलेले सैनिक लगेच दरवाजा उघडून आत आले. मी कसलाच विचार न करता त्यात बाहेरच्या बाजूला धावत सुटले. माझे संपूर्ण शरीर हळू हळू पेट घेत असल्यामुळे कोणी मला हात लावायला पुढे आले नाही.

मी तशीच धावत धावत कवींजवळ पोहोचले. ते तसेच जमिनीवर कोसळले होते. त्यांची हालचाल होत नसली तरी. त्यांचा श्वास अजूनही चालू होता. जणू ते माझ्यासाठीच थांबले होते. मी तशीच त्यांना जाऊन बिलगले. आमच्या दोघांच्याही शरीराने पूर्णपणे पेट घेतला. आमचे शरीर जळत असले तरी आत्मा मात्र तृप्त झाला होता.

" मला माफ करा कवी... ह्या जन्मात तरी ह्यांनी आपल्याला कधीच एक होऊ दिलं नसतं. म्हणून मला हे करावं लागलं. आणि तुम्ही ह्या जगात नसलात तर मलाही जिवंत राहून काही उपयोग नव्हता. आपली प्रेम कथा नक्कीच पूर्ण होणार. जेव्हा आपली अपूर्ण राहिलेली कविता पूर्ण होईल तेव्हाच आपली ही अपूर्ण प्रेम कथा देखील पूर्ण होईल."
मी त्यांना बाहुपाशात घेऊन म्हणाले. आम्ही दोघे एकत्र अग्नीत जळून ब्रम्हांडात विलीन झालो, पुन्हा भेटण्यासाठी...!

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all