Login

ओळखीचे शब्द...! | भाग ५२ (अंतिम)

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ५२ (अंतिम)

वेदांश

२०१५ चा काळ मुंबई.

चंद्राच्या शीतल छाये खाली, जवळी तुमच्या आले.
मिठीत येऊनी सजना तुमच्या, तुमचीच होऊनी गेले.

सौंदर्य तुमचे पाहताना, लाजला बघा चंद्रही नभी.
जवळूनी पाहुणी तुम्हा, मिठीत घेण्या जाहलो लोभी.

मिठीत तुमच्या विसरुनी गेले, सजना जग हे सारे.
अंतर मनामध्ये आता आपुल्या, वाहू द्या प्रेमाचे वारे.

प्रेमाची भावना मनी जागली, तुम्हा पाहताच क्षणी.
त्याच क्षणापासून मनात माझ्या, साठवल्या गोड आठवणी.

तुमच्या आधीच मी पाहिले तुम्हा, पाहुनी झाले वेडी.
समजेना झाले बोलू कशी, कशी लावू लाडी गोडी.

म्हणुनी माझ्यासाठी तेव्हा, लिहिल्या दोन ओळी गोड.
त्याचं क्षणी प्रिये वाटली होती, माझ्या वेड्या मनी ओढ.

ओढ वेड्या मनांची आपणास, जवळ घेऊनी आली.
जवळी येऊनी सजना प्रेमाच्या, पर्वास सुरुवात झाली.

पर्व सुखद प्रेमाचा तरी, मनी वाटे दुराव्याची भीती.
या जन्मी होऊ का एकात्म? मनी प्रश्न माझ्या किती.

कविता... आमची अपूर्ण कविता... राजकुमारी सुलेखा? उदासीन आवाजात मला पुसटसे शब्द कानावर ऐकू आले. पण, हे काय? नुसते शब्दच ऐकू येत आहेत. मला काही जाणवत का नाही? शुद्ध देखील नाही? सगळीकडे अंधार अंधार पसरला आहे. तेव्हा पसरला होता तसाच...! मी परत मेलो तर नाही ना? नाही असं कसं शक्य आहे. हा जन्मच आम्ही एक होण्यासाठी घेतला होता. मग पुन्हा आमचं हे मिलन अर्धवट कसं राहील? राजकुमारी सुलेखा... अदिती... तिचा रडण्याचा आवाज मला ऐकू येतोय. ती का रडते?

" दुरावा जरी आला तरी, नाही होणार मी कोणाची.
जन्मोजन्मी राहील सजना , मनी ओढ तुझ्या भेटीची."

" कवी उठा, आपल्याला आपली अपूर्ण राहिलेली कविता, पूर्ण करायची आहे. माझी ओळ पूर्ण झालीय. आता तुमची ओळ पूर्ण करून तुम्हाला कविता पूर्ण करावीच लागेल, कवी तुम्हाला आपल्या प्रेमाची शपथ आहे. तुम्ही पुन्हा मला असे सोडून नाही जाऊ शकत."
कवितेची पुढची ओळ म्हणून, मला उठण्यासाठी अदिती रडत म्हणाली.

तिच्या रडण्याने माझे काळीज तुटत होते. मनाला दुःख होत होते. वाटत होतं उठून तिचे डोळे पुसू, तिला घट्ट मिठीत घेऊन त्यात हरवून जाऊ. पण, मला हे का शक्य होत नाही आहे? मला तिला पुन्हा गमवायचं नाही. मी शांत होऊन पुन्हा आमची अपूर्ण कविता आठवू लागलो. त्या पुढे ती म्हणालेली ओळ आठवली.

" जन्मोजन्मीची साथ आपुली, कुठल्या एका जन्माची नव्हे.
प्रत्येक जन्मी एक होऊनी लिहूया,  आपण प्रेमाचे पर्व नवे."

माझ्या मनातून आमच्या अपूर्ण कवितेची ही शेवटची ओळ आपसुक माझ्या ओठांवर आली. आणि हळूच माझे डोळे उघडले. डोळे उघडताच मला समोर अदिती दिसली. माझे डोके मांडीवर घेऊन ती मला उठवण्याचा प्रयत्न करत होती.

माझे डोळे उघडल्याचे कळताच तिच्या ओठांवर स्मित उमटले. किती तरी गोड दिसत होती ती... तिला बघताच क्षणी मी तिच्यात हरवून गेलो. पुन्हा आमच्या जुन्या आठवणींमध्ये वाहून गेलो. हळूच माझा हात तिच्या चेहऱ्यावरून फिरवला.

" राजकुमारी..."
माझ्या मुखातून आपसुक शब्द बाहेर पडला.

" होय कविराज... आपली अपूर्ण कविता आज पूर्ण झाली. आपल्याला आता कोणीच वेगळे करू शकत नाही. आपल्या कविते सोबत आपले प्रेम पूर्ण झाले कवी...!"
बोलताना तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले.

आनंदाचे अश्रू होते ते. तिच्या डोळ्यांमधून ते उष्ण अश्रू थेट माझ्या चेहऱ्यावर पडत होते. माझ्या डोळ्यांमधून देखील तेच आनंदाचे अश्रू वाहू लागले. आम्हाला आजुबाजूची कसलीच जाण नव्हती.

पुढच्या क्षणी माझ्या कानावर आजूबाजूला असलेल्या माणसांचा आवाज ऐकू आला. म्हणून मी नजर फिरवून बाजूला बघितले तर, तिथे पोलिस उभे होते. मी वाचल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित होते.

" ठीक आहे साहेब, आम्ही त्या गुन्हेगारांना चौकीत पोच करतो. ह्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी काही मदत  लागेल का तुम्हाला?"
त्यातील एक पुलिस दुसऱ्या बाजूला असलेल्या कोणाला तरी उद्देशून म्हणाला.

" नाही तुम्ही निघा मी आणि अदिती त्याला घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये. तुम्ही वेळेत येऊन आमची मदत केलीत ह्यासाठी तुमचे खूप खूप आभार."
त्या दुसऱ्या व्यक्तीचा माझ्या कानावर आवाज पडला. ते पाठमोरे उभे असल्यामुळे मला त्यांचा चेहरा दिसत नव्हता.

" आभार कसले... हे तर आमचे कर्तव्य आहे. आता ह्या पकडलेल्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्याचे कर्तव्य आमचे. चला निघतो आम्ही, काळजी घ्या ह्यांची."
ते सगळे पोलिस आमचा निरोप घेऊन निघाले.

पोलिस तिथून निघाल्यावर त्या व्यक्तीने मागे वळून माझ्याकडे पाहिले आणि मी अचंबित झालो.

" महाराज..."
आपसुक माझ्या ओठांमधून शब्द बाहेर पडले.

" होय कवी, मी अदितीचा बाबा. त्या जन्मात मला तुमच्या प्रेमासाठी काही करता आले नाही. म्हणूनच देवाने मला ही संधी मला या जन्मात दिली जी मी पूर्णपणे पार केली याचा मला आनंद आहे.

तेव्हा माझ्या अनुपस्थितीत तुम्हा दोघांसोबत चांगले नाही झाले. मी परत आल्यावर मला तुमच्याबाबत बऱ्याच चुकीच्या गोष्टी सांगण्यात आल्या. पण, नंतर मी माझा माझा शोध लावल्यावर मला सत्य समजले आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रेमासाठी माझे काळीज तुटले. त्यांना नंतर त्यांच्या कर्माची फळे मिळाली. त्यांच्या कर्मामुळे संपूर्ण राज्य उद्वस्थ झाले."
ते आम्हाला आमच्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात देत म्हणाले.

" पण बाबा, आता इथे तुम्हाला इथे आमच्या विषयी कसे समजले? तुम्ही इथे वेळेत कसे पोहोचलात?"
अदितीने त्यांना प्रश्न केला.

" मी बाहेर गेल्यावर काही तरी विसरल्यामुळे घरी परत गेलो. घरी पोहोचलो तर दरवाजा उघडाच होता. आतून कसला तरी आवाज येत होता. मी काही आवाज न करता गुपचूप आत गेलो. लपून ऐकू लागलो. तर तुझी सावत्र आई फोनवर हे सगळ कारस्थान शिजवताना मी ऐकले. ते ऐकून मला माझ्या मागच्या जन्माची आणि त्या जन्मातल्या महाराणीची आठवण झाली. मग मी लगेचच हवे ते पाऊल उचलून हे सगळं घडवून आणले. आता तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. तुम्हाला आता कोणी वेगळं करू शकत नाही. मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे."
ते स्मित करत आम्हाला म्हणाले.

मी त्यांचे हात जोडून आभार मानले. मग आम्ही तिथून त्यांच्या गाडीने हॉस्पिटलला पोहोचलो. माझ्यावर हवे ते उपचार करून मग त्यांच्याच गाडीने आम्ही थेट मुंबईला माझ्या घरी पोहोचलो. मला उशीर झाल्यामुळे आईला काळजी नको म्हणून मी आधीच अदितीच्या फोनवरून तिला घरी येत असल्याचं कळवलं. माझा फोन पाण्यात भिजून खराब झाला होता.

काही तासात आम्ही प्रवास करून घरी पोहोचलो. आम्हाला घरी पोहोचायला रात्र झाली. घरी पोहोचल्यावर माझी अवस्था बघताच आईच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. तिचे प्रश्न सुरू झाले. तिला कसलं टेन्शन नको म्हणून, आम्ही ठरवल्या प्रमाणे माझा छोटासा अपघात झाल्याचं तिला सांगितलं.

मी ठीक असल्याचं पाहून तिला समाधान वाटलं. मग तिची अदिती आणि तिच्या बाबांशी ओळख करून दिली. ओळख करून देतानाच आमच्या मनातलं आणि आमच्या मधील नातं तिला लगेच समजले. तिने तिला बघताच क्षणी सून म्हणून स्वीकार केले. शेवटी आई आहे ती...!

" अपूर्ण प्रेम आमुचे, या जन्मी पूर्ण झाले.
अनोळखी वाटणारे शब्द, ओळखीचे झाले."

समाप्त.

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all