Login

फिरुनी मी तुझ्या प्रेमात (भाग -१)

Love In Second Inning Of Life
' अरे देवा!  चक्क साडे सात वाजून गेले.  आज इतका उशीर कसा काय झाला मला उठायला?   नेहमीप्रमाणे रात्री सहाचा मी अलार्म लावूनच झोपले होते. 

अलार्म झाला नाही की काय?  महेशने तरी मला उठवून जायचे होते न?'

देवकीला उशिरा जाग आली होती.   तिने समोरच्या भिंतीवरच्या घड्याळात पाहिले, तशी ती अंथरुणातून ताडकन उठली अन् स्वतःशीच बडबडत अंघोळीला गेली.  उठताना तिच्या कंबरेतून बारीकशी कळ निघाली पण तिने त्यावर हात ठेवून निभावून नेलं.

तिला माहित होते, महेश कोणत्याही क्षणी घरात येईल.  त्याची येण्याची वेळ झाली होती.  सकाळी सकाळी वॉक करून आल्यानंतर, त्याची दहा मिनिटात अंघोळ उरकली की अकराव्या मिनिटाला त्याला चहा आणि नाष्टा हातात हवा असतो.

" सुप्रभात डार्लिंग " ती अंघोळ करून बाथरूम मधून बाहेर आली, तसे महेश चहाचा कप घेऊन तिच्या समोर हजर झाला.

त्याच्या आवाजाने ती अक्षरशः दचकलीच.  आज दिवस नक्की कुठून उगवला आहे की अजूनही ती झोपेतच आहे, याची तिने स्वतःलाच चिमटा काढून खात्री करून घेतली.

" मॅडम, आपण पूर्णपणे जागे आहात अन् मी आपल्यासाठी, आपल्याला हवा तसा, आल्याचा कडक स्पेशल चहा केला आहे. "

" महेश ... तू?  ... चहा? ....  खरचं  ...  तू माझ्यासाठी चहा केलास?  मला अजूनही विश्वास बसत नाही." 

ती अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातून सावरली नव्हती.

" होय देवी!  तुला विश्वास बसणे कठीण आहे परंतु तुला आता विश्वास ठेवावा लागेल.  कारण मी तुझ्यासाठी नास्त्याला पोहे सुद्धा केलेत.  बाहेर चल.  नाष्टा तुझी वाट पाहतोय."  तो, तिला डायनिंग टेबलच्या दिशेने हात दाखवत म्हणाला.

देवकीच्या डोळ्यातून अश्रू ओघळायचेच बाकी राहिले होते.  तिला महेशला नक्की कशी प्रतिक्रिया द्यावी समजत नव्हते. 

इतक्या वर्षात, घरात कोणी आयता चहा हातात आणून दिल्याचा अनुभवच तिला आला नव्हता.  त्यामुळे आज, तिच्या हातात त्याने चहाचा कप देऊन, नाष्टाही तयार ठेवला या जाणिवेने तिला उचंबळून आले होते.

खरंतर, महेशला उत्तम स्वयंपाक येतो.  हे तिला माहित होते.  त्याच्या आईनेच, तो हॉस्टेलमध्ये रहायाला जाण्यापूर्वी, बऱ्याच रेसिपीज्‌ त्याला शिकवल्या होत्या.  लग्नाआधीही त्याच्या आईच्या आजारपणामुळे, त्याचा किचनमध्ये, स्वयंपाकाला ठेवलेली बाई आली नाही किंवा सुट्टीच्या दिवशी वावर असायचा. 

परंतु लग्नानंतर त्याने एकदाही काही बनवायच्या उद्देशाने, किचनमध्ये पाऊल ठेवले नव्हते.  एव्हाना तो स्वयंपाक उत्तम बनवतो हे दोघांच्याही विस्मरणात गेले होते.

" महेश, तू आज असा का वागतोयस?  आज मला सकाळी जागही आली नाही.  रात्री तर मी अलार्म लावून ठेवला होता तरीही ... "  ती एकूण प्रकारामुळे इतकी गोंधळली होती की तिला काय बोलावे तेही सुचत नव्हते.

" रिलॅक्स देवी!  तू रात्री अलार्म लावला होतास, परंतु मीच तो बंद करून ठेवला होता."

" का?" ती जवळजवळ किंचाळलीच.

" कारण आज मला, तुला आरामात उठलेले पाहायचे होते.  तुला दिवसाचा पहिला चहा हातात मिळाल्याचा, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला टिपायचा होता.  तुला असे निवांत बसलेले पाहायचे होते.  म्हणून मी तुझ्यासाठी चहा आणि नाष्टाही केला. 

" थँक्यू महेश!  पण खरं सांगू, मला या सगळ्याची सवय नाही.  त्यामुळे मला खूप अवघडल्यासारखे झाले आहे."  ती प्रांजळपणे त्याला म्हणाली.

" मग यापुढे तुला ती करावी लागेल.  आज आपण दोघे डेट वर जातोय.  लवकर तयारी कर."

" आज हे तुला, अचानक कसले खुळ सुचले आहे?  वयाचा विसर पडला आहे का तुला?"

" काय असे वय झाले माझे ग ?  वयाची बासस्टी झाली असेल, पण मनाने अजूनही मी तरुण आहे.  अन् तू तर माझ्यापेक्षाही जवान आहेस."

" आज काय तुझा भलताच मुड दिसतोय पण मला सांग, इतक्या वर्षात तू मला माझ्या वाढदिवसाला सुद्धा कधी बाहेर घेऊन गेला नाहीस अन् आज अचानक तू मला इतकी स्पेशल ट्रीटमेंट का देत आहेस? 

काय झाले आहे का?  नक्की मला कळेल का काय ते?"  तिने न राहवून त्याला विचारले.

" कळेल ... कळेल ... तू आवर लवकर."  तो बेफिकीरपणे बोलून गेला.

" काय कळेल?  आज कित्येक वर्षानी तू मला देवी हाक मारलीस.  याआधी तू कधी देवी हाक मारली होतीस, मला आठवतही नाही. 

काय झाले आहे नक्की?  मला प्लीज सांग.  उगीच मला आता टेन्शन यायला लागले आहे."  देविका त्याला काळजीने विचारत होती.

" सर्व सांगेन ... आधी तू तयारी तर करायला घे."

.
.
.
.


महेशच्या अशा वागण्यामागे नक्की काय कारण असेल?  तो नक्की तिला काय सांगणार असेल?  पाहूया पुढच्या भागात ....

.
.
.

©® विद्या थोरात काळे "विजू"