ईरा – चॅम्पियन्स ट्रॉफी – २०२५
जलद कथालेखन : ग्रुप ४ – (संघ – कामिनी)
जलद कथालेखन : ग्रुप ४ – (संघ – कामिनी)
एकतर्फी अन्याय भाग २
डॉक्टरांनी स्पष्टच कल्पना दिली होती की ऑपरेशन करूनही कोमात गेलेल्या तुमच्या पेशंटच्या परिस्थितीत फारशी सुधारणा होणार नाहीये. निर्णय अमितने घ्यायचा होता.
“पाच टक्के चान्स आहे ना डॉक्टर? मग कराच ऑपरेशन.” अमितने ठामपणे सांगितलं आणि अंजलीनेही आशेने त्याला दुजोरा दिला. धाकट्या भावंडांच्या येण्याची वाट न बघता त्याने डॉक्टरांना ‘गो अहेड’ दिलं. पैशांची सगळी जुळवाजुळव केली आणि ऑपरेशन पार पडलं. ते यशस्वी झालं असं डॉक्टर म्हणाले तरी मनोहर अजूनही शुद्धीवर आलेले नव्हते. कधी येतील? येतील की नाही? हे प्रश्नही अनुत्तरित होते.
अमितची धाकटी भावंडं सुमित आणि मनाली बातमी समजताच धावत आली खरी; पण तिथली एकंदरीत परिस्थिती बघता दोघांनीही तिकडून काढता पाय घेतला. सुमितने रजा नाही म्हणत आपली असमर्थता उघड केली आणि मनालीकडे नेमके तिचे सासू-सासरे राहायला आले होते, सासूबाईंच्या कसल्याशा टेस्ट्स करायच्या आहेत म्हणून. सासरच्या जबाबदाऱ्या सोडून ती इकडे कशी काय राहू शकत होती? दोघांनीही अमितला आपली हतबलता पटवून दिली.
इतकंच नाही तर अमितने आगाऊपणे आपल्या वडिलांच्या ऑपरेशनचा निर्णय एकट्याने घेतला, सुमितचं मत विचारायलाही थांबला नाही म्हणून सुमित नाराज झाला होता. त्याने उघडपणे ते बोलून दाखवलं नाही; पण आपल्या डोक्यावर त्या खर्चाचं ओझं नको म्हणून मोठ्याला आडवळणाने सुचवलं.
“दादा, तुलाही घर, आईचं आजारपण आणि बाबांचं हॉस्पिटल झेपणारं नाहीये. डॉक्टर नको म्हणत होते तरी तू त्यांचं ऑपरेशन केलंस; पण त्यांच्यात सुधारणा होणार नसेल तर उगीच इथलं बिल आणखी कशाला वाढवतोस? सध्या माझा हात आखडता आहे. उगीच माझ्या जीवावर हे असलं काही करू नकोस.”
“आणि मला तर तू अजिबातच गृहीत धरू नकोस.” मनालीने त्याची री ओढली आणि पुढे म्हणाली, “आम्हालाही सासूबाईंचा खर्च आहे. मी तर सांगेन तू दोन चार दिवसांनंतर बाबांना सरळ घरीच घेऊन जा, तेच योग्य असेल.”
अमितने आपली नाराजी लपवत त्यांना उत्तर दिलं, “बघतो डॉक्टर काय म्हणतात ते. मी त्यांच्या सल्ल्यानुसारच काय तो निर्णय घेईन आणि तुम्ही दोघं खर्चाची काळजी करू नका. मी पैशांची सोय केलीय, तुमच्याकडे मागावे लागणार नाहीत.”
अमितच्या बोलण्यावर जास्त चर्चा न करता दोघांनीही परस्परच परतीचा रस्ता धरला होता आणि डॉक्टरांच्या सांगण्यावरून अमितने कोमात असलेल्या मनोहररावांना आठ दिवसांनी डिस्चार्ज करुन घरी नेलं; पण अवघ्या दोन दिवसांतच त्यांचा श्वास थांबला. त्यांच्या लाडक्या मालतीसोबतचा चाळीस वर्षांचा सहवास संपवत त्यानी जगाचा निरोप घेतला. नाकाला ऑक्सिजन लावलेला असतानाही मनोहररावांचे श्वास थांबले कसे? ह्या मुद्द्यावरून गेल्या तेरा दिवसांपासून बरीच कुजबुज सुरू होती. त्याला आज सुमित आणि मनालीच्या बोलण्याने नकळत वाचा फुटली. हे बोलणं दारात उभ्या असलेल्या अंजलीच्या कानावर आलं. तिला लाजेने मेल्याहून मेल्यासारखं झालं. आपल्या बोलण्याने आईचं मन व्यवस्थित कलुषित झालंय ह्याची खात्री पटल्यावर दोन्ही भावंडं साळसूदपणे तिकडून पाय काढते झाले.
इतक्यात त्यांच्या कानावर आईची कातर हाक आली, “थांबा...”
स्वतःशीच हुश्श करत बाहेर पडणारे तिघेही आईच्या हाकेने गोंधळून जागीच थांबले. दाराशी उभ्या असलेल्या अंजलीच्या अंगावर तर सर्रकन काटाच आला. आता आपण आत जावं की मागच्या पावली परत जावं? ह्या संभ्रमात असलेली अंजली काही न सुचून तिकडेच उभी होती.
“काय झालं आई?” सुमितने पुढे येऊन विचारलं.
“तुमची दोघांची काळजी मला समजतेय. हे गेल्यापासून माझ्याही कानावर काहीबाही येतंय; पण त्यावर विश्वास ठेवायला मन तयार नाहीये.” त्या शांतपणे बोलल्या.
“आग असल्याशिवाय का धूर येतो आई!” वीणा पटकन बोलली आणि मालतीबाईंचा नाराजीचा कटाक्ष पाहून गप्प बसली. जीभ चावून तिने ‘सॉरी’ म्हटलं.
तिच्या आगाऊपणाबद्दल आजवर अनेकदा मालतीबाईंनी तिला टोकलं होतं; पण वीणा सुधारणार नाही हे त्याही ओळखून होत्या. तिच्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपलं बोलणं पुढे सुरू ठेवलं.
तिच्या आगाऊपणाबद्दल आजवर अनेकदा मालतीबाईंनी तिला टोकलं होतं; पण वीणा सुधारणार नाही हे त्याही ओळखून होत्या. तिच्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपलं बोलणं पुढे सुरू ठेवलं.
“आणि म्हणून मी एक निर्णय घेतलाय.” तिघांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत मालतीबाई एक एक शब्द अगदी विचार करून बोलत होत्या.
अंजलीला अजूनच अपराधी वाटू लागलं. आपल्या सासऱ्यांच्या मृत्यूसाठी सगळेच आपल्याला जबाबदार धरतायत ह्या गोष्टीची तिला जाणीव होती; पण ते गेल्यापासून अमित आणि सासूबाईंनी तिला एका शब्दानेही दोष दिला नव्हता आणि म्हणूनच मनोहररावांच्या दिवसकार्यात तिने नातेवाईकांच्या नजरांकडे दुर्लक्ष करत आपली सगळी कर्तव्यं चोख बजावली होती; पण सासूबाईंचं आताचं बोलणं ऐकून अंजलीच्या मनाला प्रचंड यातना झाल्या. ती परत जायला वळली इतक्यात मालतीबाईंनी तिला आवाज दिला.
काय असेल मालतीबाईंचा निर्णय?
क्रमशः
© स्मिता प्रकाशकर
© स्मिता प्रकाशकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा