ईरा – चॅम्पियन्स ट्रॉफी – २०२५
जलद कथालेखन : ग्रुप ४ – (संघ – कामिनी)
जलद कथालेखन : ग्रुप ४ – (संघ – कामिनी)
एकतर्फी अन्याय भाग ३
सुमित आणि मनालीने आपल्या वहिनीबद्दल आईचं मन कलुषित केलं. दोघांचं बोलणं ऐकून मालतीबाईंनी मनाशी काहीतरी ठरवलं आणि अंजलीला आदेश दिला,
“अंजली, बॅग भरायला घे, आत्ताच्या आत्ता!”
“अंजली, बॅग भरायला घे, आत्ताच्या आत्ता!”
हे फर्मान ऐकून सुमित आणि मनालीच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.
“आईने अंजलीला दोषी ठरवलं तर तिच्या पाठोपाठ दादाही घरातून जाईल. म्हणजे हे सगळं आपल्या दोघांचंच.” मनाली सुमितला जरा बाजूला घेत त्याच्या कानाशी कुजबुजली तशी वीणा चपापली.
“ए बाई, त्या गोष्टी पुढच्या आहेत. ही बया इथून गेली तर आईंचं कोण करेल? तू येऊन राहणार आहेस?” वीणाने मनालीच्या आनंदावर विरजण टाकलं खरं; पण तिच्या बोलण्यात तथ्य आहे हे बाकीचे दोघंही समजून होते.
सासूचं करायला लागू नये म्हणून तर मालतीबाईंना अर्धांगाचा झटका आला तेव्हा तिने नवऱ्याच्या मागे वेगळं व्हायचं टुमणं लावलं होतं. बायकोला वाईटपणा यायला नको म्हणून सुमितने शहरात बदली मागून घेतली होती. सुमित बायकोला वचकून होता. संपत्तीतला वाटेकरी परस्पर दूर होईल म्हणून एकीकडे त्याला आनंद झाला होता. तर आपली बायको आईच्या दिमतीला राहायला राजी होणार नाही हेही तो जाणून होता. कोणत्या बाजूने कौल द्यायचा हे त्याला समजत नव्हतं. इकडे यांची खलबतं सुरू असताना अंजली मात्र अपराधी भावनेने मान खाली घालून उभी होती.
इतक्यात मालतीबाईंनी अंजलीला पुन्हा आवाज दिला, “अगं इथेच काय उभी आहेस? जा, बॅग भर.”
आईच्या करड्या सुरातल्या आदेशाने सुमित गडबडला.
“आई, इतका तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. आजच्या दिवशी वहिनीला घराबाहेर काढलंस तर लोकांच्या मनातल्या शंकेला खतपाणी घातल्यासारखं होईल. आता खरंखोटं काय ते देवाला माहीत! तू कशाला उगीच वाईट होतेस?” सुमितने वीणाच्या मनावरचं मणभर ओझं कमी करण्यासाठी आईला थोपवलं.
“अंजलीला कोण घराबाहेर काढतंय?” मालतीबाईंनी थंड सुरात विचारलं.
“पण मग तू वहिनीला बॅग भरायला सांगतेयस ते?” मनालीने नाराजीनेच विचारलं.
मालतीबाईंच्या मनात नक्की काय सुरू आहे ह्याचा कोणालाही थांग लागत नव्हता. अगदी अंजलीलासुद्धा! तीही बाकीच्यांसारखी गोंधळून आपल्या सासूकडे बघू लागली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्हं मालतीबाई आलटून पालटून वाचत होत्या.
“मी माझी बॅग भरायला सांगतेय हिला.” त्या शांतपणे बोलल्या.
“काय! तुझी बॅग? तू कुठे जातेयस?" इति मनाली.
“आई काय म्हणून हे घर सोडून जाईल? बाबांनी हिच्या नावावर घर केलंय विसरलीस तू मनाली?” सुमितने आईची मखलाशी करण्याच्या प्रयत्न केला.
“अरे पण मग ही वहिनीला हिची बॅग का भरायला सांगतेय?”
“तुम्हाला दोघांनाही वाटतंय ना, मी इकडे सुरक्षित नाहीये. म्हणून मी तुमच्यासोबत येतेय.”
“काय?” सुमितने घाबरतच विचारलं. “आमच्यासोबत म्हणजे?”
“तुमच्या दोघांसोबत. पहिले सहा महिने मी तुझ्याकडे राहीन सुमित आणि त्यापुढचे सहा महिने मनालीच्या घरी. चाळीस वर्षं आम्ही ह्या घरात सोबतीने घालवली. सुख-दु:ख एकत्र वाटून घेतलं. हे गेले, आता मला इकडे रहावसं वाटत नाही.” त्यांनी आपला निर्णय ऐकवला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अंजलीच्यासुध्दा!
मालतीबाईंनी घर सोडून आपल्या मुलांकडे जायचा विचार बोलून दाखवला आणि सुमित, मनालीच्या तोंडचं पाणी पळालं.
अंजलीसाठी तर हा धक्का न पेलणारा होता. आता मात्र तिचा बांध फुटला आणि तिने धावत जाऊन सासूचे पाय धरले.
“आई, मी नाही हो मारलं बाबांना. तुमची शप्पथ. निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा ना.” ती धाय मोकलून रडायला लागली आणि मनाली चवताळून आपल्या थोरल्या वहिनीच्या अंगावर धावून गेली.
“पुरे कर तुझी नाटकं वहिनी. माझ्या बाबांचा जीव घेतलास आता आईची खोटी शपथ घेऊन हिच्या जीवावर उठलीस तू? तुझ्या सोबत राहायचीसुद्धा भीती वाटतेय आईला; पण लक्षात ठेव, ही एकटी नाहीये. आम्ही आहोत आमच्या आईच्या पाठीशी.” मनाली तोंडाला येईल ते बरळत होती. मनालीचा चढलेला आवाज ऐकून अमितसुद्धा तिकडे आला. आईच्या पायाशी बसलेली आपली बायको आणि तिच्यावर ओरडणारी बहीण हा प्रकार पाहून सुन्न झाला.
“मनाली, बाहेरपर्यंत आवाज येतोय तुझा. भेटायला आलेले लोक आहेत अजून ह्याचं तरी भान ठेव.” त्याने बहिणीला समज दिली.
“आई, काय झालं? मनालीची आरडाओरड का चाललीय? आणि ही अंजली का रडतेय?” त्याने शेवटी आपल्या आईकडे विचारणा केली.
“आईला काय विचारतोयस दादा? मी सांगते. बाबांच्या मरणाला तुझी बायको जबाबदार आहे आणि हे मीच म्हणत नाहीये. आईलासुद्धा हिच्यावर संशय आहे. म्हणून आईने आता आमच्या दोघांकडे राहायचं ठरवलंय; पण एक लक्षात ठेव, ह्या घरावर आईचा हक्क आहे. तुम्ही दोघांनी इस्टेटीसाठी आईला काही करायचा प्रयत्न केला, तर ह्यावेळी आम्ही गप्प बसणार नाही.” मनालीने एका दमात सांगून टाकलं. अमित अविश्वासाने आईकडे बघू लागला.
“नाही, खोटं आहे हे. आई, तुलाही खरंच असं वाटतंय?” त्याने विषादाने आईला विचारलं.
मालतीबाईंना सुमित-वीणा किंवा मनाली आपल्या घरी घेऊन जातील? अंजलीने आपल्या सासऱ्यांचा जीव घेतला असा आरोप का केला जातोय? पाहू या पुढच्या भागात...
क्रमशः
© स्मिता प्रकाशकर
© स्मिता प्रकाशकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा