Login

एकतर्फी अन्याय -भाग 4

Ektarfi Anyay
ईरा – चॅम्पियन्स ट्रॉफी – २०२५
जलद कथालेखन : ग्रुप ४ – (संघ – कामिनी)

एकतर्फी अन्याय भाग ४

मनालीने तर उघडपणे आपल्या वहिनीला गुन्हेगार ठरवलं. अंजली खरोखरच दोषी आहे? मालतीबाईंना पण तसंच वाटतंय? काय आहे मनोहररावांच्या मृत्यूचं सत्य?

“मला खरंखोटं करायचं नाहीये अमित; पण ह्यापुढे मी सुमित आणि मनालीकडे आलटून पालटून रहणार आहे. अंजली, आम्ही इथून गेल्यावर हवी तेवढी रड. आत्ता आधी माझी निघायची तयारी कर. मला घेऊन जाण्यासाठी सुमितला मुद्दाम पुन्हा रजा घेऊन यायला नको.” त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत फर्मान सोडलं.

सुमित आणि वीणा पुरते हादरले होते. अमित-अंजलीला आईच्या ह्या वागण्याचं कोडंच सुटत नव्हतं. मालतीबाईंनी अंजलीला करड्या नजरेने पुन्हा इशारा केला तशी ती रडत रडत तिकडून निघून गेली. अमितही चक्रावला.

“आई, तुला आम्ही गुन्हेगार वाटतोय, तर त्यासाठी हवी ती शिक्षा दे. आम्ही दोघंही ती भोगायला तयार आहोत. ह्या... ह्या घरासाठी आम्ही तुझं काही बरंवाईट करू असं वाटतंय का तुला? तू म्हणशील त्या कागदावर मी आत्ता सही करून द्यायला तयार आहे. बास, आम्हाला सोडून जाऊ नकोस.” अमित आईकडे अजिजी करत होता आणि त्याच्या दोन्ही भावंडांना मनावरचं मणामणाचं ओझं कमी झाल्यासारखं वाटू लागलं.

सुमित पुढे होऊन मानभावीपणे बोलू लागला, “दादा, तू म्हणतोयस म्हणून मी आईला सोबत घेऊन जात नाहीये. राहू देतो हिला इकडेच; पण मनु म्हणाली तसं आमचं तुमच्यावर बारीक लक्ष असेल हे विसरू नका. आम्ही बाबांना गमावलंय, आता आईला नाही गमवायचं. हिची नीट काळजी घेणार असलात तर सोडून जातो हिला इथे. काय वीणा बरोबर ना?” सुंठीवाचून खोकला जातोय म्हटल्यावर वीणाने जड मनाने होकार देत असल्याचा आव आणत मान डोलवली.

“तू खरंच सह्या करून द्यायला तयार आहेस? शब्द देण्याआधी तुझ्या बायकोला विचार.” मालतीबाईंनी अमितला रोखठोक विचारलं.

“अंजली माझ्या शब्दाबाहेर नाही आई, आम्हाला तुझ्याशिवाय काहीही नकोय.” आई आपल्यासोबत राहतेय ह्यातच त्याचं सुख होतं.

“ठीक आहे. सुमित, आजचा दिवस थांबा तुम्ही दोघं आणि अमित म्हणतोय तसं हक्कसोडपत्र करून घ्यायला वकिलांना बोलव. अमितच्या सहीबरोबरच बाकीचे हिशोबसुद्धा आजच चुकते करू या.”

“कसले हिशोब आई?” वीणाने पुन्हा एकदा नको तेव्हा नाक खुपसून माती खाल्लीच.

“तसं तर बरंच काही आहे ज्याचा हिशोब मांडायला बसले तर चार दिवस पुरायचे नाहीत. म्हणून आता आपण फक्त ढोबळ हिशोब मांडू या. म्हणजे साधारणपणे पाच वर्षांपूर्वी मी आजारी पडले आणि सुमितची नेमकी इथून बदली झाली. तेव्हापासून आज ह्यांच्या तेराव्यापर्यंत ह्या घरासाठी, आमच्या दोघांसाठी कोणी किती आणि काय काय केलं ह्याचा ताळेबंद तर मांडायला हवा. हक्क आणि कर्तव्यांची गोळाबेरीज शून्यावर आणायला हवी. त्याशिवाय नवीन सुरुवात कशी करणार आपण?” मालतीबाई एक एक शब्द बोलताना प्रत्येकाचा चेहरा वाचत होत्या.

“आई पण...” सुमितने त्यांना मधेच टोकलं तेव्हा त्यांनी हातानेच ‘थांब’ असा इशारा करत त्याला गप्प केलं.

“इतका वेळ तुमच्या सगळ्यांचं ऐकून घेतलं ना मी शांतपणे? आता फक्त मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचं.” चपराक बसल्यासारखा सुमित गप्प झाला.

मालतीबाई बोलू लागल्या, “मला पक्षाघाताचा झटका आला. बावीस दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळी घर आणि हॉस्पिटल सांभाळत अमित आणि अंजलीनेच धावपळ केली. ही वीणा तर माहेरी जाऊन बसली होती.” त्यांनी वीणाकडे रोखून बघितलं.

“माझ्या आईलासुद्धा तेव्हाच बरं वाटेनासं झालं होतं. म्हणून जावं लागलं मला. सुखासुखी नव्हते गेले मी.” वीणानेही लगेच आपली बाजू मांडली.

“इतक्या आजारी होत्या की त्यांना तुम्ही फिरायला घेऊन गेलात?”

“डॉक्टरांनीच सांगितलं होतं, आईला हवाबदलाची गरज आहे म्हणून‌.” वीणा काही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हती.

“हो, हो डॉक्टरांनीच इन्सिस्ट केलं होतं आईंना बाहेरगावी घेऊन जायला.” आता सुमित तिच्या मदतीला आला.

“हवाबदल? ‘लेह लडाख’ला? तुम्ही म्हणताय तर असेलसुद्धा. मी नाही म्हणत नाही. आता मुद्दा हा आहे की तेव्हा वीणा इथे नव्हती म्हणून हिची घरात काही मदत झाली नाही आणि मनालीने घरी राहूनसुद्धा ती केली नाही.”

“माझा अभ्यास होता आई. फायनल इयर होतं तेव्हा.” मनाली धुसफुसत बोलली.

“खरंय गं. खूप अभ्यास केलास तू. तीन विषयात एटीकेटी लागली होती तुला. शेवटचं वर्षं पूर्ण करायला दीड वर्षं लावलंस; पण तुमच्या मतलबी अंजली वहिनीने कुठलाही बहाणा दिला नाही, तक्रार केली नाही. माझं सगळं अगदी मनापासून करत होती ती. आजही करतेय.”

“आता त्या इकडे राहतात तर त्यांनीच करायला हवं ना आई? आम्ही राहिलो असतो तर आम्हीसुद्धा केलंच असतं की!” वीणाच्या रागाचा पाराही वाढू लागला.

“तेच तर! तुझ्या आईचा हवाबदल करून तुम्ही दोघं परत आलात आणि नेमकी सुमितची बदली झाली. आम्हाला अमित – अंजलीच्या जीवावर टाकून निघून गेलात तुम्ही. बरं, शारीरिक मदत नाही केली तर पैशाची मदत तरी कराल? तूच सांग सुमित, इतक्या वर्षांत माझ्या औषधपाण्यासाठी तू किती खर्च केलास? आहे उत्तर?”

मालतीबाईंच्या रोखठोक बोलण्याचे परिणाम काय होतील? सुमित आणि मनालीला आपली चूक समजेल? अंजली निर्दोष असल्याचं सिद्ध होईल?
मालतीबाईंनी सुमित आणि मनालीसमोर कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचा ताळेबंद मांडलाय. त्यातून नात्याची बेरीज हाती लागणार कि वजाबाकी?

क्रमशः
© स्मिता प्रकाशकर
0

🎭 Series Post

View all