ईरा – चॅम्पियन्स ट्रॉफी – २०२५
जलद कथालेखन : ग्रुप ४ – (संघ – कामिनी)
जलद कथालेखन : ग्रुप ४ – (संघ – कामिनी)
एकतर्फी अन्याय भाग ५ (अंतिम)
आईच्या प्रश्नाने सुमित खरंच निरुत्तर झाला होता.
“पण माझ्याकडे उत्तर आहे. अंजलीने माझी सेवा केली त्याचं मोल पैशात करता येणारच नाही. तरी हिशोब करायचा म्हटल्यावर एक अंदाज बांधावाच लागेल ना? मध्यंतरी तुमची मावशी ह्यांना बघायला आली होती. तेव्हा मी मुद्दाम तिला म्हटलं होतं, आता दोन दोन पेशंटचं करणं अंजलीला झेपणार नाही. ह्यांच्यासाठी प्रायव्हेट केअरटेकर बघ म्हणून. तिने चौकशी केली तेव्हा समजलं, अशा बायका चोवीस तासाच्या कामासाठी दिवसाचे दीड हजार रुपये घेतात म्हणाली. आता पाच वर्षांच्या हिशोबाने तुम्ही दोघांनी मिळून अंजलीला किती पैसे द्यायला हवेत त्याचा हिशोब मांडा नंतर.” सुमित, वीणा आणि मनाली निरुत्तर झाले होते.
“आई, जाऊ दे ना मागच्या गोष्टी. हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये.” अमित अजिजीने म्हणाला.
“हीच ती वेळ आहे अमित. गेली कित्येक वर्षं मनात साठलेलं आहे माझ्या. आज ह्या तिघांनीच विषयाला हात घातलाय तर सगळंच होऊन जाऊ दे.”
अमित अस्वस्थ झालेला.
“आता आपण अमितने केलेले खर्च बघू या. ह्याच्या एक एक रुपयाचा हिशोब लिहिलेला आहे माझ्याकडे.”
“दादा, तू आईच्या औषधांचा खर्च लिहून ठेवलास?” मनाली करवादली.
“ह्याने नाही, मीच लिहित होते. माझी डावी बाजू निकामी झालीय मनाली. उजव्या हाताने लिहू शकते मी. तुमच्या बाबांनीच सांगितलं होतं मला तसं. हां, ह्यांच्या आजारपणात किती खर्च झाला, मला माहीत नाही; पण तो ताजा ताजा हिशोब आहे. अमित आत्ताही सगळी बिलं देऊ शकतो आपल्याला. शिवाय मनालीचं लग्न, वर्षाचे सणवार, हिचं बाळंतपण हे मोठे खर्चसुद्धा अमितनेच केलेत. त्या सगळ्याची बेरीज करा. तिघांमध्ये तो खर्च समान वाटून घ्या. तुमच्या हिश्श्याचे पैसे अमितला चुकते करा. तेव्हाच हक्कसोडपत्रावर ह्याच्या सह्या घ्यायचा तुम्हाला अधिकार मिळेल.”
मालतीबाईंचा हा हिशोब ऐकून सुमित आणि वीणाला घाम फुटला.
मालतीबाईंचा हा हिशोब ऐकून सुमित आणि वीणाला घाम फुटला.
“आम्ही कुठून देणार पैसे? मुंबईसारख्या शहरात महागाई किती आहे माहितीये तुम्हाला? आमचंच आम्हाला पुरत नाही.” सुमित ततपप करत बोलला.
“आणि आई, सासरी गेलेल्या मुलीकडे कोण असे पैसे मागतं?” मनालीने आपलं घोडं दामटलं.
“का नाही मागायचे पैसे? तू ज्या शिक्षणाच्या जोरावर नोकरी करते आहेस ते तुला आम्ही दिलंय. तुझ्या कॉलेज क्लासची फी अमित भरत होता, तुझा नवरा नाही. तुझ्या पगारातले थोडेफार पैसे तू नियमित नाही पण अडीअडचणीला देऊ शकत होतीस. जर माहेरच्या संपत्तीत हिस्सा हवा, तर माहेरच्या जबाबदाऱ्यासुद्धा उचलायला हव्या मुलींनी.” त्यांनी मनालीची बोलती बंद केली.
“आज अमित हक्कसोड पत्रावर सह्या करेल त्याआधी तुम्ही स्टँप पेपरवर लिहून द्यायचं की तुम्ही दोघंही अमितचे पैसे ह्याला एक महिन्याच्या मुदतीत परत कराल. तुम्ही पैसे दिलेत की मी हे घर वगळता बाकीचं सगळं तुम्हा दोघांच्या नावावर करेन.” त्यांनी आपला निर्णय ऐकवला.
“का, घर का ह्यांना देणार? म्हणजे आम्ही ह्यांना पैसे पण द्यायचे आणि आम्हाला घर पण मिळणार नाही, हा कुठला न्याय?” वीणा फणकारली.
“घरच्या सुनेला मी रस्त्यावर आणणार नाही. अमित आणि अंजली इकडेच राहतील. तुम्ही आपणहून घरातून बाहेर पडला होतात. जो कोणी इकडे राहील, घर त्याचं असेल. घराच्या वाटण्या होणार नाहीत.” मालतीबाई ठामपणे बोलल्या आणि सुमित जोरजोरात टाळ्या वाजवायला लागला.
“व्वा आई, फार छान! तुझ्या ज्या लाडक्या सुनेने बाबांचा जीव घेतला, तिला तू बक्षिशी देणार आणि आमच्या तोंडाला पानं पुसणार? हा एकतर्फी निर्णय झाला.” त्याने आपल्या मनातली गरळ शेवटी ओकलीच.
“एकतर्फी अन्याय म्हण सुमित. आपली आई आपल्यावर एकतर्फी अन्याय करतेय. अशी काय मजबूरी आहे तुझी आई? का तुझ्या गुन्हेगार सुनेला पाठीशी घालतेयस? सत्य काय आहे ते माहीत असूनही का डोळेझाक करतेयस?” मनाली तावातावाने बोलायला लागली.
“सत्य! सत्य काय होतं ते बघायला तू होतीस इथे? तुझ्या बाबांजवळ एक वेळ तरी थांबलीस? नाकाला ऑक्सिजन लावलेला असतानाही बाबांचे श्वास थांबले कसे म्हणून विचारलं होतंस ना तू मला? मग ऐक. दहा दिवस घर आणि हॉस्पिटल करून दोघंही दमत होते. अंजलीने तर आपल्या लेकीची शाळा बुडवून तिला आईकडे पाठवून दिलं. दिसत होतं मला; पण मीसुद्धा असहाय होते. तुम्हाला दोघांना बोलवून घे म्हणून किती वेळा अमितला सांगितलं; पण नंतर मला समजलं की तुम्ही ह्यांना बघून हॉस्पिटलमधून परस्पर निघून गेलात. घरी आपली आई अंथरुणाला खिळून आहे, आल्यासारखं तिलाही भेटून जावं असं दोघांनाही वाटलं नाही?” मालतीबाई जास्तच अस्वस्थ झाल्या होत्या.
वडिलांच्या तेराव्याला पाहुण्यासारखं आलेल्या सुमित आणि मनालीवरचा राग जो आतापर्यंत त्यांनी दाबून ठेवला होता, दोघांच्या स्वार्थी वागण्याने उफाळून वर आलेला.
वडिलांच्या तेराव्याला पाहुण्यासारखं आलेल्या सुमित आणि मनालीवरचा राग जो आतापर्यंत त्यांनी दाबून ठेवला होता, दोघांच्या स्वार्थी वागण्याने उफाळून वर आलेला.
“बाबांच्या जाण्याशी त्याचा काय संबंध आई? आम्ही तुला भेटायला आलो नाही म्हणून वहिनीचा गुन्हा माफ? कुठला न्याय आहे हा?” मनाली माघार घ्यायला तयार नव्हतीच.
“त्या रात्री अंजली आमच्याच खोलीत होती. अचानक मला गरमीने जाग आली. सगळं अंग घामाने भिजलं होतं. तेव्हा सहज छताकडे लक्ष गेलं माझं. तर पंखा बंद होता. अंजली पायाशीच बसल्या बसल्या अवघडून झोपली होती. तुझ्या खोलीत जाऊन आरामात झोप असं तिला सांगावसं वाटलं मला; पण एवढ्या गर्मीतही तिचा डोळा लागला होता. म्हणून तिला हाक मारायचं माझ्या जीवावर आलं. त्यावेळी ह्यांचं ऑक्सिजनचं मशीनसुद्धा बंद झालं असेल हे माझ्या डोक्यातच आलं नाही. अमितला जाग आली आणि जेव्हा हा धावत आला, तेव्हा ही गोष्ट आमच्या लक्षात आली; पण तोवर उशीर झाला होता. हे अपघाताने गेले, कोणाच्या बेजबाबदारपणामुळे नाही.” मालतीबाईंनी सत्याची उकल केली. तसे सुमित आणि मनाली वरमले; पण वीणाच्या मनातील संशय काही केल्या कमी होत नव्हता.
“हेच जर सत्य होतं, तर तुम्ही इतके दिवस गप्प का होतात आई? आम्हाला ह्याबद्दल काही बोललात का नाही?” तिने असं विचारल्यावर मनालीलाही चेव आला.
“तर काय आणि लोक जे कुजबुजतायत त्यांना उत्तर का दिलं नाही?” तिनेही री ओढली.
“लोकांना कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायची मला गरज वाटली नाही. तसं तर तुम्हालाही उत्तर द्यायला हे दोघं बांधील नाहीत; पण आज तुम्ही तिघांनीही सगळ्या मर्यादा ओलांडल्या. म्हणून मला बोलावं लागलं; पण एका अर्थाने जे झालं ते बरंच झालं. माझी मुलं किती खालच्या पायरीवर उतरू शकतात हे मला समजलं.” मालतीबाई एक क्षण थांबल्या. मोठा उसासा घेतला.
“सुमित, मनाली ह्यापुढे अमितबरोबरच तुम्ही दोघंसुद्धा माझी जबाबदारी घेणार असलात, तर आणि तरच तुम्हाला इस्टेटीत हिस्सा मिळेल. तेसुद्धा अमितने आधी केलेल्या खर्चातला त्याचा हिस्सा तुम्ही दोघांनी ह्याला द्यायला हवा. हे मान्य नसेल तर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या कमाईतली दमडीसुद्धा मिळणार नाही आणि मनाली, मी एकतर्फी अन्याय केला म्हणालीस ना तू? मग तुम्ही काय वागलात गं ह्या दोघांशी? तुम्ही तुमच्या भावाला आणि वहिनीला आतापर्यंत खूप गृहीत धरलं. त्यांच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या लादल्यात. वर त्यांनाच गुन्हेगार ठरवून मोकळे झालात. तुमच्या एकतर्फी न्यायाला मी माझ्या एकतर्फी अन्यायाने उत्तर दिलंय. तुम्हाला इस्टेट हवीय की नको ते तुम्ही तिघंही बाहेर जाऊन ठरवा. थोडा वेळ मला एकटीला राहायचं आहे ह्यांच्या आठवणींसोबत.” त्यांनी तिघांना जाण्याची सूचना केली.
सुमित, वीणा आणि मनाली मान खाली घालून खोलीतून निघून गेले. मालतीबाईंनी तेरा दिवस दाबून धरलेला दु:खाचा आवेग त्यांना आणखी आवरता आला नाही. त्यांनी मनोहररावांच्या नावे जोरात हंबरडा फोडला. तसं अमित आणि अंजलीने त्यांना आपल्या मिठीत सावरलं. बराचवेळ तिघंही एकमेकांचं मूकपणे सांत्वन करत होते.
समाप्त
© स्मिता प्रकाशकर
© स्मिता प्रकाशकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा