Login

एकतर्फी अन्याय : भाग 1

Ektarfi Anyay - Part 1
ईरा – चॅम्पियन्स ट्रॉफी – २०२५
जलद कथालेखन : ग्रुप ४ – (संघ – कामिनी)

शीर्षक : एकतर्फी अन्याय भाग १

“आईऽऽ” व्हीलचेअरवर बसलेल्या मालतीबाई आपल्याच विचारात हरवल्या होत्या, लेकाची हाक ऐकून त्या भानावर आल्या.

समोर त्यांचा धाकटा मुलगा सुमित, त्याची बायको वीणा आणि मालतीबाईंची शेंडेफळ मनाली उभे होते. वीणाने नजरेनेच नवऱ्याला इशारा केला आणि सुमितने धीर करून बोलायला सुरुवात केली.

“बाबांच्या दिवस कार्यासाठी कशीबशी रजा मिळाली मला; पण आता जायला हवं. म्हणजे मी आणि वीणा आम्ही आजच निघतोय.” मालतीबाईंनी नुसतीच मान डोलावल्यासारखं केलं.

तिघंही एक क्षणभर तिकडे रेंगाळले आणि सुमितने बाहेरच्या दिशेने एक नजर टाकून धीर करून बोलायला सुरुवात केली.

“आम्ही जातो आहोत; पण तू इथून पुढे जरा सांभाळून राहा. काय आहे ना, मी एकटाच हे बोलतोय असं नाही. बाहेर हीच कुजबुज कानावर येतेय. बाबांचं जाणं आकस्मिक नसावं म्हणतायत लोकं. आता तुलाच स्वत:ला जपायला हवं.” सुमितने आईच्या कानाशी लागत मोलाचा सल्ला दिला आणि आपण आईप्रती असलेली आपली काळजी योग्य प्रकारे व्यक्त केली अशा भावनेने वीणाकडे बघितलं.
तिनेही नजरेनेच त्याला ‘उत्तम’ असं सर्टिफिकेट दिलं. मनालीनेसुद्धा संधी साधत लगोलग अमितच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

“तर काय, मोजून दहा दिवस बाबा आजारी होते. त्यातले आठ दिवस तर हॉस्पिटलमध्येच राहिले. मला मान्य आहे की त्यांच्या तब्येतीत काहीही सुधारणा होणार नाही, ह्या अवस्थेत ते किती दिवस किंवा महिने काढतील काही सांगता येत नाही, असं डॉक्टर म्हणाले होते; पण म्हणून घरी आणल्यावर दोनच दिवसांत कसे गेले ते?” मनालीने आपल्या मनातली शंका बोलून दाखवली तरी मालतीबाई गप्प होत्या.

“आणि हे बघ, बाबांनी त्यांच्या पश्चात सगळं तुझ्या नावावर केलंय म्हणून सांगते. तू दु:खात आहेस, तुझी मनस्थिती ठीक नाहीए ह्याचा फायदा घेऊन दादा तुला कुठल्या कागदावर सह्या करायला सांगेल; पण आम्हाला विचारल्याशिवाय कुठेही सह्या करू नकोस. नाहीतर तुझासुद्धा श्वास अचानक बंद होऊ शकतो.” मनालीने आपलेपणाने आईला सावध केलं.

इतक्यात तिचं लक्ष दाराकडे गेलं. अंजली, मालतीबाईंची मोठी सून त्या दोघांसाठी तेराव्याचा प्रसाद घेऊन आली होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. तिला पाहून तिघंही क्षणभर चपापले; पण लगेच सावरून तिच्याकडे दुर्लक्ष करत मानभावीपणे बाहेर जाऊ लागले. त्या बहीण-भावाच्या बोलण्याचा अंजलीला जितका त्रास झाला नाही, तितकं दुःख मालतीबाईंच्या मौनाने झालं होतं. मात्र त्याबद्दल कैफियत मांडायची तिची प्राज्ञा नव्हती आणि ह्या प्रसंगी अंजलीला ते प्रशस्तही वाटलं नाही.

तशा तर यजमान गेल्यापासून मालतीबाई गप्पच झाल्या होत्या. फक्त कामापुरते तेवढे बोलत होत्या; पण आपल्या दोन्ही मुलांचं बोलणं ऐकून त्या जास्तच अंतर्मुख झाल्या. गेल्या महिनाभराचा काळ त्यांच्या स्मृतीपटलावरून सरसर सरकू लागला. आज त्यांच्या यजमानांना, मनोहर दांडेकरांना जाऊन तेरा दिवस झालेले. त्यांच्या जाण्याला कारणीभूत ठरलेल्या त्या काळरात्रीने मालतीबाईंची तर जन्माची झोप उडवली.
बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि मनोहरराव बेशुद्ध पडले. थोरला अमित आणि अंजली दोघांनी धावपळ करून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. उपचारसुद्धा सुरू झाले; पण डोक्यावर पडल्यामुळे मेंदूला मार लागला होता. अंतर्गत रक्तस्त्राव झालेला असू शकतो असा अंदाज डॉक्टरांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला. जो दुर्दैवाने पुढच्या तपासण्यांमध्ये खरा ठरला. थोडक्यात काय, तर ब्रेन-हॅमरेज झाल्याने मनोहर कोमात गेले.

‘त्यांचं ऑपरेशन होऊ शकतं ना?’ असं अमित आणि अंजलीने डॉक्टरांना विचारलं.

त्यावर “मी तुम्हाला खोटी आशा दाखवत नाही. पेशंटचं वय बघता ऑपरेशन करूनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याची अवघे पाच टक्के शक्यता आहे.” अशी डॉक्टरांनी स्पष्ट कल्पना दिली. आता निर्णय अमितचा होता.

काय निर्णय घेतला असेल अमितने? आणि म्हणून तो आपल्या भावंडांच्या रोषाचं कारण ठरला होता का? पाहू पुढच्या भागात...

क्रमशः
© स्मिता प्रकाशकर
0

🎭 Series Post

View all