Login

ऑनलाईन प्रेम...भाग 1

मोबाईलचा असा दुरुपयोग व्हायला नको
ऑनलाईन प्रेम...भाग 1
चॅम्पियन ट्रॉफी 2025
ऋतुजा वैरागडकर

टीव्हीवर न्यूज झळकत होती.  "ऑनलाईन प्रेमाच्या नादात ३५ वर्षीय गृहिणीची गळफास लावून आत्महत्या."

"बापरे! न्यूज ऐकून काळजात धस्स झालं. कुठे जातोय आपला समाज. का लोकांची मनोवृत्ती बिघडत आहे."
न्यूजचा मागोवा घेतला आणि धक्कादायक गोष्टी पुढे आल्या.

अर्चना आणि तिची मैत्रीण दोघींची चर्चा सुरू होती. अर्चना तिला सगळ्या गोष्टी सांगू लागली.

पूजा आणि समीर दोघांची फेसबुकवर मैत्री झाली.
पूजा हाऊसवाईफ होती आणि समीर एक सेलेब्रिटी होता.

आधी फक्त हाय, हॅलो आणि काय सुरू आहे, इथपर्यंत चॅटिंग सुरू होतं. आता रोजचे मेसेज सुरू झाले.

मैत्री झाली. एकमेकांना आवडायला लागले. सतत चॅटिंग सुरू असायचं.

"हाय, काय करतो?"

"काही नाही, तुमच्याशी बोलतोय. खरं तर तुम्हाला मिस करतोय."

"मी पण."

"प्रेमात पडलायेत की काय माझ्या?"

"छे नाही रे. आता प्रेमात पडण्याचा मला अधिकार नाही. "

"का? का नाही? प्रेम कधीही कुणासोबतही होऊ शकतं."

"ह्म्म. असेल पण माझं लग्न झालंय माहीत आहे ना तुला?"

"हो माहीत आहे ना."

दोघांनी एकमेकांना एकमेकांबद्दल सगळं सांगितलं.
घरी कोण कोण असतं, दिवसभराचं रुटीन आणि एकमेकांच्या आवडी निवडी सगळं सांगून झालं.

रोज चॅटिंग सुरूच होतं.

एक दिवस त्याचा मेसेज आला.
"आय मिस यू."

तिने मेसेज वाचला, पण काहीही बोलली नव्हती.

पुन्हा मेसेज आला त्याच मेसेजला टॅग करून, "तुम्ही बोला ना."

"काय बोलू ?"

"तुम्ही मला मिस करत नाही."

"माहीत नाही."

"ऐका ना..."

"बोल."

"आय लव यू."

"हे चुकीचं आहे."

"काय चुकीचं आहे. प्रेम करणं चुकीचं आहे का?"

"प्रेम करणं चुकीचं नाही. तुला याने काहीच फरक पडणार नाही, पण मला पडेल.  माझ्या घरी कळलं तर. मला खूप भीती वाटते."

"कसं कळणार? आपण कुणाला काहीच सांगायचं नाही."

तिला हे सगळं चुकीचं वाटतं होतं. तिला हे नातं पुढे न्यायचं नव्हतं, पण तो ईमोशनली तिला त्याच्या जाळ्यात ओढायचा.

"मी एकटा आहे. मला समजून घेणारं कुणी नाही. तुम्हाला तुमची फॅमिली आहे, पण मला तर कुणीच नाही."

तिलाही सहानुभूती वाटायला लागली आणि तिने चॅटिंग सुरू ठेवलं.

दिवस सरकत होते. तिला हेल्थ प्रॉब्लेम सुरू झाले. तिला त्याच्याशी बोलावं वाटायचं. तिला त्याला सगळं सांगावं वाटायचं, तिचं मन त्याच्यात गुंतायला लागलं होतं.