Login

ऑपेरेशन सेफ हार्ट भाग -७

ऑपेरेशन सेफ हार्ट
ऑपेरेशन सेफ हार्ट भाग ७

पहाटेचा वारा अजूनही थंडगार वाहत होता, पण त्यात रात्रीच्या रक्ताळलेल्या लढाईचा दाह मिसळलेला होता. किनाऱ्यावर साचलेल्या लाटांच्या आवाजात एक विचित्र क्षणांची जाणीव करून देत होता जणू समुद्र प्रत्येक थेंबातून मागच्या रात्रीची साक्ष देत असावा.
धुक्याच्या थरातून हळूहळू सूर्य वर येत असला तरी , पण समुद्रावर अजूनही अंधाराचे जाळेच पसरलेले होते. किनाऱ्यावर पडलेले लाकडाचे तुकडे, बुडलेल्या बोटींचे अवशेष आणि रडणाऱ्या स्त्रियांचे आवाज हे सगळं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं.

गावकरी अजूनही धडपडत होते.कुणी आपल्या माणसाला शोधत होते, कुणी वाचलेल्यांना घरी नेत होते, कुणी फक्त बसून ओक्साबोक्शी रडत होते. प्रत्येक चेहऱ्यावर निराशा, प्रत्येक डोळ्यांत काळ्या जहाजाची सावली दिसून येत होती.

उर्वी मात्र या गोंधळात शांत चालत होती. तिच्या डोळ्यांत अजूनही रणांगणाचं दृश्य जिवंत होतं ,आरडा ओरड, धडपड, रक्ताळलेल्या लाटा, आणि शेवटी उठलेला ठिणगीसारखा स्फोटाचा आवाज. तिचं प्रत्येक पाऊल जड होतं होते , पण तिच्या चेहऱ्यावर मात्र कमालीचा धीर होता. कारण तिला ठाऊक होतंजर तीच खचली, तर सगळं गाव कोसळेल.

गावाच्या वेशीवर पोहोचताच गावकरी तिच्या भोवती जमले.
कुणी ओरडत विचारलं “अहो ताई, गणपा दिसलाच नाही कालपासून… कुठे गेला असेल ओ तो?”
दुसऱ्या एका बाईने रडत विचारलं “बाया बाळांचं काय झालं? ते वाचले का?”
तिसरा आवाज कुजबुजला “ते काळं जहाज खरंच आलं होतं का?”

प्रश्नांचा मारा चालूच होता. कुणी तिच्या हाताला धरून विनवण्या करत होतं, कुणी तिच्या डोळ्यांत थेट उत्तर शोधत होतं.

उर्वी काही क्षण नि:शब्द उभी राहिली. तिच्या नजरेसमोर अजूनही रक्तमाखलेल्या लोकांचे अवशेष दिसत होते . पण तिने श्वास खोल घेतला, आवाज थोडं नीट केला आणि म्हणाली “हे बघा काही लोक वाचले आहेत. तर काहींचा शोध चालू आहे. जे हरवलं आहे ते परत आणणार मी. कोणत्याही किंमतीत.”

त्या शब्दांनी गर्दीत कुजबुज पसरली. काहींच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला, काहींनी मात्र निराशेने मान हलवली.

पण मागून एक स्त्री हळू आवाजात म्हणाली “ही पोलीस आहे म्हणे… पण एवढ्या मोठ्या जहाजाविरुद्ध एकटी काय करणार?”

तो शब्द उर्वीच्या कानावर आला, पण तिचा निर्धार डळमळला नाही. सध्या तिच्या डोक्यात बाकीचे माणसे कुठे असतील आणि ती सुखरूप असतील का?

घरी परतल्यावर आई अंगणात तुळशीला पाणी घालत होती. तिच्या चेहऱ्यावर उर्वीला कठोरपणा जाणवत होता.
उर्वी आत शिरताच आईने नजरेतून प्रश्न केला. मग सरळ शब्द बाहेर आले“कुठे होतीस रात्री?”

उर्वी काही बोलली नाही. तिच्या डोळ्यांत फक्त मौन आणि किंचित दडपण होतं.
आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आवाज कठोर होता, पण त्यात काळजी मिसळलेली होती.
“मला माहिती आहे तू काय करत आहेस. पण हे गाव साधं नाही. इथे काही लोक सुद्धा त्या लोकांना मिळालेली आहेत, ज्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्या जीवघेण्या ठरू शकतात.त्यामुळे जरा सतर्क राहा”

उर्वीने आईकडे सरळ पाहिलं. “आई, जर ती लोक मला घाबरवायला आली असतील तर मी पण त्यांना उर्वी काय चीज आहे ते दाखवून द्यावे लागेल. बाबांनी आयुष्यभर हेच केलं. मग मी का नाही?”

आईच्या डोळ्यांत पाणी दाटलं. उर्वीचं ते ठाम उत्तर ऐकून तिच्या मन अभिमानाने भरून तर आला होता, पण आईच्या काळजाचा ठाव घेणारी चिंता अधिक होती. तिने उर्वीचा हात घट्ट धरला. तिचा आवाज आता थरथरत होता,तरी आई म्हणाली “उर्वी… धाडस करावं हे खरं आहे. पण लक्षात ठेव, धाडस आणि बेफिकिरी यात बारीक फरक असतो. तुझ्या बाबांनी लढा दिला तेव्हा त्यांच्यासोबत विश्वासू साथीदार होते, लोकांचा विश्वास होता. तू मात्र इथे एकटी आहेस. गावकऱ्यांना तुझ्यावर विश्वास आहे, पण त्यांचा विश्वास जपणं म्हणजे तुझ्या खांद्यावर ओझं पेलण्या इतकं आहे. ते हलक्यात घेऊ नकोस.”

उर्वी शांतपणे ऐकत होती. आई पुढे म्हणाली “तुला कदाचित वाटत असेल की तू सगळं स्वतःच्या खांद्यावर उचलू शकतेस. पण बाळा, काही लढाया शस्त्रांनी जिंकल्या जात नाहीत. त्या जिंकायला मन, बुद्धी, आणि लोकांचा पाठिंबा हवा असतो. या गावातल्या प्रत्येक घरात वेदना आहेत, पण त्यात काही डोळे तुला फसवायलाही बसलेले आहेत. ज्यांच्यावर विसंबून तू पुढे जाशील, त्यांच्याच हातून धोका मिळू शकतो.”

आईने तिचा हात घट्ट धरत म्हणाली “माझ्या मुलीला मी धाडसी घडवलंय, पण तिच्या डोळ्यांत दु:ख नको पाहायला. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव शत्रूला हरवणं महत्त्वाचं आहेच, पण स्वतःला वाचवणं त्याहून मोठं आहे. बाबांनी आयुष्य दिलं देशासाठी, पण त्याच्या बदल्यात मी तुला गमवायला तयार नाही. तू माझं शेवटचा आधार आहेस उर्वी.”

आईच्या त्या शब्दांवर उर्वीच्या छातीची धड धड अजूनच वाढली . पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही निर्धार कायम होता.

ती शांतपणे म्हणाली “आई, तुझं बोलणं बरोबर आहे. पण जर मी घाबरून थांबले तर या गावाचा प्रत्येक श्वास गुदमरून जाईल. मी सावध राहीन पण मागे हटणार नाही. माझ्यावर तुझं आशिर्वादाचं कवच असेल ना, तर मला काही होणार नाही.”

आईने तिच्या कपाळावर थरथरत्या ओठांनी किस केले आणि म्हणाली“जा पण लक्षात ठेव, प्रत्येक चेहऱ्यात धोका दडलेला आहे. तुझे पाय कुठे पडतात, कोणत्या दारात तू प्रवेश करतेस याचं भान नेहमी ठेव. कधी तुला माझं बोलणं आठवलं, तर मागे वळून बघ. कदाचित धोका तिथेच उभा असेल.”

त्या क्षणी अंगणातली तुळशी मंद वाऱ्यात डुलत होती. जणू तिच्या आईच्या शब्दांना साक्ष देत होती. उर्वीने डोळे मिटून श्वास घेतला आणि मनोमन स्वतःशीच पुटपुटली “हीच खरी लढाई आहे … शत्रू बाहेर नाही, तो इथल्या लोकांत विसावला आहे.”

त्याच दुपारी गावाच्या चौकात थोडीशी हलकल्लोळाची हवा होती. तिच्या मैत्रिणी एकत्र बसून गप्पा मारत होत्या.
शुभ्रा हसत म्हणाली,
“शहराच्या तुलनेत इथं किती शांत आहे ना! गोंधळ नाही, ट्रॅफिक नाही सगळं कसे अगदी निवांत”

मोहिनीने लगेचच टोमणा मारला,
“अगं,काय शांत म्हणतेस? लोक रोज भीतीच्या छायेत जगतायत, आणि तुला इथे निवांतपणा दिसतोय?”

त्या दोघींच्या बोलण्यावर बाकी सगळ्या हसल्या, पण उर्वी मात्र हसत नव्हती. तिचं लक्ष जवळ बसलेल्या म्हाताऱ्या शेतकऱ्यांच्या कुजबुजेकडे गेलं होतं.
“काल परत ते काळं जहाज दिसलं…”
“गणप्याचा मुलगा अजून गायब आहे… कदाचित तोसुद्धा…”

उर्वीचा चेहरा गंभीर झाला. ती थेट त्यांच्यापाशी जाऊन थंड, धारदार आवाजात विचारलं,
“काका, काय म्हणालात? कोणाचा मुलगा हरवलाय?”

ते दोघे घाबरले. एकाने हात हलवत सांगितलं,
“बाई, तुम्ही यात पडू नका. त्या जहाजाच्या विरोधात गेलेला कोणीही परत येत नाही.”

उर्वीच्या डोळ्यांत निर्धार चमकला. ती ठामपणे म्हणाली,
“मी त्याला परत घेऊन येईन . कारण जो पर्यंत इथे मी आहे तो पर्यंत तरी कोणाचा जीव असाच जाऊच देणार नाही.”

एवढे बोलून ती आपल्या मैत्रिणीसह आपल्या घराच्या दिशेने चालू लागली.

संध्याकाळी आजोबा काठीच्या आधाराने घरात आले. वयाने थकलेले होते, पण आवाजात अजूनही लष्करी कडकपणा जाणवत होता.
ते थेट उर्वीसमोर उभे राहिले आणि म्हणाले,
“उर्वी, इथं पाऊल टाकणं म्हणजे जाळ्यात शिरणं आहे. तू हट्टी आहेस, हे मला ठाऊक आहे. पण लक्षात ठेव सैनिक कधीच एकटा जिंकत नाही. त्याला नेहमी टीम लागते.”

उर्वीने त्यांच्या डोळ्यांत नजर खुपसली आणि शांतपणे उत्तर दिलं,
“टीम आहे, आजोबा. तुम्ही, आई, माझ्या मैत्रिणी आणि कुणीतरी अजून.”

आजोबांनी भुवया उंचावल्या.
“कुणीतरी अजून?”

क्षणभर उर्वी गप्प झाली. पण तिच्या मनात ठळकपणे एक नाव चमकलं
ती अलगद म्हणाली,“हो… एक मास्कधारी .जो माझ्या आधीच या लढाईत उतरला आहे.”

आजोबांच्या डोळ्यांत संशय चमकला. ते मंद आवाजात म्हणाले,
“अश्या अनोळखी माणसावर कधीच पूर्ण विश्वास ठेवू नकोस.”


माझी नवीन कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम  माझ्यासाठी अमूल्य आहेत.

©️ कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

उर्वी देशमुख - नायिका 

अश्वेत-नायिकेचा भाऊ

कर्नल देशमुख -नायिकेचे वडील

ए.सी.पी. उदय राणे
0

🎭 Series Post

View all