स्वप्न तुझी माझी भाग 2

तुमचं स्वप्न काय आहे?

तीन महिन्यानंतर :

 भारतातील, महाराष्ट्र राज्यातील, एक छोटेसे शहर अकोला! तिथे राहणारी सुकन्या आज थेट चीनची राजधानी बीजिंग मध्ये येऊन पोहोचली. झू उद्योगची गाडी तिला सेंट्रल बिजनेस डिस्ट्रिक्ट ऑफ बिजिंग स्थित 'झू इंडस्ट्रीज' च्या तीस मजली इमारती समोर घेऊन आली.

तिची नजर थोड्याच अंतरावर असलेल्या 'चायना झून द स्कायस्क्रॅपर टॉवर' वर पडली. थोड्या वेळासाठी तिला वाटले की, ही इमारत आकाशाला भेदून पार स्वर्गात जात असेल की काय.

"मिस सु... सूक..."

 तिला कोणीतरी आवाज दिला तशी ती भानावर आली. तिच्यासमोर वयाच्या चाळीशित असलेली, छोट्या बाह्यांचा, गुडघ्यापर्यंत लांब असा काळा वन पिस, गळ्यात नाजूक मोत्यांची माळ, कानात मोत्यांचे डूल, खांद्याच्या किंचित खाली असलेले स्ट्रेट केस व चेहऱ्यावर नो मेकअप लूक असा पेहराव केलेली, ठासून ठुसून आत्मविश्वासाने भरलेली मिस मिंग चेहऱ्यावर सुहास्य घेऊन उभी होती.

"नमस्कार, कशी आहेस?" मिस मिंगने सुकन्याला विचारलं.

"मी छान आहे मॅम." सुकन्या उत्तरली. 

"छान, मी मिस मिंग. [email protected] ची हेड एडिटर " ती सुकन्याला म्हणाली, "चल तुला आपल्या टीमची ओळख करून देते."

 हेड एडिटर स्वतः आपल्याला घ्यायला आली याचं सुकन्याला कौतुक वाटलं. ती उत्साहाने भरून गेली 

मिस मिंग सुकन्याला इमारतीच्या चोवीसव्या मजल्यावर, झू एंटरटेनमेंटच्या, राइटिंग अँड एडिटिंगला विभागात घेऊन गेली.

"Good morning all dears," मिस मिंग तिच्या मिश्किल अंदाजात म्हणाली, "आज एक नवीन टीम मेंबर आपल्या सोबत काम करायला आली आहे."

मिंगच्या या बोलण्याने आपल्या कामात व्यस्त असलेल्या सर्वांचे लक्ष वेधले. ते आपल्या कम्प्युटर, लॅपटॉप मधून डोकं वर काढून अशा अविर्भावात बघू लागले जणू विचार करत होते की, "आता कोण नवीन हिरा आणलाय यांनी शोधून?"

मिंगच्या बाजूला उभी, टेंशनमुळे घामेजलेल्या हातांना एकमेकांत घट्ट पकडलेल्या सुकन्याकडे हात दाखवून मिंग बोलली, "वेलकम सुकन्या फ्रॉम इंडिया. New content writer for our new project."

"गुड मॉर्निंग!" सुकन्याने समोर होऊन, चेहऱ्यावर स्मित हास्य आणून, किंचित झुकून, सर्वांना अभिवादन केले.

झू एंटरटेनमेंटमधे सुकन्याचा हा कामाचा पहिलाच दिवस होता. केसांचा बॉबकट, कानात चांदीचे नाजूक डूल, गळ्यातही चांदीचीच पातळ चैन, हातात कथ्या रंगाचा बेल्ट असलेली छोट्या डायलची घड्याळ, अंगावर पांढरा, सूती, मंदारिन कॉलर असलेला शर्ट व बदामी ट्राऊझर चढवलेली, पायात साधेसे फ्लॅट बेली शूज, मेकअप म्हणून फक्त ओठांवर हलकं पिंक लिपस्टिक लावलेली, भुवयांना पेन्सिल नाही की नखांवर नेलपेंट नाही, असा आउट डेटेड पेहराव केलेली, गौरवर्णीय, (तरीही त्यांच्या समोर सावळी वाटणार अशी ) सडपातळ अंग काठीची, पाच फूट दोन इंच उंची असलेली, मध्यम बांध्याची, बघताच क्षणी दहावी बारावीची विद्यार्थिनी भासेल अशी सुकन्या.

हुआने तिला पायापासून डोक्यापर्यंत स्कॅन केलं तर लीन शा ने तिच्याकडे बघून न बघितल्या सारखं केलं.

गाओ फक्त तोंडापुरतं हसू दाखवून परत आपल्या कामाला लागला. तसे इनमीन चारच व्यक्ती त्या विभागात दिसली.

“ही दहावीत शिकनारी मुलगी काय लिहिणार श्रुंगारिक कथा?” हुआ अनावधानाने बोलुन गेली.

“हुआ?” मिस मिंगने एक कटाक्ष हुआवर टाकला.

“सॉरी मॅम.” हुआ सुकन्या कडे वळून तिला म्हणाली, “वेलकम सु...कु...” ती पूर्ण नाव घ्यायचा प्रयत्न करू लागली.

सुकन्या तिला असू द्या असे बोलायला पुढे होणार तोच लीन शा बडबडली.

"आपल्या देशात कमी टॅलेंट आहे का? की हा नमूना घेऊन आलेत बाहेर देशातून."

"आपल्या देशासारखं टॅलेंट नाहीच आहे कोणाकडे. पण आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आहोत तिथे आपल्याला सर्वच देशांचे टॅलेंट हवे आहे.” लीनचे बोलने ऐकून तिच्या डेस्क जवळ क्षणभर थांबून झू युशान, (झू इंडस्ट्रीच्या चेयरमनचा मोठा मुलगा) झू एंटरटेनमेंटचा हेड, एकेकाळी वाचकांच्या मनावर राज्य केलेला लेखक, दिग्दर्शक धारदार आवाजात तिच्याकडे न बघताच बोलला,

“दोन वर्ष झाली तुम्ही स्वतः तर काहीच खास केलं नाही. कमीत कमी बॉसच्या कामात  अडथळा तरी नको ना आणायला. तसेही तुम्ही या ऑफिसमधे का व कोणामूळे आहात हे विसरु नका. कारण परत माझ्या कामात लुडबुड केलीत तर मी नक्कीच विसरून जाईल."

गर्द निळ्या सूट बूट मध्ये अठ्ठावीस वर्षाच्या युशानचा गोरापान रंग अधिकच उठून दिसत होता. जेल लावून मागे लावलेले कळेभोर केस, हाताने बनवून लावलेत की काय भासतील असे नक्षीदार नाक डोळे, डाळिंब दाण्यासारखे रसरशीत गुलाबी ओठ, कुठेच कमी किंवा जास्त वाटनार नाही अशी परिपूर्ण शरीरयष्टि. एखाद्या मुलीला लाजवेल असं त्याचं सौंदर्य बघून सुकन्याला वेगवेगळ्या चायनीज व कोरियन नाटकंच्या अभिनेत्यांची (जसे की यांग यांग, लुओ यूंक्सी, डायलन वांग, वांग इबो, लिओ, ली मिन हो,  वगैरे सर्व CEO भूमिकेत असलेल्या ) आठवण झाली.

"सॉरी बॉस!" लीन खाली मान घालून म्हणाली.

 युशानने सुकन्यावर एक नजर टाकली. तीही घामेजलेल्या हातांना एकमेकांत घट्ट पकडून, तणावग्रस्त नजरेने एकटक त्यालाच बघत होती. तिला बघून त्याच्या मनात आले,

“खरेच शाळकरी विद्यार्थिनी वाटते ही. ही माझी मदत करु शकेल का? पण इतक्या मोठ्या टॅलेंट कंपनीने हिची निवड केली म्हणजे नक्कीच काही तर विशेष असेलच हिच्यात.”

मिंगने सुकन्याला हलका धक्का देऊन गुड मॉर्निंग म्हणायचा इशारा केला. पण तिच्या तोंडून शब्द बाहेर पडण्या आधीच तो आपल्या केबिनकडे वळला. पाठोपाठ त्याचा सेक्रेटरी शिन चॅनही लीन कडे बघून हाताने स्वतःचा गळा कापायचा अभिनय करत गेला.

पंचविशित असलेला शीन चॅन म्हणजे अगदी गमतीशिर, लोभस, निरागस मुलगा. युशानला त्याच्यासोबत खूप कम्फर्टेबल वाटायचे. त्यामुळे त्याने केलेल्या लहान मोठ्या चुकांकडे तो दुर्लक्ष करायचा.

"मिस सुकन्याची फाईल." युशानने शिन चॅनला सुकन्याची फाईल मागितली.

झू युशानच्या फाईलसाठी पुढे केलेल्या हातावर टाळी मारून शिनचेन म्हणाला, "आपण तिला मिस सुकू म्हटलं तर? ते सु... क.. न्या फार अवघड आहे बोलायला आणि किती लांब."

"जशी तुझी इच्छा, मला फाईल दे." युशान परत हात पुढे करून बोलला. शिन चॅनने फाईल त्याच्या हातात दिली. तो फाईल पलटून बघणार तोच त्याचा मोबाइल वाजला.

त्याने कॉल उचलू की नको या विचारात मोबाईलकडे बघितलं. मेईचा कॉल होता. उचलला नाही तर ती ऑफिसमधे येऊन डोक्यावर तांडव करायची. त्यापेक्षा फोनवरच सहन केलेलं बरं. या विचाराने हातातली सुकन्याची फाईल बाजूला ठेवून तो फोनवर बोलू लागला.

"बोल!" युशानला लवकरात लवकर संभाषण पूर्ण करून फोन ठेवायचा होता.

"काय बोल?" मेई मात्र वेगळ्याच मूड मधे दिसत होती. तिने अवखळ हसून प्रतिप्रश्न केला.

"ज्याकरिता तु फोन केलास?" तो स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करून म्हणाला.

"ओह ते तर असंच. तुझा आवाज ऐकायची इच्छा झाली म्हणून." मेई शृंगारिक अंदाजात बोलली.

"मेई सकाळचे दहा वाजलेत. मी ऑफिसमधे कामात आहे. काही महत्वाचे नसेल तर ठेवतो मी." युशान चिडला. त्याला मेई अशी काही वागली की खूप त्रासदायक वाटायचे.

"हे हे डार्लिंग हायपर नको होऊ. मी नंतर करते फोन." मेईने फोन ठेवला.

थोड्या वेळाने युशानचा मित्र जॅकी त्याला भेटायला आला. आता हा डोके खाईल म्हणून त्याने होईल तितके स्वतःला शांत दाखवण्याचा प्रयत्न केला.

पण त्याचा चेहरा बघूनच जॅकीने अंदाजा लावला, “मेईचा फोन आला होता का?”

युशान काहीच न बोलता लॅपटॉप वर काम करु लागला. पण जॅकीला काही चुप बसवेना.

"तु सरळ सरळ सांगून का नाही देत तिला की तिच्यात तुला त्या अर्थाने काडीचाही रस नाही." जॅकी त्याच्या समोरील खुर्चीत बसत म्हणाला.

"तुला काय वाटतं मी बोललो नाही तिला तसं. हजार वेळा सांगून झालंय पण ऐकायलाच तयार नाही ती." हा असा डोके खायचा थांबणार नाही हे समजून युशान उठून त्याच्या आलिशान ऑफिसच्या बाहेर रोडवर चालणाऱ्या वाहनांना बघत बोलू लागला,

"बालपणीची मैत्रीण आहे ती म्हणून तिचे मन दुखवावे वाटत नाही. तर ती म्हणते कि लहानपणापासून एकाच शाळेत गेलो, कॉलेजही एकच होते, मित्रमंडळही सारखेच. तुला आणखी कोणासोबत कधी बघितलं नाही. तुझा सगळा फोकसही तुझ्या कामावरच असतो. अशात तुझं इतर कोणा मुलीशी लग्न होणे कठीण आणि आपले बाबा तर आपलं लग्न लावून द्यायला एका पायावर तयार आहेत." युशान गंभीरपने  बोलला.

"हा मग चुकीचं काय त्यात?" जॅकीने उभं होऊन विचारलं, "तु कधी गर्लफ्रेंड म्हणून कोणत्या मुलीला भाव दिला नाही. आम्हाला वाटायचं तुझा इंटरेस्ट वेगळा आहे. पण च्यायला तुला प्रपोजल येऊनही तु कोणत्या मुलाचाही बॉयफ्रेंड बनला नाहीस."

जॅकी डोळा मारून खदखद हसत बोलला.

हा आपल्याला कधीच गांभीर्याने का घेत नाही? या विचाराने युशान चांगलाच चिडला त्याच्यावर,

"तु नक्की माझा मित्र आहेस की शत्रू?"

इतकं बोलून त्याने खिशातील पेन जॅकीच्या दिशेने फेकून मारला. जॅकी लगेच बाजूला झाला. तसा तो पेन दारात उभ्या असलेल्या सुकन्याच्या डोक्याला लागला. ती डोक्याला हात लावून खाली बसली. स्टेनलेस स्टीलने बनलेल्या त्या पेनच्या एका टोकावर बनलेल्या ड्रॅगनचे तोंड तिच्या कपाळावरील, हड्डीवर लागले.

मघापासून जॅकी व युशानचा संवाद कधी मस्तीत किंवा हातापायीचे रूप घेईल काही सांगता येत नाही म्हणून त्यांच्या पासून दूर सोफ्यावर एका कोपऱ्यात मज्जा बघत बसलेला शिन चॅन धावतच सुकू सुकू करत सुकन्या जवळ गेला.

"अय्यो सुकू तूझ्या तर डोक्यातून रक्त येतेय." शिन चॅन तिच्या कपाळावरील जखमेला बघत तिला म्हणाला.

"थोडंसच आलंय. खरचटलंच फक्त. डेटॉल लावलं की ठीक होईल." सुकन्या होईल तितकं सामान्यपने बोलली.

"अजिबात नाही डाग पडला म्हणजे?" जॅकी परत त्याच्या नाटकी अंदाजात बोलू लागला, "बघा मिस्टर झू युशान काय केलं तुम्ही? एका सुंदर मुलीला कपाळावर मारलं. आता तिच्या कपाळावर डाग पडला अन त्यामुळे तिच्याशी कोणी लग्न केलं नाही तर तुम्ही जबाबदारी घेणार का तिची?"

जॅकी काय बोलतोय हे ऐकून सुकन्याला खूपच अवघडल्या सारखं झालं.

“बापरे काय बोलतोय हा माणूस? युशान काय विचार करेल?” तिच्या मनात आले, “कुठेतरी जाऊन लपून बसावं आपण.”

तिकडे युशान आणखीच संतापला.

"शिन चॅन याला ऑफिसच्या बिल्डिंग बाहेर सोडून ये आणि सिक्युरिटीला सांग की दूरदूर पर्यंत हा दिसायला नको नाहीतर त्यांची नौकरी गेली. सोबतच तुझिही."

"ओके बॉस!" शिन चॅन जॅकीचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन जाऊ लागला, "सर पुरे हो आज साठी."

पण तो काही शांततेत गेला नाही. जाता जाता बोललाच, "आता तिची मलम पट्टी तरी स्वतः करून दे."

"सर मी थोड्या वेळाने येते." सुकन्या खाली बघतच युशानला म्हणाली. तिला तिथून काढता पाय घेणे बरे वाटले.

"थांब. सोफ्यावर बस." युशान तिला रागातच बोलला. मग आवाज चढवून त्याने विचारले, "कोणाच्याही केबिनच्या आत जातांना दारावर नॉक करून किंवा may I come in? असं विचारून जायला हवं. काय वाटतं तुला?"

"सर मी.. मी दारावर नॉक केलं होतं व may I come in? असंही विचारलं. पण काहीच उत्तर आलं नाही." घाबरलेली सुकन्या चाचपडतच बोलली. सोफ्यावर बसून ती कशीबशी उत्तरली.

"मग वाट बघायची. उभं राहायचं किंवा थोड्या वेळाने परत यायचं. बॉसच्या केबिनमधे शिरायची इतकी घाई का?" युशानने त्याच आवजात परत प्रश्न केला.

क्रमश:

काय वाटतं सुकन्या आता काय उत्तर देईल? झू युशान समजून घेईल का तिला? हे दोघं एकमेकांसोबत काम करू शकतील की नाही?

बघूया पुढील भागात.

धन्यवाद.

©®अर्चना सोनाग्रे 

🎭 Series Post

View all