Login

स्वप्न तुझी माझी भाग 5

स्वप्न सर्वच बघतात पण ती पूर्ण करायची धावपळ किती जण करतात

बाजूच्या डेस्कवर हुआच्या कम्प्युटरमध्ये आलेल्या एरर वर काम करत असलेल्या IT असिस्टंट किमने तिच्याकडे बघून एक लांब श्वास घेतला.

"तू खरच भारतीय आहे का?" किमने तिला विचारलं.

तिने मानेनेच होकार दिला.

"मग तुझे केस इतके छोटे का बर आहे? मी तर ऐकलं होतं आणि सिनेमातही बघितलं होतं की भारतीय स्त्रियांचे केस हे लांब लांब असतात. त्यांना लांब केसांचे वेड असतं म्हणे."

 किम त्याच्या मनातील शंका बोलून गेला.

सुकन्या मात्र परत कुठेतरी भूतकाळात गहाळ झाली.

"मॅम इतके ठीक आहेत?" कानापर्यंत केस कापून झाल्यावर ब्युटी पार्लर मधे काम करणाऱ्या मुलीने सुकन्याला विचारलं.

"बॉयकट." सुकन्या डोळे मिटून उत्तरली.

"पण मॅम तुमचे केस खूप सुंदर आहेत. अगदी रेशमी मऊ आहेत, त्यांच्यात एक चमक आहे."

"पुरे." तिच्या केसांच्या वर्णनात गूंग झालेल्या मुलीला थांबवत सुकन्या म्हणाली, "ज्याच्यासाठी या केसांना वाढवलं तोच आता माझा नाही मग कोणाला दाखवू हे केस?"

"स्वतःसाठी." ती मुलगी अगदीच निरागसपने बोलून गेली.

आतापर्यंत त्यांचे संभाषण ऐकणारी पार्लरची मॅनेजर जोरात खोकलली. ती मुलगी गप गुमान केस कापू लागली. सुकन्याच्या चेहऱ्यावर मात्र हसू की रडू असे भाव जमा झाले.

 तिला आवड नसतांनाहीं केवळ निलेशला आवडतात म्हणून पार कमरेच्या खाली केस वाढवले होते तिने. मग तिही प्रेमात पडली त्या केसांच्या.

"सुकू," किम ने तिला आवाज दिला, "कुठे हरवलीस?"

"काही नाही असंच आठवलं काहीतरी." सुकन्या तिच्या पापण्या टिपत उत्तरली. आज दिवसच अश्रुंचा निघाला होता तिच्यासाठी.

"हे तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी. मी सहजच विचारलं." तिचा उदास झालेला चेहरा बघून किमने सावरा सावर केली.

"इट्स ओके! काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात त्याला आपण काहीच करू शकत नाही." सुकन्या खाली बघत बोलली.

"हे, तु इथे कुठे कुठे फिरलीस? फॉरबीडन पॅलेस बघितलं का? तुमच्याकडे ते राजाचा राजवाडा म्हणतात त्याला." किम मोठेमोठे डोळे करून म्हणाला. त्याच्या तोंडून ते शब्द खूपच वेगळे वाटले. त्याला हिंदी भाषा बोलायचा प्रयत्न करतांना बघून तिला हसू आलं. अगदी लहान बाळाच्या तोंडून निघतात तसे बोबडे बोल वाटत होते त्याने बोललेले हिंदी शब्द.

किमला विषय बदलवून सुकन्याच्या उदासवाण्या चेहऱ्यावर हसू आणायचं होतं.

तसंच झालंही. सुकन्याला खूप आश्चर्य वाटलं किमला हिंदी शब्द बोलता येतो हे बघून. त्याहीपेक्षा त्याने तिला हसवायचा प्रयत्न केला. चला कोणीतरी मित्र समजणारं मिळालं.

"अजून नाही फिरली कुठेच. काल दुपारी बिजिंगला आली. मग रूम सेटिंग मधे वेळ गेला." सुकन्या हसून उत्तरली.

"हो का! मी फिरवेल ना सगळं. आज संध्याकाळी काय करणार आहेस तू? " सुकन्याच्या खुर्चीवर हात ठेवून तिच्याकडे झुकून कोणीतरी विचारलं.

युशानचा लहान भाऊ झू काई, युशानच्या अगदी विरुद्ध व्यक्तिमत्व असलेला. ज्या ज्या गोष्टी युशानला करायला आवडत नव्हत्या, त्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये झू काई पारंगत होता. त्याला ऑफिस मधील त्याच्या गुप्त हेरांकडून सुकन्या बद्दल कळते. सोबतच युशानला तिच्यामध्ये विशेष रस आहे अशीही माहिती मिळाली.

 "अशी मुलगी कोण जिच्यामुळे इतक्या दिवसांपासून थिजलेला हिम विरघळला." तिला स्वतः बघण्यासाठी तो ऑफिसला आला.

"हे हनी व्हेअर इज द इंडियन बनी?" झू काईने हुआला विचारलं. तिने किम सोबत बोलत असलेल्या सुकन्याकडे बोट दाखवले. त्याने त्याच्या विशिष्ट अंदाजात सुकन्याच्या खुर्चीवर हात ठेवून, तिच्या डोळ्यात डोळे टाकून विचारलं.

" संध्याकाळी काय करणार आहेस? " तो फुल ऑन फ्लर्टिंगच्या मूडमध्ये होता. पण सुकन्याच्या उत्तराने त्याच्या मूडचा मोमो झाला .

" घरी जाईल, स्वयंपाक करेल, जेवण करेल आणि झोपेल." सुकन्या भाबडेपणाने उत्तरली.

" बस इतकंच? " त्याने परत विचारलं.

" हा म्हणजे झोप नाही आली तर... " सांगू की नाही विचाराने सुकन्या बोलता बोलता थांबली.

" तर काय करशील? " झू काईने मोठ्या उत्साहात तिला विचारले.

" तर एखादा चायनीज हिस्टॉरिकल ड्रामा बघून मग झोपेल. " सुकन्या घाबरतच उत्तरली.

" बस? " त्याने परत विचारलं. तिने होकारार्थी मान हलवली.

"आमच्या भाऊरायाची संगिनी म्हणून शोभशील तू. पण आम्हालाही आवडेल तुझ्याशी मैत्री करायला. तसही एकाच वृत्तीच्या दोन लोकांनी लग्न करू नये असं म्हणतात. जास्त काळ टिकत नाहीत असं ऐकलंय. " झू काई तिला म्हणाला.

 तिने परत होकारार्थी मान हलवली कारण तिला तो काय बोलतोय ते काहीच कळलं नाही.

" तुझा वि चॅट दे. " झू काई त्याच्या फोन मधील वि चॅट ओपन करून म्हणाला.

 सुकन्या गोंधळली. एका पूर्णपणे अनोळखी माणसाला असं कसं वि चॅट स्कॅन द्यायचा. ती काही बोलणार, म्हणणार या आधीच झू काईने तिचा टेबलवर ठेवलेला मोबाईल उचलून तिच्या हातात दिला.

" हरीअप, मला दादा सारख्या मिटींग नसल्या तरी इतर बरीच कामं असतात. " तो तिला म्हणाला.

 तिला नकार देता आला नाही. तिने मोबाईल ओपन करून वि (WeChat) चॅट स्कॅन काढले.

"व्हेरी गुड. आई लाईक इट." म्हणत तो आला तसा निघून गेला.

 सुकन्या मात्र विचारात गढून गेली की आता हे नवीन पात्र काय गोंधळ घालेल?

" हे काळजी करू नकोस. याला फक्त फ्लर्ट करायला आवडते. गंभीर नसतो हा कोणाबद्दलच. " किमने माहिती पुरवली.

" पण या दोन भावांमध्ये तुझं सँडविच नक्की होईल असं दिसतंय मला. " हुआ हसून म्हणाली.

" अरे का भिऊन देताय तुम्ही तिला?" घरी जायची वेळ झाली म्हणून आपला डेस्क आवरून कंटेंट क्रियेटर हेड मिंग सुकन्याची विचारपूस करायला आली. शिन चॅनने तिला झू यीनच्या आदेशानुसार असे करायला सांगितले होते.

" आम्ही कुठे भिऊन देतोय तिला मॅम? तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना त्या दोघांबद्दल." हुआ म्हणाली.

 ती पुढे काहीतरी बोलणार त्याआधीच मिंगने डोळे दाखवून तिला थांबवलं, " पुरे आज साठी." मग तिने सुकन्याकडे वळून विचारलं, " तू रूमवर कशी जाणार आहेस?"

" सकाळी आली तशी शेयर टॅक्सीने." सुकन्या उत्तरली.

" माझ्यासोबत चल मी तुला ड्रॉप करते. माझं घर तिकडेच आहे. " मिंग तिला म्हणाली. ते निघणार तोच तिचा फोन वाजला. शिनचॅनचा फोन होता.

"यस!"

"ओह रियली."

" ओके ओके मी सांगते सर्वांना. " इतकं बोलून मिंगने फोन ठेवून दिला.

" एक आनंदाची बातमी आहे. बॉसची मार्केटिंग व फायनान्स टीम बरोबर झालेली आजची बैठक सक्सेसफुल झाली. लवकरच आपल्या नवीन प्रोजेक्टची लाँच पार्टी होईल. या खुशीत बॉस ने आज आपल्याला डिनर पार्टी दिली आहे." मिंगने आनंदात घोषणा केली.

" तू लकी आहेस आमच्यासाठी. अभिनंदन!" गाओ सुकन्या जवळ येऊन म्हणाला.

"धन्यवाद!" सुकन्या त्याला म्हणाली, "पण मला वाटतं असं काही नाही. सगळं तुमच्या मेहनतीचं फळ आहे. "

 "चला संध्याकाळ होता होता सगळं ठीक झालं." सुकन्याच्या मनात आलं.

" चला तर मग पार्टीला जाऊ आता सरळ सरळ." मिंग म्हणाली, " सुकन्या तुझी तिथे सर्वांशी नीट ओळखही करून देते."

" हो नक्कीच! आपल्या टीम मध्ये कोण कोण काय काय करतं मला काहीच माहिती नाही. " सुकन्या म्हणाली.

"चल मग टचअप करू." हुआ तिला वॉशरूममधे घेऊन गेली. लीन शा व झेन तिथेच होत्या. सुकन्या गुपचूप एका कोपऱ्यात उभी झाली.

" आणखी किती रिझवणार आहेस बॉस ला? " लीन शा ने सुकन्याला टोमणा मारला.

" रिझवू दे गं किती रिझवायचे ते. लवकरच हिची ऑफिसमधून हकालपट्टी होणार आहे. " झेन सुकन्याकडे बघून तुच्छतेने म्हणाली.

" अरे यार बस की आता किती टोमणे मारणार आहे तिला? मी घेऊन आली तिला इकडे. " हुआ त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणाली.

" अरे वा लवकरच पार्टी बदललीस तू. " लीन शा म्हणाली.

" जाऊदे गं, कुठे भिकाऱ्यांवर आपला वेळ घालवायचा. " झेन लिपस्टिक नीट करून बोलली.

हुआ तिच्याशी भांडायला पुढे सरसावणार त्याआधी सुकन्याने तिचा हात पकडून तिला थांबवले. केसांवर लावलेल्या हेअर पिन पासून ते हातातील पर्स, पायातील सॅंडल सगळं ब्रॅण्डेड मिरवत असलेल्या झेनने मानेला झटका दिला. परत एक तुच्छ कटाक्ष सुकन्यावर टाकून ती वॉशरूम बाहेर पडली.

" तु का थांबवलं मला? तुला माहितीये ती हे जे मीरवते ना सगळं ब्रँडेड ते इकडली बातमी तिकडे पुरवून मिळते तिला." हुआ रागात बोलली.

"हुआ, उगीच वादात पडून काही होणार आहे का? आपलं कोणी ऐकणार आहे का? सांग मला." सुकन्याने तिला विचारलं.

क्रमश :

कोण असेल हा निलेश? त्याचा सुकन्याच्या केसांशी काय संबंध? सुकन्या सोबत काय संबंध? तिला बीजिंग फिरवणार म्हणणारं हे नवीन पात्र काय वादळ घेऊन येईल तिच्या आयुष्यात?

 या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

 धन्यवाद!

 लेखिका अर्चना सोनाग्रे

🎭 Series Post

View all