साक्षीच्या विचाराने बाबा आता स्तब्ध झाले होते.
मध्यस्थी व्यक्तीला तर निरोप दिला होता, पण तो सारखा फोन करून " भेटायला या " असे म्हणत होता.
शेवटी साक्षीचे बाबा त्याला भेटायला गेले.
मध्यस्थी व्यक्तीने तडजोड करायला तयार आहेत असे सांगितले.
2,00,000 लाख , लग्न करून द्या व मुलीला काही सोन्याचं ते घाला असा प्रस्ताव मांडला.
पण साक्षीच्या बाबांना माहित होते , ' साक्षी कधी ही हुंडा देण्यासाठी तयार होणार नाही ' .
मध्यस्थी व्यक्ती बोलून गेला, " जर तुमची मुलगी डॉक्टर असती, तर हुंडा घेण्याचा प्रश्नही आला नसता. फक्त मुलगी आणि नारळ घेऊन गेलो असतो " .
आता मात्र बाबांचे डोळे चमकले.
त्यांना वाटले, ' ज्या हुंड्यासाठी मी पैसा ठेवला होता तो पैसा जर मी तिच्या डॉक्टर होण्यासाठी सुरूवातीपासूनच लावला असता तर आज ही वेळ आली नसती . स्वतःची मुलगी डॉक्टर ही झाली असती व चांगले स्थळ ही माझ्या हातातून निसटले नसते ' .
साक्षीने घरच्यांना सांगून टाकले की, " तालुक्याच्या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मी जॉब करणार आहे. मला अगोदर त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारना करावी लागेल " .
आईला तर टेन्शन आले होते.
आईला वाटले, ' कसे करेल हे सगळं साक्षी ? तिला जमेल का ? ' .
बाबांना तर आता परवानगी द्यावीच लागणार होती , ' कारण मुलीला तर शिकवले आता ती स्वतःच्या पायावर उभे राहू पाहत आहे तर मी कसा अडवणार ' .
येणारा पैसा कोणाला नको असतो त्यामुळे बाबांनी तिला परवानगी दिली.
गावामध्ये एक ही प्रायव्हेट हॉस्पिटल नव्हते फक्त एक सरकारी दवाखाना होता . त्यामध्ये एकच डॉक्टर व एकच नर्स होती. त्यामुळे त्या सरकारी दवाखान्यामध्ये तर जागा रिकामी होणे शक्य नाही म्हणून तिला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार होते.
तालुक्याच्या ठिकाणी बरीच हॉस्पिटल होती.
काही हॉस्पिटलमध्ये जाऊन तिने स्वतःचा रिझ्युम दिला.
आता कोणतीही मैत्रीण तिच्या सोबत नव्हती.
साक्षी मोठी झाल्यामुळे ती आता एकटी कुठेही फिरू शकत होती. तिला कशाची ही भीती वाटत नव्हती.
" हॉस्पिटलमधून फोन येईल, त्यानंतर तुम्ही येऊन भेटा " , असे सांगण्यात आले.
साक्षीने बाबांचा च नंबर दिला होता.
तिने ठरवले होते , ' पहिला पगार आला की अगोदर फोन घ्यायचा. नंतर सगळ्यांसाठी काही ना काही भेटवस्तू घ्यायच्या ' .
आजीला आता आनंद झाला होता , ' नात डॉक्टर झाली म्हणून ' .
साक्षी सांगत होती , " मी डॉक्टर नाही झाले, नर्स आहे " .
पण आजीसाठी ती डॉक्टरच होती.
एक-दोन हॉस्पिटल मध्ये तिला बोलावण्यात आले.
एका हॉस्पिटलमध्ये पगार कमी होता व दिवसा ड्युटी मिळाली होती पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पगार भरपूर होता व दोन शिफ्टमध्ये काम करावे लागणार होते.
तसा साक्षीला कोणताही अनुभव नसल्यामुळे आहे तो पगार स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
तिला माहित होते , ' नाईट ड्युटी करायला आपल्याला घरून परवानगी मिळणार नाही ' .
त्यामुळे तिने स्वतः निर्णय घेऊन दिवसा ड्यूटी करण्यासाठी त्या हॉस्पिटल ला कळवून दिले.
तिचा व बाबांचा वेळ जमत नसल्याने तिने बस ने जायचे ठरवले. तिने तसा पास ही काढून ठेवला होता.
साक्षी खूप आनंदात होती.
तिच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा व आनंदाचा दिवस होता.
आज तिची खऱ्या अर्थाने आयुष्याची नवीन पहाट सुरू झाली होती.
तोच दिवस तीच पहाट होती पण तिला आज नवीन अशी भासत होती.
तसेच असते जसा आपला मुड असतो तशाप्रकारे आपल्याला तो दिवस भासतो.
साक्षी लवकर उठून तयार होऊन कामाच्या ठिकाणी पोहोचली.
पहिला दिवस तर तिला सगळा समजावून घेण्यातच गेला.
तिला दोन युनिफॉर्म घ्यायला सांगितले व सगळे मॅनर्स समजावून सांगण्यात आले.
तिला तर हॉस्पिटलच्या वासानेच डोकं गरगरायला होतं.
ती एक-दोन वेळा आईसोबत गावातील दवाखान्यात गेली होती तेव्हा तिचा अनुभव होता.
पण इथल्या हॉस्पिटलमध्ये मात्र तसा अनुभव तिला आला नाही. हॉस्पिटल मध्ये खूप स्वच्छता व अति नीरव शांतता होती.
तिला तिचे स्वप्न आठवले, ' मी जर डॉक्टर झाले असते तर माझे ही असेच हॉस्पिटल असते ' .
ती जेव्हा डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरली, तेव्हा समोरचा प्रशस्त टेबल व खुर्ची बघून तिच्या स्वप्नांना उजाळा मिळाला.
तिच्या डोळ्यात पाणी तरळले व तिने तो आवंढा गिळून टाकला.
' हे पण काम डॉक्टर सारखेच आहे, फक्त आपण निर्णय घेत नाहीत बाकी सर्व कामे करतो ' , असे मनाला समजावत केबिनमधून बाहेर आली.
पेशंटची नावे लिहून घेणे, फोन कॉल्स अटेंड करणे ,अपॉइंटमेंट घेऊन ठेवणे, डॉक्टर्स पेशंटला चेक करण्यापूर्वी सर्व तयारी करून ठेवणे , कधी-कधी इंजेक्शन देणे व डॉक्टर सांगतील ते हॉस्पिटल्समध्ये सर्व व्यवस्था पाहणे अशी अनेक बरीच कामे तिच्या वाट्याला येत राहिली.
साक्षी कामांमध्ये रमत चालली होती.
तिचा पगार जेमतेमच होता पण तिला फोन घेता यावा एवढा नक्कीच मिळाला.
पहिला पगार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा व आठवणीचा असतो.
पहिला पगार घरी घेऊन आल्यानंतर तिच्या आईने तिला, " अगोदर देवा जवळ पेढा ठेव व सगळ्यांना पेढे दे " , असे सांगितले.
आज आईचा ऊर भरून आला होता.
बाबांनाही समाधान वाटत होते.
' मुलगी शिकली प्रगती झाली, खरंच ते सत्य आहे ' , असे बाबांना वाटले.
बाबांनी आज साक्षीला जवळ घेतले व मायेने डोक्यावरून हात फिरवला.
साक्षी कळायला लागल्यापासून ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती पण तिला कधीच बाबांनी मायेने स्पर्श केला नव्हता.
मला वाटतं आपल्या मुलांना जवळ घेण्यासाठी त्याने कोणता मोठा तीर मारायला हवा का?
लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्यांचा हक्क त्यांना मिळायलाच हवा.
डोक्यावरून मायेने हात फिरवण्यासाठी कोणत्या दिवसाची वाट पाहणे नसावे.
रोजचा दिवस मुलांसाठी प्रेमाचा असावा.
गरज असेल तर रागे ही भरावे.
एक -दोन महिने झाले असतील- नसतील तोपर्यंत मामा येऊन घरी धडकला.
मामाच्या मुलाने कॉमर्स पूर्ण करून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याचा अजून कुठे जम बसला नव्हता .पण मुलासाठी साक्षीला मागणी घालायला आला होता.
साक्षीला जेव्हा कळले तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला.
त्या अगोदरच बाबांनी त्याला पळवून लावले.
बाबांनी आईला ऐकवले , " माझ्या बहिणीच्या घरी मुलगी दिली नाही तर तुझ्या भावाच्या घरी ही देणार नाही " .
बिचारी आईचा तर काहीच संबंध नव्हता.
आत्याच्या बाबतीत जे काही केले ते साक्षी चा निर्णय होता.
पण तिला ऐकून घ्यावे लागले.
साक्षी ही आपल्या मतावर ठाम राहिली, " जे आत्याच्या बाबतीत बोलले तेच मी मामाच्या बाबतीत ही बोलेन " .
आजी आता वयाच्या मनाने खूप शांत झाली होती व शरीर ही साथ देत नव्हते.
साक्षी शी आता प्रेमळपणे वागत असे.
हेच प्रेम तिला तिच्या वाढत्या वयामध्ये भेटले असते तर तिचे कोमेजणारं मन अजून ताजेतवाने झाले असते.
वाढत्या वयामध्ये येणाऱ्या प्रसंगाला एकटीने साक्षीने धैर्याने तोंड दिले होते म्हणून ती आज इथपर्यंत पोहोचली होती.
' जेव्हा आपण यशाची पायरी गाठतो तेव्हा सगळे आपले कौतुक करतात व आपल्या बाजूने उभे राहतात पण खरी गरज तर त्या यशापर्यंत पोहोचेपर्यंत ज्या अडचणी येतात तेव्हा त्यांची साथ असायला हवी '
पाण्यामध्ये जेव्हा आपण पोहायला शिकतो तेव्हा मदत लागते. एकदा का आपण पोहायला शिकलो की कोणाचीही गरज नसते.
तसेच आयुष्यामध्ये ही संकटे आल्यावर इतरांची मदत लागते. तेव्हा मात्र सगळे हात वर करतात.
साक्षी आपल्या कामामध्ये व्यस्त झाली होती.
नवीन -नवीन गोष्टी शिकून घेत होती. तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवायची इच्छा होती. त्यासाठी ती माहिती काढत असे.
तिच्यासारख्याच नवख्या नर्स स्टाफ तिथे होत्या.
एखादी -दुसरी जुनी होती ती तिचा अनुभव सगळ्यांसोबत सांगत असे. आतापर्यंत झालेला त्यांचा प्रवास एकमेकींसोबत शेअर करत त्यांचे दिवस चालले होते.
साक्षी खूप आनंदात होती.
' पुढे आयुष्यामध्ये काय करायचे ' , याची ती रणनीती आखत होती.
ती नवीन असल्यामुळे तिला जास्त कामे तिच्या वाट्याला येत नसायची पण ती सगळं शिकून घेण्याचा प्रयत्न करत होती.
तिच्या सोबतचा स्टाफ ही चांगला होता. त्यामुळे ती तिथे रमली होती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा