पछाडलेला वाडा भाग 1

परदेशातून आलेल्या अंशला त्याचा वाडा का विकला जात नाहीये त्याचे कारण कळेल का ? जाणुन घेण्यासाठी वाचा रहस्यकथा पछाडलेला वाडा.
पछाडलेला वाडा भाग 1

अंश तब्बल आठ - दहा वर्षांनी अमेरिकेतून भारतात आला होता. इथे त्याच्या नावे असलेला वडिलोपार्जित वाडा काही कारणास्तव विकला जात नव्हता. त्याने नेमून दिलेल्या एजंटलाही त्या घराचा व्यवहार करण्यास अडचणी येत होत्या. त्यामागे नक्की काय कारण असावे हे त्याला कळत नव्हते. त्याने काही नातेवाईक आणि मित्रांकरवी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण हाती फारसे काही लागले नाही. वाड्याविषयी बोलण्याचे सर्वच टाळत होते. सरतेशेवटी त्यालाच वेळात वेळ काढून भारतात यावे लागले.

तो आल्याचे त्याने जरा गुलदस्त्यातच ठेवले होते. तीन-चार वर्षांपूर्वीच त्याचे आईवडील हे जग सोडून गेले होते. तेव्हापासून वाडा तसा रिकामाच पडला होता. त्याच्या आईवडिलांच्या पश्चात करोडोंची मालमत्ता अशीच पडून होती. अंश एकुलता एक वारस असल्याने आपोआप ती मालमत्ता त्याची झाली होती. जुने बांधकाम असल्याने वाडा आतून मजबूत होता. पण बाहेरून मात्र बरीच पडझड झाली होती. थोडीशी डागडुजी आणि रंगरंगोटी केली तर पुन्हा तो वाडा दिमाखात उभा राहिला असता, पण अंशला त्यावर आता एक रुपयाही खर्च करावासा वाटत नव्हता. लवकरात लवकर वाड्याचा व्यवहार करून इथून कायमचे निघून जावे ह्या विचाराने तो आला होता.

त्याच्या जन्मगावी पोहचेपर्यंत त्याला बराच उशीर झाला होता. थंडीचे दिवस असल्याने लवकर अंधारून आले होते. तो त्याच्या गावच्या वेशीवर येऊन पोहचला. समोर प्रवेशद्वारावर असलेल्या अर्धगोलाकार कमानीवर मोठ्या अक्षरात लिहिलेले नाव वाचून तो भारावून गेला. "वडगाव हद्दीत आपले स्वागत आहे." हे वाक्य त्याने कमीत कमी पाच-सहा वेळा तरी वाचले असावे.

हातातली बॅग सांभाळत जड पावलांनी तो पुढे चालू लागला. त्याची वाट बघणारे आई - वडील आता ह्या जगात नव्हते. त्याला स्वप्नात देखील वाटले नव्हते की स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याला त्याच्या मातीला कायमचे मुकावे लागेल. पण कुठेतरी समाधानही होते की त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर आजवर खूप प्रगती केली होती. अर्थात त्याच्या आईवडिलांचा त्याला भरपूर पाठिंबा होता. म्हणून तर तो यशाची शिखरे गाठू शकला होता.

मागील गेल्या कित्येक वर्षांपासून तो इथे आला नव्हता. त्यामुळे त्याला कोणी ओळखेल की नाही ही शंकाच होती. त्याने लांबूनच नजर टाकली. विजेच्या खांबाच्या पिवळसर रंगात गाव उजळून निघाले होते. वडगावाचा नूर पूर्ण पालटला होता. बरीच उलथापालथ झालेली दिसत होती.

अंशच्या नजरेसमोरून त्याच्या बालपणीच्या सर्व आठवणी भराभर जाऊ लागल्या. अगदी काल परवाच गावभर बागडत फिरणारा तो, स्वतःच्या डोळ्यांसमोर नाचू लागला. जुन्या आठवणींनी गर्दी करताच त्याचे मन भरून आले. त्याला आता गावात शिरावेसे वाटत होते, परंतु त्याने मोह टाळला.

अंशला अंधुकसे आठवत होते की त्या कमानीच्या बाहेरूनच कुठेतरी त्याचा वाडा होता. तो वाडा फार पूर्वी त्याच्या आजोबांनी त्यांच्या शेतातच बांधून घेतला होता. आता कुणास ठाऊक, तिथे वस्ती पसरली होती की अजूनही शेतरांगा होत्या. तिथूनच तो वाड्याकडे जायचा रस्ता शोधू लागला. बरं कुणाला काही विचारावं तर साधं चिटपाखरूही त्याच्या दृष्टीस पडेना. त्याच रस्त्याने थोडे चालत गेल्यावर तो वाडा दिसेल असा त्याने कयास बांधला. अंधाऱ्या रात्री चाचपडतच तो वाडा शोधू लागला.

वाडा आता ओसाड पडला असेल हे त्याला माहीत होते. राहण्याजोगे तर नक्कीच नसावे अशी त्याला खात्री होती. कारण त्याचे आई वडील होते तेव्हा त्यांच्या हाताखाली एक घरगडी होता. वाड्याची देखभाल तोच करत असे. ते निवर्तल्यानंतर मात्र तो घरगडी निघून गेला होता. त्यामुळे वाडा सूनाच पडला होता. नंतर गावात तात्पुरती राहायची कूठे सोय होते का ते पाहावे लागणार होते. आधी वाडा नजरेखाली टाकून घेऊ. मग गावात राहण्याची व्यवस्था पाहू ह्या विचारातच तो चालत होता.

तितक्यात त्याला जोरात किंकाळी ऐकू आली. तो चालत असलेल्या विरूद्ध बाजूने अगदी समोरून कुणीतरी धावत येत होते. तो जागीच थबकला. त्याने नीट निरखून पाहिले तर एक बाई दोन्ही हात हवेत हलवत बेंबीच्या देठापासून ओरडतच गावाच्या दिशेने पळत होती. काहीतरी असंबंध बोलत होती. तिच्या देहबोलीवरून ती प्रचंड घाबरलेली दिसत होती.

अंश मदतीसाठी रस्ता ओलांडून जाणार तोच ती महिला आरडाओरड करत कमानीच्या आत शिरली देखील. ती जिकडून पळत आली तिकडे अंश टक लावून काही दिसतंय का म्हणून पाहत होता. कदाचित ती एखाद्या प्राण्याला किंवा कशाला तरी पाहून घाबरून गेली असावी. किंवा मग तिचा कुणीतरी पाठलाग तर करत नसावं ना, म्हणून अंश तिथेच थांबून शोधण्याचा प्रयत्न करू लागला.

गावात एकाएकी खळबळ माजली होती. कुणीतरी एक स्त्री लांबूनच गावाकडे ओरडत पळत येताना काही लोकांना दिसली. एका क्षणात गाव गोळा झाला. तिला त्या रस्त्याने असे सुसाट वेगाने येतांना पाहून काय झाले असेल याचा अंदाज गावकऱ्यांना येऊन गेला होता.

ती स्त्री गावची कमान ओलांडताच बेशुद्ध पडली.

" रखमे, अये रखमे. उठ की." 

घरातून धावत पळत आलेला तिचा नवरा संजय घाबरुन तिला एकसारखा आवाज देत होता.

तिची अवस्था त्याच्याकडून बघितली जात नव्हती.

" पण मी म्हणतू रातच्याला तिकडे जायाचच  कशापायी." गर्दीत कुणीतरी तोंड उचकवल.

" आरं बाबा, तिचा बाप आजारी होता. त्याला पाहायला माहेरला गेलती. तिकडून निघाया उशीर झाला. रातच्या टायमाला गाड्या तरी राहत्यात का ? तिला काय हाऊस थोडी हाय." आधीच घाबरलेला संज्या त्याच्यावर डाफरला.

" काहीतरी उपाय कराया पाहिजे. असं कसं चालीन. मी म्हणतू परत तांत्रिक बोलवाच. आजुन मंत्र फुकुन देऊ." एकजण तावातावाने बोलला.

" आरं पण इतकं सोपं हाय का ते ? ते भूत पिसाळल म्हंजे ?" गावातील एक वयोवृद्ध माणूस समजावत होता.

" नाना, मंग काय असच घाबरून राहायचं व्हय. लोक गाव सोडून जातील अशाने. निम्मं गाव गेलं बी सोडून." गर्दीतून कुणीतरी तरुण बोलला.

" व्हय नाना, लयी झालं आता. बायामाणसास्नी भ्या वाटतयं त्या रस्त्यावरन जायला. काहीतरी उपाय कराया पाहिजे." दुसऱ्याने त्याची री ओढली.

सर्वांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

" बरं, दिवस उजाडल्यावर जाऊ तांत्रिक बाबाकड. मंग तर झालं."

हे कानावर पडताच जमलेल्या मंडळींनी समाधानाचा सुस्कारा सोडला.

रखमाच्या तोंडावर ग्लासभर पाणी शिंपडून पण ती शुद्धीवर येत नव्हती. संज्यासहीत दोन-चार गडी माणसांनी तिला उचलून गावातल्या सरकारी दवाखान्यात नेले.

तिथे जमलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरले होते. वातावरण एकदम गंभीर झाले होते. दबक्या आवाजात कुजबूज सुरू झाली होती. सर्वांच्या तोंडून वाडा हा एकच शब्द बाहेर पडत होता.

अंशला तिकडे काहीच दिसले नाही. त्या महिलेच्या मागोमाग तो गावात आला. तो त्या गर्दीत मिसळला खरा. पण गडबड गोंधळामुळे ते फारसे कुणाच्या लक्षात आले नाही.

त्या स्त्रीला नेमके काय झाले, हे जाणून घ्यायची त्याला फार जबरदस्त इच्छा झाली होती. मात्र लोकांच्या बडबडीत तो समजून चुकला की त्यामागे वाड्यासंबधीतच काहीतरी होते.

ह्या गंभीर प्रसंगी त्याने तोंड उघडले असते तर त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली असती. परिस्थितीची गांभीर्य ओळखून त्याने तिथून काढता पाय घेतला.

क्रमशः

🎭 Series Post

View all