पछाडलेला वाडा भाग 2

वडगावच्या वाड्याचे सत्य अंशला समजेल का ? जाणून घेण्यासाठी वाचा पछाडलेला वाडा.
पछाडलेला वाडा भाग 2

साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट.

येत्या दोन-चार दिवसात अमावस्या होती. अखंड रामनामाचा जप करत शिवा रस्त्याने जीव मुठीत घेऊन झपझप पावले टाकत चालत होता. हातातली बॅटरी रस्त्यावर चमकवत तो खड्डे चुकवत भरभर रस्ता कापत होता. उशीर झाला म्हणून मनातल्या मनात स्वतःलाच त्याच्या भरमसाठ शिव्या देऊन झाल्या होत्या.

चांगलेच अंधारून आले होते. रातकिड्यांची किरकिर आणि मधूनच कुत्र्याचे रडगाणे त्याच्या भितीत भर टाकत होते. दुरूनच त्याला गावातले लाईट चमकताना दिसले. वडगावची वेस जवळ आली म्हणून त्याच्या मनाला दिलासा मिळाला. पण तरीही त्या सुमसान जागेवरून डोलणारी गार हवा त्याच्या अंगावर शहारा आणायला पुरेशी होती.

दुरूनच दिसणारे वडगावचे ते टिमटिमणारे लाईट आता जास्त प्रकाशमान दिसायला लागले होते. शिवाच्या जीवात जीव आला. पण डावीकडे बघणे तो टाळत होता.

एकदम नाकासमोर चालत तो सरळ बघत होता. बस थोडेच अंतर बाकी होते. अगदी थोडे. तितक्यात त्याला पाठीमागे काहीतरी जोरात लागले. तो दचकला. त्याने मागे बघणे टाळले. पुन्हा काहीतरी टोचनारी वस्तू पाठीला लागली. त्याला घाम फुटला. पण त्याने झपाझप चालणे सुरू ठेवले. कोणत्याही परिस्थितीत मागे वळून बघायचे नव्हते.

पुन्हा काहीतरी अनुकुचीदार वस्तू त्याला पाठीला टोचली. त्यामुळे पाठीला थोडी वेदना झाली. तो कळवळला. बहुतेक पाठीमागून त्याला कुणीतरी खडे मारत असावं. गारठ्यातही त्याला घाम फुटत होता. त्याने आता धावायला सुरुवात केली. अगदी समोर हाकेच्या अंतरावर गाव होते. त्याने वेग वाढवला.

धावता धावता तो धडामदिशी तोंडावर आपटला. रस्त्यावर जोरात पालथा पडल्याने थोड्या वेळासाठी त्याचे सर्वांग बधीर झाले. त्याला उठता देखील येत नव्हते. दोन्ही हातांवर जोर लावून तो उठायचा प्रयत्न करत असताना त्याचे लक्ष नकळत डावीकडे गेले.

आता त्याला दरदरून घाम फुटला होता. तो नेमका त्या वाड्यापुढे पडला होता. तो वाडा आ वासून त्याच्याकडे पाहत होता. जसे काही आताच त्याला गिळंकृत करेल. रात्रीच्या अंधारात ती पांढरी वास्तू एखाद्या अवाढव्य राक्षसाप्रमाणे भासत होती. त्याची बुद्धी सुन्न झाली. अंग ठणकत असल्याने हालचाल करणेही जड जात होते. कसाबसा जोर लावत तो उठू लागला.

अचानक वाड्यातून कसला तरी प्रकाश चमकायला लागला. शिवाची नजर तिकडे गेली. पाहतो तर काय ? एक पांढरी आकृती त्या वाड्याच्या आतून डोकावत त्याच्याकडे रोखून पाहत होती. शिवाची धडधड वाढली. घाबरुन नाकाने श्वास घेण्याऐवजी तो तोंडाने घ्यायला लागला. कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले.

त्या खिडकीतून तो उजेड त्याच्या दिशेने झेपावत होता. त्यामुळे शिवाची नजर वारंवार तिकडे जात होती. ती आकृती अदृश्य झाली होती. शिवाने पूर्ण ताकदीनिशी जोर लावला. कसाबसा उठून उभा राहत त्याने आपला तोल सांभाळला. पुन्हा त्याची नजर वाड्याकडे गेली. ती पांढरी आकृती त्याला पुन्हा दिसली. कधी डाव्या खिडकीतून तर कधी उजव्या खिडकीतुन त्याला ती क्षणाक्षणात दिसत होती.

एकाएकी वाड्याचे ते दणकट दार खाडकन उघडले गेले. जसे काही त्याला कुणीतरी आत येण्यासाठी खुणावत होते. शिवा भीतीने थरथरत होता. आता आपले काही खरे नाही. आता आपण उद्याची सकाळ पाहू शकणार नाही. आता आपण मेलो. त्याच्या डोक्यात भयाने काहूर माजले.

अंगात शक्ती संचारल्यासारखा तो भूत भूत करत वेड्यागत सुसाट धावत सुटला.

" मला वाचवा. मला वाचवा. मी मेलो. मी मेलो."

शिवा नुसता आरडाओरड करत गावात शिरला.

त्याचा गोंधळ ऐकून झोपलेले गाव जागे झाले. पटापट लाईट लागले. लोकं घरातून बाहेर आली.

तो कमानीतून आत शिरत मोकळ्या जागेत 'मेलो, मेलो, भूत, भूत.' म्हणून गोलगोल फिरत ओरडत होता.

चारपाच आडदांड लोकांनी त्याला गच्च पकडले. त्यांच्याने सुद्धा तो आवरला जात नव्हता. त्याला असे बिथरलेल्या अवस्थेत बघून बायकापोर घाबरून गेली. मुलं तर रडायलाच लागली. शिवा अखंड बडबडत होता.

पहिलवान हरीने त्याच्या मागे धावत त्याला कसेबसे धरले. काबूत आणण्यासाठी त्याला आपल्या बलदंड बाहूत जखडले. शिवा सुटण्यासाठी त्याचे हात काढून टाकण्याचा प्रयत्न करत होता. हरीचे आपल्या गळ्याभोवतीचे मजबूत पाश सोडवण्यासाठी तो धडपडत होता. हरीने आपले दोन्ही हात अजून आवळून धरले. शिवा हातपाय झाडू लागला.

संपूर्ण गाव त्याची अशी हालत पाहून हादरून गेला होता.

कुणीतरी पटकन पुढे येऊन हनुमान चालीसा बोलायला सुरुवात केली. ती कानावर पडताच शिवाचा प्रतिकार मंदावू लागला. तो शांत शांत होत गेला. धावणारी हृदय स्पंदने धीमे पडू लागली. अंगातले त्राण नाहीसे झाले होते. त्याचे डोळे आपोआप मिटले गेले.

मघापासून सगळीकडे नाचत फिरणारा शिवा भरपूर दमला होता. त्यात हरीला विरोध करताना त्याची उरलेली ताकद खर्ची पडली होती. हनुमान चालीसाचा प्रभाव म्हणा किंवा त्याची शारीरिक आणि मानसिक झालेली ओढाताण म्हणा, शिवाने हरीच्या कुशीतच अंग झोकून दिले. कदाचीत त्याची शुद्ध हरपली असावी.

तासा दोन तासापासून चाललेला गोंधळ आता शांत झाला होता. सगळ्यांची भीतीने पाचावर धारण बसली होती.

हरीच्या कुशीत पहुडलेल्या शिवाला चार पाच लोकांनी उचलून घेतले. त्याला त्याच्या घरी नेण्यात आले. कुणीतरी प्रसंगावधान दाखवत गावातल्या डॉक्टरला बोलावून आणले. त्याच्यावर योग्य उपचार करून त्याला झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शनमुळे शिवा रात्रभर झोपला. पण गाव मात्र टक्क जागे होते.

त्याआधी गावात वाड्याबद्दल बऱ्याच उडवाउडवीच्या बातम्या पसरल्या होत्या. त्याबाबतीत महिलावर्गात चघळून चघळून चर्चा व्हायची. पण आज शिवाने प्रत्यक्ष डोळ्यांनी भूत पाहिल्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला होता. त्या दिवसानंतर "वडगावचा वाडा" झपाटलेला म्हणून ओळखला जाऊ लागला. अमावस्या जवळ येऊ लागताच लोक सतर्क व्हायला लागले. वाड्याकडे कुणी रात्री काय दिवसाढवळ्या देखील फिरकेनासे झाले. लोकांनी त्या रस्त्याचा वापर पूर्णपणे बंद करून टाकला होता.

त्या वाड्याचा वारसदार अंश देखील कित्येक वर्षांपासून गावाकडे फिरकला नव्हता. तो परतून येण्याची चिन्हे दिसत नव्हती.

नुकतीच गावकऱ्यांना कुणीतरी उडत उडत बातमी दिली की अंशने तो वाडा विकायला काढला आहे. असा झपाटलेला वाडा घ्यायला निदान गावात तरी कुणी धजावणार नव्हते. पंचक्रोशीत वडगाव बदनाम होऊ नये म्हणून लोक खबरदारी घेत होते. बाहेरचा कुणी खरेदी करायला आला तर लोक तो व्यवहार हाणून पाडत. गावकऱ्यांनी एका तांत्रिकाच्या मदतीने भूतबाधा पळविण्यासाठी अनेक उपाययोजना करून ठेवल्या होत्या. शिवाच्या बाबतीत झालेल्या घटनेची कुठेच वाच्यता झाली नव्हती.

त्यामुळे अंश ह्या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all