पछाडलेला वाडा भाग 3

वाड्यामागचे रहस्य अंश ला कळेल का जाणून घेण्यासाठी वाचा पछाडलेला वाडा.
पछाडलेला वाडा भाग 3

अंश तिथून ताबडतोब निघून आला. गावात जाऊन राहिलो तर वाड्याविषयी आपल्याला काहीच कळणार नाही म्हणून त्याने गावाजवळील शहरात काही दिवस वास्तव्य करायचे ठरवले. त्या शहरातील एका नामांकित हॉटेलमधे त्याने मुक्काम ठोकला. गावात कोणत्या बहाण्याने शिरता येईल हेच त्याला उमजत नव्हते. अनेक विचारांती त्याला उपाय सुचला.

अंश बऱ्याच वर्षांपासून परदेशात स्थायिक असल्यामुळे त्याचे रंगरूप आणि राहणीमान पालटले होते. त्यात अजून भर म्हणून त्याने भारतभ्रमण करायला आलेल्या विदेशी पर्यटकांप्रमाणे आपला पेहराव करून घेतला. आता गावात गेल्यावर त्याला कुणी ओळखणार नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेऊन तो गावात शिरला. हातात कॅमेरा घेऊन तो गावात फिरत होता. खेडेगावातील राहणीमान यावर आधारीत माहितीपट बनवण्यासाठी तो या गावात आला आहे अशी त्याने बतावणी केली. त्याने गावकऱ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्या लोकांशी बोलताना तो वाड्याबद्दल अधिक माहिती काढू लागला. सुरूवातीला कुणी बोलत नव्हते. पण काही टारगट मुलांपुढे विदेशी नोटांचे आमिष दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले.

त्या मुलांच्या बोलण्यातून त्याला असे कळले की, त्या वाड्यात एक वयस्कर जोडपे राहत होते. आपला मुलगा कायमचा परदेशी निघून गेल्याने ते फार दुःखी झाले होते. कालांतराने त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या हातून नीट अंतिम संस्कार न झाल्यामुळे त्यांना मुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे त्या वाड्यात रात्रीबेरात्री त्यांचा अतृप्त आत्मा भटकत असतो. काहींनी तर त्या आत्म्यांना पाहिलेही होते. तर काहींनी त्यांचे आवाज ऐकले होते. अधिकतर खिडकीजवळ उभी असलेली स्त्रीच लोकांनी पाहिली होती. जणूकाही ती हात दाखवून माझी इथून सुटका करा अशी म्हणत असावी. ती स्त्री म्हणजे अंशची आई असावी असे लोकांचे मत होते.

अंशला हे सगळे ऐकून फार मोठा धक्का बसला. कारण वास्तविक पाहता तसे काहीच नव्हते. त्याचा व्हिसा नाकारल्या गेल्यामुळे खूप इच्छा असूनही तो त्याच्या आईवडिलांच्या अंतिम समयी येऊ शकला नव्हता. त्यासाठी त्याने जीवाचे रानही केले होते. त्यावेळच्या परिस्थितीला लोकांनी आपले अर्थ लावून घेतले होते.

ह्या सर्व भ्रामक कल्पना ऐकून त्याच्या मनाला खूप यातना झाल्या. ह्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता ह्या गोष्टीच्या मुळाशी जाणे भाग होते. कुणाकडून मदतीची अपेक्षा करणेही चूक होते. काय करावे हेच त्याला कळेना.

त्याच्या दोन - तीन पिढ्या त्या वाड्यात वास्तव्यास होत्या. फार पूर्वी लोकांना ह्याच वाड्याचे जबरदस्त आकर्षण वाटायचे आणि आता लोक त्या वाड्याकडे फिरकायलाही घाबरत होते. वाडा विकला जाऊ नये म्हणून गावात उगाचच त्या वाड्या संबंधित वावड्या उठविण्यात आल्या असतील असे अंशच्या मनात येऊन गेले.

तो विचारातच चालत होता की त्याला मागून कुणीतरी हटकले.

" ओ पाव्हणं, इकडं कुठं ? आमच्या गावात तुम्हाला काय बी मिळणार न्हाय. तवा गपगुमान इथून निघायचं. कळलं का ?" एक रांगडा गडी त्याला धमकीवजा आवाजात बोलला.

" म्हणजे.? मला नाही समजले. तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे.?"

अंशच्या कपाळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

" वाड्याबद्दल लय चौकशा चालू आहेत ?"

" मला विकत घ्यायचा आहे तो वाडा." अंशने खडा टाकून पाहिला.

" येडबिडं लागलं की काय. त्या पोरांनी विदेशी पैश्याला भुलून खरं काय ते सांगून दिलं ना. आता गप बसायच. चालतं बनायचं."

" खोटं आहे ते. लोक वाट्टेल ते बोलत आहेत." अंश नाराज झाला होता.

" एकदा सांगितलेले कळत न्हाय व्हय ? इथे आमचाच जीव मुठीत धरून फिराया लागतयं. तुम्ही त्या वाड्याचा नाद सोडा. तुमच्यामुळं गाव सोडावा लागला.  सोपं हाय का ते आता. " जरासा घाबरून तो म्हणाला.

" अरे भूत वैगेरे काही नसतं बाबा. कसं समजावू तुम्हाला सगळ्यांना. यामागे कोण आहे तेच समजायला मार्ग नाहीये." अंश हतबल होऊन पुटपुटला.

" कोण हाय म्हंजी ? त्या अंशमुळ गाव संकटात हाय. त्यो लेकाचा तिकडं इदेशात जाऊन बसलाय. त्याच्यामुळचं सगळं व्हाताया. एकदाच सापडू दे हातात. न्हाय त्याला धुळीत लोळवीन तर नावाचा हरी न्हाय बघा." आपले दंड थोपटत तो म्हणाला.

" अरे हरी. तू ? तू मला ओळखल नाही. किती बदललास रे. जिमला जातो की काय.? कसली बॉडी बनवली आहे. लहानपणी हाडे मोजता यायची तुझी. आता बघ किती भारी दिसतोय."

अंश त्याच्या गळ्यात पडला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

हा गोऱ्या कातडीवाला असा काय करतोय म्हणून हरी पेचात पडला.

हरीकडून काहीच प्रतिक्रिया येत नाहीये म्हटल्यावर अंश त्याला ओळख देत म्हणाला.

" अरे मी अंश. तुझा बालमित्र. तो वाडा माझाच तर आहे. तोच विकायला आलो आहे."

" काहीपण फेकू नगं. चिमुटभर दाढीमिशी, डोसक्यावर उभ्या केसांचं झोपडं, हे झिरमिरी रंगीत कापडं अन् दुधावानी रंग पाहून कोण म्हणल की तू तो अंश हाय. उगा स्वतः ला अंश म्हणू नगसं. अंश काय येत न्हाय आता तिकडनं ." तो हताश होऊन म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून अंश जोरजोरात हसायला लागला. आपल्या पाकिटातून त्याने एक फोटो काढला. हरीच्या डोळ्यांसमोर नाचवत म्हणाला,

" हे बघ, आई, बाबा आणि मी. वाड्याच्या बाहेर काढलेला फोटो आहे हा. मी परदेशात निघालो होतो ना तेव्हा काढला होता. हा आमचा तिघांचा शेवटचा फोटो आहे." बोलता बोलता तो प्रसंग आठवून त्याचे डोळे थोडे पाणावले.

त्याच्या आई वडीलांसोबत असलेला फोटो पाहून हरी अवाक् झाला. त्याला ओळख पटली होती.

" अंश. भावड्या, किती बदलला रं तू. पहिले असा नव्हता. तुझ्यामुळं तुझ्या आई - वडीलांना किच्चा तरास व्हतोयं.. बिचारे आत्मा बनून वाड्यात फिराया लागलेत."

" हरी तुला खरंच वाटत का रे हे. काहीतरी गौडबंगाल आहे. मला तुझी मदत लागेल. करशील ना ?" अंश विचार करत म्हणाला.

" दोस्तांना मदत कराया आपण माग फुढ पाहत न्हाय. पण जे तू ऐकलं ते एकदम खरं हाय. दर आमावश्येला तिकडं भूत दिसत्यात."

" हरी ते माझे आईवडील आहेत. त्यांच्याबद्दल असे काही ऐकले की मला त्रास होतो." अंश अगतिक होऊन म्हणाला.

" चुकलं. ह्या समद्याचा तरास तुला होतोय ते दिसतंय. पण आपल्या हातात आता काय बी नाय. तुला पाहिजे तर आपण एक काम करू शकतो."

" कोणतं ?" अंशने हरीकडे आशेने पाहिले.

" तांत्रिक बाबाला भेटाया चल. आता तेच तुला यातून बाहीर काढतील."

" तुझ्या म्हणण्याप्रमाणे अमावस्येला तिथे भूत दिसते बरोबर ना."

" व्हय. काल रखमाला दिसलं. आज पण असेल वाटतं. काय सांगता येत न्हाय."

" आज रात्री माझी इथे कुठे राहायची सोय होईल का ?"

" व्हय. चल माझ्या बरुबर."

हरी अंशला घरी घेऊन गेला. हरीची बायको मुले गावी गेल्यामुळे तो एकटाच होता. अंशची गावात सोय झाली होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all