पछाडलेला वाडा भाग 4

वाड्यामागची खरी कहाणी जाणून घेण्यासाठी वाचा पछाडलेला वाडा.
पछाडलेला वाडा भाग 4

हरीच्या घरी गेल्यावर बोलता बोलता अंशला त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या. आत्म्याच्या भीतीपोटी लोकांनी कुठल्या तरी तांत्रिकाकडून सुरक्षाकवच म्हणून काळे धागे बांधून घेतले होते. मुठभर गावात भुताची प्रचंड दहशत दिसत होती. सत्य काय आहे ते त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचे होते. त्याच्याने स्वस्थ बसवले जात नव्हते.

रात्रीचे अकरा वाजले असतील. बाहेर काळाकुट्ट अंधार दाटून आला होता. वाड्याच्या भीतीने भयाण शांतता पसरली होती.

" हरी तुझ्याकडे काळे कपडे असतील तर ते घाल."

" काळे कपडे ? अन् ते कशापायी ? तू तो काळा कोट आणि गम बुट पण घालाया सांगशील. मंग आपण दोन्ही बी त्या गुप्तहेरावानी दिसू."

हरी मनातली भीती दूर करण्यासाठी वातावरण हलकं करत बोलला.

" ही काय विनोद करायची वेळ आहे का हरी ? अंधारात आपण कुणाला दिसायला नाही पाहिजे म्हणून."

अंश डोक्याला हात मारत म्हणाला.

" ते समदं ठाव आहे. पर आपल्याला कुणी भूत बित समजल मंग रं."

हरी भोळ्याभाबड्या मनाने म्हटला.

" मग तर एकदम भारी होईल. जर खरच तिथे भुतं असतील तर ती तुझ्यासारख्या भुताला घाबरून पळून जातील. माझा वाडा काहीही न करता आपोआप भयमुक्त होईल."

अंश मनमोकळेपणाने हसून म्हणाला. त्यामुळे हरीच्या मनाचा ताण थोडा हलका झाला.

" चल आता. इथेच बोलत बसू नको." अंश घाई करू लागला.

" मी सांगितलेलं समद लक्षात हाय ना." हरीने खात्री करण्यासाठी विचारले.

" हो रे. तुझ्या त्या तांत्रिकाने मंत्र मारून दिलेला दोरा मी मनगटावर एकदम पक्का बांधला आहे. तुझ्या गळ्यात हनुमानाची चैन आहे. माझ्या पाकिटात देवाचा फोटो आहे. इतकं सगळं असल्यावर आपल्याला भूत बिलगणार नाही. इतकं पुरेसे आहे का ? की अजून काही बाकी आहे. असेही आपल्याला वाड्यात जायचं नाहीये. लांबूनच बघून घेऊ."

अंश त्याला दिलासा देत म्हणाला.

"आर भावड्या, इथ मी लटपटतोय. तुझे आईबाप तुला देतीन सोडून. पर माझं काय ? मला धरलं म्हंजी. चल आता. जगलो, वाचलो तर येऊ घरला. न्हाय त.."

अंश त्याला पुढे बोलू न देता ओढतच घेऊन गेला.

तिथे पोहचल्यानंतर वाड्यापासून समोर लांब एका झाडीत ते लपून बसले. दाट झाडी असल्याने ते तिथे आहेत हे कुणाच्या दृष्टीस पडणे कठीण होते.

अंश डोळयात तेल घालून वाड्यावर पाळत ठेवत होता. हरीची आतून टरकली होती. बराच वेळ झाला. काहीच हालचाल जाणवत नव्हती. वाट बघून बघून ते कंटाळले.

" मी बोललो होतो ना, काहीच नाहीये." अंश वैतागून म्हणाला.

तितक्यात हरीने त्याच्या तोंडावर हात ठेवला. इशाऱ्याने त्याला वाड्याकडे बघायला सांगितले.

एक पांढरी आकृती वाड्यातील खिडकीत उमटली होती. ते पाहून हरी मनातून खुप घाबरला होता. त्याने अंशचा हात घट्ट पकडून ठेवला. त्याच्या ओठांतून रामनामाचा जप सुरू झाला होता.

अंश मात्र गंभीर होऊन वाड्याकडे रोखून पाहत होता. वाड्याच्या खिडक्या मोठमोठ्या होत्या. त्यामुळे बाहेरून तिथे कुणीतरी वावरत असल्याचे भासत होते. तो वाडा त्याला चांगलाच परिचित असल्याने काही गोष्टींचा कयास तो लावू शकत होता.

अचानक ती आकृती अदृश्य झाली. वाड्यातून घुंघराचा छमछम आवाज ऐकु येऊ लागला. लाईट चालू बंद होऊ लागल्या. पुन्हा ती आकृती दुसऱ्या ठिकाणी अस्पष्ट दिसू लागली. वाड्यातून चित्रविचित्र आवाज येत होते. त्यानुसार ती पांढरी आकृती वेगवेगळ्या ठिकाणी दिसत होती.

ते सर्व पाहून हरीची पाचावर धारण बसली. तो घामाने ओलाचिंब झाला होता. त्याचे हातपाय थरथरायला लागले होते. त्याची बिघडलेली तब्येत पाहून अंशची पण हिंमत खचली.

जे पाहिलं ते डोळ्यांसमोर होतं. गावकरी खोटं बोलत नव्हते. बाकी तो देव जाणे. हरीला काही कमी जास्त होऊ नये म्हणून अंश त्याला घरी घेऊन आला. अर्ध्या रात्रीनंतर केव्हातरी हरीला झोप लागली. पण अंशचे मन मात्र स्वतःला आतून पोखरत होते.

हरीची हालत आणि गावामध्ये होणाऱ्या घटनांना अप्रत्यक्षरीत्या तोच कारणीभूत असल्याने अंशच्या मनानेही कच खाल्ली होती. सकाळ होताच आपण इथून कायमचे निघून जाऊ असे त्याने मनाशी पक्के केले. पण त्याचे दुसरे मन त्याला खायला लागले. गावकऱ्यांना संकटात सोडून पळून जाणे त्याला पचत नव्हते. आपण तर निघून जाऊ पण गावकरी किती दिवस दहशतीत राहतील म्हणून तो ताडकन उठून उभा राहिला. मोठया हिंमतीने त्याने सरळ वाड्याचा रस्ता पकडला.

आपल्या सोबत जे व्हायचं ते होईल. आज एक घाव दोन तुकडे करूनच टाकू ह्या उद्देशाने तो वाड्याजवळ जाऊन पोहचला, परंतु ह्या वेळी समोरून न जाता मागच्या बाजूने गेला.

बघतो तर काय ? मघाशी दिसत असलेलं चित्र पुर्णपणे पालटलं होत. वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीत प्रकाश पसरला होता. रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी त्या नीरव शांततेत तिथून एक कोमल आवाज ऐकू येत होता. अंश सतर्क झाला. दबक्या पावलांनी चालत तो वाड्याच्या मागच्या संरक्षक भिंतीजवळ आला. ती अर्धी तुटून पडलेली होती. तिला ओलांडून सहज आत जाऊ शकता येत होते. वाड्याच्या उजव्या बाजूला कुठेतरी एक खिडकी असल्याचे त्याला थोडे आठवले. संपूर्ण वाडा त्याला आधीपासून ज्ञात असल्याने त्याने ती खिडकी बरोबर शोधून काढली. थोडासा खटाटोप करून तो त्या अर्ध्या तुटलेल्या खिडकीत लटकत उभा राहून आतमध्ये डोकवण्याचा प्रयत्न करू लागला.

कुणीतरी मुलगी पाठमोरी एका खुर्चीवर बसलेली दिसत होती. ती मधाळ आवाजात कुणाशी तरी व्हिडिओ कॉलवर प्रेमळ संभाषण करत होती. तिच्या बाजूला थोड्या अंतरावर दोन तरुण तिच्यावर नजर ठेऊन होते. जणू काही हे काम ते तिला जबरदस्ती करायला भाग पाडत असावे.

ते दृश्य पाहून अंशने आपल्या मुठी आवळल्या. संतापाने त्याचा चेहरा लाल झाला होता. भोळ्या भाबड्या लोकांच्या भावनांचा फायदा घेऊन इथे गैरप्रकार सुरू होता. लोकांच्या मनात दहशत निर्माण करून त्यांना इकडे फिरकू दिले जात नव्हते. का तर, आपला स्वार्थ साधला जावा म्हणून. अंशला आताच मध्ये जाऊन त्यांना इंगा दाखवावासा वाटत होता. पण त्याने मनावर संयम राखला. हे प्रकरण सर्वांसमक्ष कसे आणायचे याचा तो विचार करू लागला. त्याला लगेच सुचलं.

अंश त्या अर्ध्या भिंतीवर उभा राहीला. प्रसंगावधान राखत आपल्या खिशातून गुपचूप मोबाईल काढला. समोर घडत असलेले दृश्य त्याने पुरावा म्हणून आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. नंतर सावकाश उतरून तो चुपचाप तिथून निघून आला.

हरी अजूनही गाढ झोपेत होता. अंशला राहवले गेले नाही. स्वतःच्या कामगिरीवर तो खूप खुश होता. त्याने हरीला जबरदस्ती उठवून बसवले व मोबाईलमधले पुरावे दाखवले. ते पाहताच हरी अवाक् झाला. त्याने डोक्याला हात मारून घेतला.

" तू ह्या तिघांना ओळखतोस का ?"

" त्या पोरीला न्हाय, पण ह्या नालायकांना ओळखलं म्या. तू चल. यांना भूत बनून भटकायला लावतो की न्हाय बघच तू आता. " हरी बाह्या सरसावून निघायच्या बेतात म्हणाला.

" शांत गदाधारी भीम शांत." अंश हसून म्हणाला.

" मंग यांना काय असच सोडून द्यायाचा का ?"

" तू आधी खाली बस. पुढे काय करायचं ते मी सांगतो."

अंशने त्याला सर्व कल्पना समजावून सांगितली.

उद्याचा दिवस वडगावसाठी सोनेरी दिवस म्हणून उगवणार होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all