पछाडलेला वाडा भाग 5 (अंतिम भाग)

अंशमुळे वडगाव भयमुक्त होईल का? जाणुन घेण्यासाठी वाचा पछाडलेला वाडा.
पछाडलेला वाडा भाग 5 (अंतिम भाग)

पुढल्या रात्री अंश आणि हरी गावातल्या काही लोकांना घेऊन वाड्याचा मागे दबा धरून बसले होते.

थोड्या वेळाने वाड्यापासून दूरवर काही अंतरावर एक जीप थांबली. दिपक आणि त्याचा मित्र राजा एका पोरीला जबरदस्ती ओढत वाड्यात घेऊन चालले होते. त्या सर्वांनी पांढरे कपडे घातले होते. तिघांच्या तोंडावर विचित्र आकृती असलेले काळे मास्क होते. त्या मुलीच्या पायात पैंजण होते. रात्रीच्या गर्द अंधारात ते कुणाच्या दृष्टीस पडले तरी लोक घाबरून पळून जातील म्हणून हा सर्व उद्योग केला गेला होता. वाड्यात प्रवेश केल्यानंतर सुमारे अर्धा - एक तास त्यांनी आपल्या नेहमीचा खेळ सुरू केला. पण त्यांना कुठे माहीत की अंश आपल्या कॅमेऱ्यात त्यांचे सर्व कारनामे व्हिडिओ स्वरूपात कैद करत आहे म्हणून.

भुताचा खेळ संपल्यानंतर ते थोडे गाफील झाले. त्याचवेळी संधी साधत ह्या लोकांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला. त्या मुलीची सुटका करत सोबत आलेल्या लोकांनी त्या दोघांना मारून मारून अर्धमेला करून टाकले. शेवटी अंशला आणि हरीला त्यांना आवरावे लागले.

दिपक हा गुंड प्रवृत्तीचा असून गावच्या सरपंचाचा अतिशय वाया गेलेला मुलगा होता. त्याला सर्व प्रकारची व्यसने होती. शहरातल्या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तो त्यांचा गैरफायदा घ्यायचा. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून इथे यायला भाग पाडायचा. मग त्यांच्याकडून हवे तसे काम करवून घ्यायचा. दिपकने एक ॲप सुरू केले होते. त्या ॲपवर तो त्याने फसवलेल्या मुलींना विदेशी ग्राहकांशी नको ते बोलायला भाग पाडत असे. तसेच त्यांच्या नको असलेल्या मागण्या पण पूर्ण करायला लावत असे. त्याचे त्याला अमाप पैसे मिळायचे. दिपकचा मित्र राजा हाच तांत्रिक बाबा होता. राजाच्या मदतीने त्याने गावकऱ्यांच्या भीतीला अजून खतपाणी घातले होते. त्यामुळे त्यांचे काम गेल्या वर्षभरापासून बिनबोभाटपणे सुरू होते. दिपकचे सत्य उजेडात आले होते.

सकाळ होताच पोलिसांची गाडी गावात आली. पारावरच्या वडाला दिपक व राजाला अर्धमेल्या अवस्थेत जाड दोराने बांधून ठेवण्यात आल्याची वार्ताही गावात वाऱ्यासारखी पसरली. हातातली कामे सोडून लोक तिकडे धावले. संपूर्ण गाव जमा झाला. हा काय प्रकार आहे म्हणून गोंधळ माजला.

अंश सर्वांच्या पुढे उभा राहून बोलू लागला,

" मी अंश. त्या वाड्याचा वारसदार."

लोक आश्चर्याने, संतापाने ओरडू लागले. सर्वजण चिडून त्याच्याकडे दातओठ खात बघत होते.

सगळ्यांना थांबवत हरीने शांततेत ऐकायचे आव्हान केले.

" माझ्या वडगाववासियांनो, तुमची फसवणूक करण्यात आलेली आहे. वाडा पछाडलेला नव्हता. तुमची मानसिकता पछाडण्यात आली होती. वाड्यात भुताटकी वगैरे असे काहीच नव्हते."

" मंग आम्ही जे पाहिलं ते काय व्हत ?"

जमावातून एकजण ओरडला.

" आम्हाला काय बी कळून न्हाय राहिलं बगा."

संजय झाडाला बांधलेल्या त्या दोघांना पाहत पूर्णपणे गोंधळून म्हणाला.

एकच गलका सुरू होता. पोलिसांनी शिट्टी वाजवली.

" सर्वजण आधी शांत व्हा. मी समजावून सांगतो. तुम्हाला वाड्यात नेहमी भूत दिसते, तसे मला आणि हरीला पण दिसले. त्यानंतर त्या मध्यरात्री न राहवून मी पुन्हा गेलो. तिथे मला काही संशयास्पद हालचाली आढळल्या. मी माझ्या मोबाईलमध्ये काही फोटो आणि व्हिडिओ काढले. ते हरीला दाखवल्यानंतर त्याने दिपकला आणि राजाला ओळखले. गावातल्या काही लोकांना विश्वासात घेऊन आम्ही यांना रंगेहाथ पकडले आहे. त्याचाही पुरावा आहे माझ्याकडे."

असे बोलून अंशने व्हिडिओ चालू केला. लोक डोळे फाडून बघत होते.

तितक्यात गावचे सरपंच आबासाहेब धावत आपल्या मुलाच्या बचावासाठी आले.

" काही बी बोलू नग. माझा पोरगा असा न्हाय. उगाच बदनामी करू नको त्याची. बंद कर ते." आबासाहेब चरफडत अंशवर ओरडू लागले.

" ए हवालदार सोड त्याला. न्हाय तर तू घरी बसशील."

त्यांनी एका पोलिसाला तंबी दिली.

" आबासाहेब आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. तुमचा मुलगा गुंड प्रवृत्तीचा, व्यसनी आणि लफडेबाज आहे हे साऱ्या गावाला माहीत आहे. तो तुमच्या सुद्धा हाताबाहेर गेला आहे. तो काय करतो ? कुठे जातो ? किती पैसा उडवतो ? इतके पैसे त्याच्याकडे येतात कुठून ? याचा तुम्हाला तरी पत्ता आहे का ? काल याच्यासोबत असलेल्या मुलीने आम्हाला बरीच माहिती पुरवली. आम्ही तिला तिच्या घरी सुखरूप पोहोचवले आहे. एखाद्या मुलीने त्याचे नाही ऐकले तर तो तिला ब्लॅकमेल करायचा. त्याच्याजवळ असलेले फोटो आणि व्हिडिओ सर्व प्रसारमाध्यमांमध्ये पसरवेल अशी धमकी द्यायचा. बदनामीला घाबरुन मुली बिचाऱ्या हा सांगेल ते करायच्या. त्याच्या धमक्यांना घाबरून एक दोन मुलींनी आत्महत्या देखील केली आहे. अंशच्या हुशारीने याचं पितळ उघडं पडलं. नाहीतर हा कधीच जाळ्यात अडकला नसता."

इन्स्पेक्टर गरजला. आबासाहेब वरमले. त्यांनी मान खाली घेतली.

" म्हंजे मला दिसलं ते समदं खोटं होत." शिवा चिडून बोलला.

" अरे वेड्या, त्या दिवशी तू त्या रस्त्याने येणार आहे, याची कुणकुण ह्या दोघांना आधीच लागली होती. म्हणून त्यांनी तुझ्यावर प्रयोग केला. कारण यांना माहीत होते की तुला अनुभव आला म्हणजे गावात वणव्यासारखी बातमी पसरेल. पुढे यांचे काम सोपे होऊन जाईल."

" पण मला दगड कोण मारत होत ?"  शिवाला प्रश्न पडला.

" तेव्हा तू चप्पल घातली होती ना. त्यात तू फटाफट चालत होता. त्या रस्त्यावर वाळू पसरलेली असल्यामुळे त्या वाळूतले खडे तुझ्या चपलेत अडकून तुलाच लागत होते. " अंश गालात हसत म्हणाला.

" देवा. पांडुरंगा."

शिवा डोक्याला हात मारून दोन्ही पाय पोटात दुमडून मटकन खाली बसला.

" भित्या पाठी ब्रह्मराक्षस. अशी तुमच्या सर्वाची गत झाली होती. असो, आता सर्व उलगडा झाला आहे. आता तरी शहाणे व्हा. शिक्षणाने माणूस जागरूक होतो. अशिक्षित लोकांचा गैरफायदा घेतला जातो. जसा ह्या लोकांनी घेतला."

सर्वकाही स्पष्ट झाले होते. सत्य समजताच लोक पिसाळले. त्यांच्या तोंडून शिव्यांची लाखोली वाहिली जात होती. सर्वांच्या नजरेतून राग, द्वेष, आश्चर्य आणि हतबलता बाहेर पडत होती.

दिपक आणि राजाला मारायला जमाव चवताळून उठला. पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. जास्त काही अघटीत घडू नये म्हणून पोलिस त्यांना बेड्या ठोकून घेऊन गेले.

अंशची स्तुती करत सर्वांनी त्याचे वारंवार आभार मानले. आज खऱ्या अर्थाने वडगाव भयमुक्त झाले होते.

समाप्त.

🎭 Series Post

View all