Login

पडदा भाग-१

अधुऱ्या प्रेमाची रहस्यमय कहाणी!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

विषय:- अपूर्ण प्रेमकहाणी.
शीर्षक:- पडदा भाग -१

"मोहिनी, मी आज काही घरी जेवणासाठी येणार नाही. त्यामुळे माझं जेवण बनवू नकोस.आज मी माझ्या  मित्रांसोबत बाहेर जेवायला जाणार आहे." आपली बायको मोहिनीला निशांत म्हणाला.

निशांत टॉक्सीकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करत होता तर त्याची पत्नी मोहिनी एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरदार होती.

दोघांचा विवाह दोन वर्षांपूर्वीच झालेला होता आणि
दोघांचेही आई-वडील गावी राहत असल्याने या दोघांचा राजा-राणीचा संसार हा मुंबईसारख्या शहरामध्ये चालू होता. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते.

मोहिनीने आपला नवरा आज जेवायला येणार नाही म्हणून कालच आणलेली मेथीची भाजी बनवण्यासाठी  फ्रीजमधून काढली आणि आज तिला खाण्याचीही इच्छा झाल्यामुळे तिने बनवण्याचे ठरवले.

फुलके, मेथीची भाजी आणि डाळ- भात तिने स्वतःसाठी  रात्रीचे जेवण बनवले होते. त्यातच ती दोन महिन्यांची गरोदर होती. दोघांनाही येणाऱ्या बाळाची चाहूल लागल्याने तिने पूर्णपणे जेवण जेवावे हा निशांतचा हट्टच होता.

मोहिनी एका कंपनीत डाटा मॅनेजमेंट म्हणून काम करत होती आणि तिने तिला गरोदरपणातील होणाऱ्या त्रासामुळे काही महिन्यांची सुट्टी घेतलेली होती आणि तिचे काम आणि कामाप्रतीची निष्ठा पाहून कंपनीनेसुद्धा दिला याची मुभा दिलेली होती.

निशांत रात्री उशिराच घरी आलेला होता. त्याने पाहिले तर मोहिनी झोपलेली होती. ती उठू नये म्हणून त्याने आवाज न करता आपले आवरून तो तिच्या बाजूला जाऊन झोपला.

सकाळी खूप उशिराने निशांतला जाग आली आणि पाहतो तर मोहिनी झोपलेलीच होती. तिचा चेहरा दुसऱ्या बाजूने होता. त्याने आपले काम आवरून ऑफिसला जाण्याची तयारी केली आणि अजून ती का उठली नाही म्हणून पाहण्यासाठी तिच्याजवळ गेला तर तिच्या तोंडातून निघालेला पांढरा फेस पाहून त्याला घाबरायला झाले.

"मोहिनी ss अगं, तुला काय झालं? " तो आपल्या बायकोला जोरात हलवून जागे करण्याचा प्रयत्न करत होता.

नंतर त्याने तिच्या हाताची नस तपासली तर तिचे ठोके ऐकू येत नव्हते, मग त्याने तसाच हात नाकासमोर नेला तर श्वासही बंद पडलेले होते. ते ऐकून त्याने जोरात आपल्या बायकोच्या नावाने टाहो फोडला.

" मोहिनी ss मोहिनी ss तुला काय झालं?" तो इतका जोर जोरात बोलायला आणि रडायला लागला की बाजूच्या फ्लॅटमध्ये असणाऱ्या काही माणसांना त्याचा जोरात केलेला आक्रोश ऐकायला आला आणि त्यांनी त्याचे दार वाजवले.

त्याने कसेतरी उभे राहून दरवाजा उघडला आणि समोर त्याच्या शेजारची माणसं जमा झालेली दिसली.

त्यांनी काय असे म्हणून विचारले तर तो काहीच न बोलता आतमध्ये जाऊन, " मोहिनी ... मोहिनी... ती मला सोडून गेली." असे म्हणायला लागला.

शेजारच्या लोकांना हा काय प्रकार आहे काहीच कळत नव्हते. फक्त मोहिनी संबंधित काही आहे असे त्यांना वाटले आणि त्यांच्या दोघांच्या खोलीत जाऊन त्यांनी काय भानगड आहे हे बघण्याचे ठरवले.

तेव्हा तिथे गेल्यावर मोहिनीच्या चेहऱ्याकडे सर्वांचे लक्ष गेले आणि त्याच्या तोंडातून फेस आलेला त्यांना
दिसला. त्यामुळे त्यांनी मनातच तर्क लावायला सुरुवात केली आणि त्यातील एकाने लगेच पोलिसांना फोन करून ताबडतोब निशांतच्या घरी येण्याबद्दल सांगितले.

थोड्याच वेळात निशांतच्या घरी पोलिस दाखल झाले आणि त्यांनी सर्वांना बाजूला करत मोहिनीचा मृतदेह उचला नि ताबडतोब तपासणीसाठी न्यावा लागेल असे सांगितले. त्यातील शेजाऱ्यांमधल्या एका माणसाने निशांतचा फोन घेऊन त्याच्या अन्य नातेवाईकांना मोहिनीच्या मृत्यूबद्दल सांगितले.

मोहिनीचा झालेला मृत्यू हा सर्वांसाठी धक्कादायक होता कारण मोहिनी ही स्वभावाने शांत आणि सर्वांना मदत करणारी होती. तसेच निशांत आणि मोहिनीचे एकमेकांवरती किती प्रेम आहे, हे सर्व शेजाऱ्यांसकट त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा माहीत होते.

मोहिनीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले आणि त्याच्यानंतर त्यांनी तिचे मृत शरीर निशांतच्या हवाली केले.

हवालदार कुलकर्णी यांनी इन्स्पेक्टर नकुल वाघ यांच्याशी बोलायला सुरूवात केली की, " साहेब हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचे दिसत आहे. त्यांच्या पोटात तर विष गेलेले आहे आणि दुसरी गोष्ट अशी की रात्रीचे जेवण पण मर्यादित केल्यामुळे त्याच्याबद्दल जेवणातून त्यांना जर विषबाधा झाली असेल तर त्याबद्दलसुद्धा नीटशी काही माहिती आपल्याला मिळू शकत नाही. कारण सर्व भांडी घासून वगैरे ठेवलेली आहे आणि त्यांच्या नवऱ्यावरती संशय घ्यायचा म्हंटलं तर सर्वजण त्याच्याबाबत चांगलेच मत सांगत आहेत."

क्रमशः

मोहिनीला काय झाले असेल?

© विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.


0

🎭 Series Post

View all