Login

पडदा भाग-२

अपूर्ण प्रेमाची रहस्यमय कहाणी !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

विषय:- अपूर्ण प्रेमकहाणी.
शीर्षक:- पडदा भाग -२.

" हो, मला सुद्धा ही केस खूप गुंतागुंतीची वाटत आहे पण आपल्याला आपल्या हातून काही सुटत आहे का हे बघायला हवे." इन्स्पेक्टर नकुल विचारत करत म्हणाले.

मोहिनीला जाऊन बारा दिवस झाले होते आणि अजूनही तिच्या मृत्यूचे खरे कारण कोणालाही माहीत नव्हते गावावरून मोहिनीचे आणि निशांतचे आई-वडील दोघेही आले होते. चौघांच्याही चेहऱ्यांवर दुःख आणि हतबलता स्पष्ट दिसत होती. आपल्या मुलांचा संसार नीट चालू असताना मध्येच कोणाची तरी नजर लागल्यासारखे झाले असेच विचार त्यांच्या मनात येत होते तसेच निशांत तर खूपच शांत झाला होता. तो कोणाशीच बोलत नव्हता.

प्रकाश म्हणजेच मोहिनीचा मित्र त्याला इन्स्पेक्टर साहेबांनी चौकशीसाठी बोलावले होते.

" मिस्टर प्रकाश, तुमच्या मैत्रिणीचा असा संशयास्पद मृत्यू झालेला आहे तर तुम्ही आम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती असेल तर सांगू शकता का जेणेकरून आम्हाला तपासासाठी मदत होईल." इन्स्पेक्टर नकुल प्रकाशला उद्देश विचारत होते.

"खरे तर मोहिनीचा हा अचानक झालेला मृत्यू
खूपच धक्कादायक आहे, पण तिने असे पाऊल उचलले नसेल असे मला वाटते. ज्या पद्धतीने सगळ्यांनाच तिने आत्महत्या केली असे वाटत आहे पण मोहिनी एवढी  दुबळी नव्हती. कारण लहानपणापासूनच तिने कष्टाचे जीवन जगलेले होते आणि त्यातूनच तिने असे टोकाचे पाऊल उचलणे मला तरी पटत नाही आणि तिच्याशी माझा एक महिना झाले काही संवाद झाला नाही, म्हणजे मी तिच्याशी मेसेजद्वारे संपर्क केलेला होता पण तिने त्याचे काहीच उत्तर दिले नाही. मग कदाचित ती आपल्या आयुष्यात व्यग्र असेल असेच मला वाटलं म्हणून मी सुद्धा जास्त चौकशी केली नव्हती." प्रकाशने सांगितले.

" तुम्ही निशांतबद्दल काही सांगू शकता का ? म्हणजे काही तुम्हाला वेगळे वाटले असेल तर?"  दुसरा प्रश्न इन्स्पेक्टरांनी त्याला विचारला.

" तसे तर असे काही विशेष नाही कारण निशांतचे मोहिनीवर प्रेम होते. तो तिच्या ज्या इच्छा असतील त्या तो पूर्ण करायचा. फक्त लग्नाआधी आम्ही जेवढे भेटायचो तेवढे बाहेर भेटायचं प्रमाण थोडे कमी झाले होते आणि एका महिन्यापूर्वी निशांत आणि मोहिनीचे भांडण झालेले होते पण किरकोळ भांडण प्रत्येक जोडप्यामध्ये होतेच तर तसेच असेल तिने काही मला त्याबद्दल जास्त माहिती दिली नव्हती."  प्रकाशने जे काही माहीत होते ते पोलिसांना सांगण्याचा  प्रयत्न त्याने केला.

"ठीक आहे. आम्हाला तुमची काही मदत लागली तर आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ."  प्रकाशने सुद्धा त्यावर म होकार दिला.

निशांतने पोलीस स्टेशनमध्ये फोन करून मोहिनीच्या  मृत्युबद्दल काही समजले का याबद्दल चौकशी करण्यासाठी फोन केला होता.

" तपास चालू आहे." हेच उत्तर त्याला इन्स्पेक्टर नकुल यांनी दिले.

मोहिनीचा संशयास्पद मृत्यू ह्याबाबत सोशल मीडियासह अनेक ठिकाणी तिने आत्महत्या केली यावरच  शिक्कामोर्तब केल्यासारखी चर्चा होत होती परंतु पोलिसांनी मात्र अजूनही तपास चालू असल्यामुळे मृत्यूचे कारण अद्याप माहीत नाही, हेच उत्तर त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर दिले होते.

दोन महिने मोहिनीच्या मृत्यूला होऊन गेले होते आणि निशांतचे आई-वडील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते कारण गावामधील शेतीच्या कामांमध्येच त्यांनी स्वतःला झोकून दिले होते.

मोहिनीचे आई-वडील आधीच त्यांच्या गावी परतले होते पण जाता जाता त्यांनी निशांतला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला होता.

निशांतने तर त्यावर ठामपणे नकार दिला होता कारण त्याचे म्हणणे होते की, मोहिनीवरच त्याने खूप प्रेम केले होते. त्यामुळे तो दुसऱ्या लग्नाचा विचार करू शकत नव्हता.

काही दिवसांनी पोलीस स्टेशनमधून निशांतला फोन आला की कदाचित मोहिनीने आत्महत्या केली असावी असेच वाटते. कारण कोणतेच पुरावे त्यांना सापडलेले नव्हते आणि यावरून मोहिनीने आत्महत्या केली हे स्पष्ट होते तर त्यासाठी काही कागदपत्रांवरती स्वाक्षरी करण्यासाठी निशांतला पोलीस स्टेशनमध्ये यावे लागणार होते. त्याच्यासोबतच त्यांनी मोहिनीच्या आई-वडिलांना आणि निशांतच्या आई-वडिलांना सुद्धा बोलवण्याबद्दल सांगितले होते.

निशांत चेहरा पाडून पोलीस स्टेशनमध्ये आला होता तसेच त्याच्यासोबत मोहिनीचे आणि निशांतचे पालक गावावरून आले होते आणि समोर प्रकाशला पाहिल्यावर मात्र निशांत आश्चर्यचकित झाला होता.

पोलिसांनी मोहिनीच्या मृत्युचे कारण सांगण्यासाठी काही पत्रकार आणि न्यूज चॅनेलचे बातमीदार यांना मुद्दाम कॅमेरा घेऊन बोलवले होते.

क्रमशः

मोहिनीने आत्महत्या केली होती की काही वेगळेच होते?

© विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.


0

🎭 Series Post

View all