Login

पडदा भाग-३(अंतिम)

अपूर्ण प्रेमाची रहस्यमय कहाणी !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

विषय:- अपूर्ण प्रेमकहाणी.
शीर्षक:- पडदा भाग - ३(अंतिम)


मोहिनीच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरल्याने जो काही त्याचा आज निकाल लागणार होता त्यामुळे खूप जणांना त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

इन्स्पेक्टर नकुल यांनी मोहिनीच्या दोन महिन्यांपूर्वी झालेला संशयास्पद मृत्यूबद्दल पत्रकारांना बोलावण्यात आले आहे तसेच पूर्ण घटनेची सविस्तर माहिती आणि तपाससुद्धा ते सांगणार आहेत असे सांगण्यात आले.

इन्स्पेक्टर नकुल यांनी बोलायला सुरुवात केली.

" दोन महिन्यांपूर्वी मोहिनी निशांत भांडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास करताना सुरुवातीला कोणतेही धागेदोरे आम्हाला सापडत नव्हते. तरीही आम्ही तपास करण्याचा प्रयत्न केला ही घटना खरंतर आत्महत्याच दिसत आहे."

असे म्हंटल्यावर त्यांनी एकवार निशांतकडे पाहिले आणि हलकेच त्याच्या ओठांची कड ही स्मितहास्याकडे झुकलेली त्यांना दिसली पण लगेच निशांतने आपला चेहरा पूर्ववत केला होता.

"परंतु तसे काही झालेले नाहीये. मोहिनी यांची हत्या करण्यात आलेली आहे." पोलिसांनी केलेल्या गौप्य स्फोटामुळे सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागले कारण सर्वांना आतापर्यंत ही आत्महत्याच आहे असेच वाटत होते.

"इन्स्पेक्टर साहेब कोण आहे आमच्या मुलीचा गुन्हेगार ? कोणी तिला मारण्याचा प्रयत्न केला ? " मोहिनीचे आई-वडील रागात उभे राहून विचारायला लागले.

"थांबा, सर्व सांगतो माझे म्हणणे पूर्ण झाल्याशिवाय कृपया कोणीहीमध्ये बोलू नका."   इन्स्पेक्टर नकुल यांनी सर्वांना शांत बसण्यास सांगितले.

"मोहिनी यांनी त्यांचा मृत्यू होण्याच्या आदल्या रात्री एक भाजी बनवली होती आणि ती भाजी विषारी होती पण त्याबद्दल त्यांना माहिती नव्हते.कारण ती भाजी मेथीची भाजी समजूनच त्यांनी बनवलेली होती पण ती विषारी भाजी ही बरोबर मेथीच्या भाजी सारखीच दिसत होती."

"पण तुम्ही तर आता बोललात की तिची हत्या करण्यात आली आहे तर मग मेथीची भाजी तर तिनेच बनवलेली होती ना? " निशांत मध्येच बोलला.

"हे माझ्यापेक्षा तुम्हीच चांगल्याप्रकारे सांगू शकता ना मिस्टर निशांत? " इन्स्पेक्टर नकुल यांनी  निशांतकडे बघत प्रति प्रश्न केला.

" म्हणजे ? मी समजलो नाही. " निशांतला त्यांचे म्हणणे समजले नव्हते म्हणून त्यांना विचारले.

"सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. मोहिनीचा मृत्यू हा चुकीची भाजी खाल्ल्याने नाही झालेला आहे तर ती चुकीची भाजी तिथे मुद्दाम ठेवण्यात आलेली होती. ज्यावेळेस आम्ही या प्रकरणाचा तपास करत होतो त्यावेळेस आम्ही मोहिनी आणि निशांत ज्या बिल्डिंगमध्ये राहतात तिथल्या प्रत्येक व्यक्तीची संवाद साधून सखोल चौकशी केली, पण सर्वांनी मोहिनी आणि निशांतचे एकमेकांवरती प्रेम आहे, हेच आम्हाला सांगितले परंतु त्यातील एक माहिती थोडी खटकणारी होती आणि ती माहिती म्हणजे मोहिनीने दोन दिवसांपूर्वी मेथीची भाजी बाजारातून विकत आणलेली होती. ती तिने त्या दिवशी जेवण बनवण्यासाठी वापरली नव्हती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ती भाजीच कचऱ्याच्या डब्यामध्ये कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सापडली आणि ती भाजी दुसरी तिसरी कोणी न टाकता निशांतनेच टाकलेली होती. दुसरी विषारी भाजी जी मेथी सारखीच दिसते ती निशांतने फ्रीजमध्ये आधीची खरी मेथीची भाजी फेकून दिल्यावर त्या जागी ठेवली होती. तसेच रात्रीची जी विषारी भाजी होती. त्यातली राहिलेला पाचोळा सुद्धा निशांतने रात्री आल्यावर बाहेर फेकून दिला हे सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्ये दिसत होते. हे सर्व इतकी खबरदारी घेऊन निशांतने केले होते की त्याबद्दल कोणाला कळणारच नव्हते आणि ती विषारी भाजी मोहिनीने रात्री जेवणासाठी बनवली होती आणि त्याच दिवशी निशांत हा जेवणासाठी घरी नव्हता तर तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर जेवायला गेला होता म्हणून मिस्टर निशांत भांडे हेच मोहिनीच्या मृत्यूला जबाबदार आहेत."  हे ऐकल्यानंतर निशांतच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.


"नाही, तुम्ही चुकीचे काहीही सांगत आहात. मी असे का करेन ? कारण माझं तर मोहिनीवरती प्रेम होते." निशांत आपण निर्दोष आहोत यासाठी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता.

"हो, मोहिनी वरती इतके प्रेम होते की प्रकाश आणि मोहिनीच्या नात्यांवरही तुम्हाला संशय होता आणि तसेच त्यामुळे तुमचे पूर्वी भांडण झाले होते आणि मोहिनीच्या पोटातील वाढणारे बाळ हे प्रकाशचे आहे हे तुम्ही बोलले होतात बरोबर ?" हवालदार कुलकर्णी यांनी विचारले.

" ते आमचे किरकोळ भांडण झाले होते." निशांतने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

"मला इथे अजून एक गोष्ट नमूद करायची आहे की मिस्टर मिशन हे टॉक्सीकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्यामुळे या भाजीबाबत त्यांना चांगली माहिती होती कारण त्यावर तिथे सध्या संशोधन चालू आहे. तसेच त्यांना प्रकाश हा पहिल्यापासूनच आवडत नव्हता.म्हणून त्यांनी मोहिनीला प्रकाशपासून लांब राहायला सांगितले होते आणि जे भांडण त्यांचे बाल्कनीमध्ये झालेले होते त्याबद्दल त्यांच्या शेजारी राहणार्‍या जोशी काकूंनी चौकशी दरम्यान सांगितले होते."

पुढे इन्स्पेक्टर म्हणाले, " सर्व पुरावे हे निशांत भांडे यांच्या विरोधात आम्हाला सापडल्यामुळे मोहिनीचा खून हा त्यांच्या नवऱ्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे केला. त्यामुळे आता मी त्यांना अटक करत आहोत. "

" हो बरोबर. तिचा जगून काहीच फायदा नव्हता कारण मी तिच्यावर एवढे प्रेम करत असताना सुद्धा तिचे प्रकाश सोबत बाहेर फिरणे मला पसंत नव्हते. तिच्या पोटात वाढणारे बाळ माझे नाही. मघ मी त्या दोघांना कसे जिवंत ठेवणार? " निशांतच्या तोंडातून रागात सत्य बाहेर पडले.

" निशांत एकदा बोलला असतास तर मी आमची मैत्री आधीच तोडली असती.  तिचा आणि सोबतच तुझ्या बाळाचा जीव घेण्याचा तुला काहीच अधिकार नाही. आमचे फक्त निखळ मैत्रीचे संबंध होते पण तू त्यातून चुकीचा अर्थ काढलास."  प्रकाश आपले डोळे पुसत चिडून आपल्या मैत्रिणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या तिच्या नवऱ्याला म्हणाला.

" तू तर काही बोलूच नकोस. तुझ्यामुळे सर्व झाले आणि  तुझ्यामुळेच मला हे पाऊल उचलावे लागले." अजूनही निशांत स्वतःचेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करत होता.

" निशांत तू हे बरोबर केले नाहीस. मोहिनीला मी लग्न करून तुझ्या जबाबदारीवर पाठवलं होते. तू आमच्या मुलीचा आणि तिच्या बाळाचा जीव घेतलास. तुला कठोर शिक्षा व्हावी ह्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि न्यायालयात माझ्या मुलीचा आणि नातवंडाचा जीव घेतल्याबद्दल तुला शिक्षा होईपर्यंत हा मोहिनीचा बाबा लढेल. तुला शिक्षा मिळाल्यावरच माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल." असे म्हणून मोहिनीच्या वडिलांनी त्याला संतापात श्रीमुखात  लगावली आणि ते मोहिनीच्या आईसोबत तिथून निघून गेले.

निशांतच्या आई-वडिलांना तर आपल्या मुलाने काय केले याबद्दल समजल्यावर आपण मुलगा म्हणून या राक्षसाला जन्म दिला याचा त्यांना पश्चाताप होत होता.

मोहिनीने खरे प्रेम निशांतवर केले होते परंतु  निशांत मात्र तिच्या पात्रतेचा नव्हता. कारण आपल्या बायकोवर त्याचा विश्वास नव्हता आणि त्यामुळे मोहिनीला स्वतःचा जीव द्यावा लागला होता आणि त्यामुळे तिची प्रेमकहाणी जी लग्नानंतर अजून बहरेल असा ठाम विश्वास असलेल्या मोहिनीला, तिची प्रेमकहाणी मात्र अपूर्णच राहिली. कारण प्रेम हे फक्त मोहिनीने केले होते निशांतने त्याच्या वागण्याने तिच्यावर दाखवलेल्या अविश्वासाने शेवटपर्यंत तिचे खरे प्रेम हे एकतर्फी राहून ते पूर्ण कधी झाले नव्हते.


निशांतच्या संशय वृत्तीने त्याने स्वतःच्या बायको विरुद्ध कट करून मारण्याचा प्रयत्न केला. मांजर जरी डोळे बंद करून दूध प्यायचे काम करत असली तरी आजूबाजूचे  जग तिच्याकडे लक्ष देऊन पाहते हे ती मांजर विसरते. निशांतचा खोट्या चांगुलपणाचा पडदा त्याच्या वाईटपणामुळे खाली पडला होता.

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा.


0

🎭 Series Post

View all