Login

पदरी पडले अन् पवित्र झाले - ३ अंतिम भाग

पदरी पडले अन् पवित्र झाले
पदरी पडले अन् पवित्र झाले - ३ अंतिम भाग
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोंबर २०२५


"अहो मी काय म्हणते, तुम्ही दुपारी म्हणत होतात ना बाहेर फिरायला जाऊया. चला आता संध्याकाळ झालीय, छान बागेत फिरून येऊया आणि येता येता ताजी भाजी भेटली तर ती पण घेऊन येऊया. चला उठा बरं."
पुष्पा बाईंनी त्यांना उठवले.

"मघाशी अत्तराची बाटली फोडून ठेवली होती, त्याचा सुगंध आता अगदी नकोसा झालाय मला. जीव गुदमरतोय त्या उग्र वासाने."
पुष्पा ताईंना खरचं त्या खोलीत उभे सुद्धा राहवत नव्हते त्या वासाने. 

"हो चला चला, आणि आपल्याला ती उंदरांची चिकटपट्टी पण आणायची आहे ना!"
ते आठवण करून देत बोलू लागले.


"हो हो, तुमच्या गोळ्या पण संपल्या आहेत त्या पण बरोबर घ्या म्हणजे मेडिकल मधून येता येता घेऊन येऊ."
पुष्पा बाई आवरत बोलल्या.

"कुठे ठेवल्या आहेत?"
आतून प्रकाशराव बोलले.

"तिथेच आहे, प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्या आहेत बघा."
पुष्पा बाई बाहेरूनच ओरडल्या.

"सापडल्या का? ह्या माणसाला काही म्हणजे काही सापडत नाही, अगदी वस्तू समोर ठेवलेली असली तरी ती दिसत नाही. सगळं हातात आणून द्यावं लागतं."
असे म्हणून त्या पुन्हा नाक दाबत आतल्या खोलीत गेल्या.

"हे काय? इथे ड्रॉव्हरमधेच तर ठेवल्या होत्या."
त्यांनी रिकाम्या गोळ्यांची पाकिटे शोधून सोबत घेतली.

मोकळ्या बागेत फिरायला छान वाटत होते. बागेतली हिरवळ दिसली की मन सुद्धा प्रसन्न होते. त्यात लहान मुलं इकडे तिकडे फुलपाखरा सारखी बागडताना दिसली की आणखी भारी वाटते. म्हाताऱ्या झालेल्या मनाला नवीन ऊर्जा मिळते. नातावाची आठवण काढत दोघेही बराच वेळ तिथेच गप्पा मारत बसलेले. त्यांच्या गप्पा म्हणजे बडबड कमी आणि भांडण जास्त वाटायचे. दोघेही एकमेकांना अगदी पूरक होते.

"चला निघायचं का आता? सात वाजून गेले. अंधार पडला."
असे म्हणून दोघेही एकमेकांचा आधार घेत उठले आणि घराकडे निघाले.


"मेडिकलमध्ये जायचे आहे आपल्याला, लक्षात आहे ना!"
पुष्पा बाईंनी आठवण करून दिली.

"अरे हो, माझ्या गोळ्या घ्यायच्या आहेत."
खिशात हात घालत रिकाम्या गोळ्यांची पाकीट चाचपून पाहिली.

"हो, आणि ते उंदरांची पट्टी सुद्धा विचारा त्यांना आहे का?."
पुष्पा बाई बोलल्या तसे त्या मेडिकल वाल्याने दोन पट्ट्या दाखवल्या.

"ही बघा पट्टी, ह्या दोन आहेत. कोणती साईज पाहिजे तुम्हाला?"
तो दाखवत होता आणि त्या दोघांची तोंड बघत होता.

"बरं मला एक सांगा उंदीर मोठा आहे की छोटा?"
मेडिकल वाल्याने पुन्हा त्यांच्या तोंडाकडे बघून विचारले.

"अरे आम्हाला काय माहिती तो उंदीर मोठा आहे की छोटा? त्याला वय थोडीच विचारायला गेलो मी!"
प्रकाशराव त्या मेडिकल वाल्याच्या अंगावर खेकसतच बोलले.

"म्हणजे, वयाच कोण विचारतंय बाबा तुम्हाला? साईज तर माहिती असेल ना तुम्हाला त्याची?"
मेडिकल वाला पुन्हा बोलला.

"आता काय इंची टेप घेऊन त्यांच्या मागे जाऊ काय माप घ्यायला! काय काहीही प्रश्न विचारतोय हा."
प्रकाशराव आता खरचं त्याच्यावर चिडले होते.

"अहो बाबा सांगा नेमकी कोणती कुठली पट्टी देऊ तुम्हाला? एकतर तुम्हाला उंदीर माहिती नाही किती मोठा आहे तो; त्यामुळे कोणती पट्टी द्यायची हे कसं समजणार मला."
मेडिकल वाल्याने कसनुस तोंड केलं.

"बरं दे ही मोठी पट्टी."
असे म्हणून प्रकाशराव तिथून निघाले ते त्याला बडबड करतच.

"चला हो आता, काय त्याच्या नादी लागतात. तो आपला चांगला विचारत होता आणि तुम्हालाच भांडण करायचं होतं."
पुष्पा बाईंना पण समजले.

"नाहीतर काय! आता त्या उंदराला काय आपण पाहिले आहे का? तो किती मोठा आहे ते. काहीतरी अक्कल नसल्यासारखी प्रश्न विचारतात हे मेडिकलवाले पण."
प्रकाशराव अजूनही चिडून बोलत होते.

"बरं आता चिडू नका. उगाच बीपी वाढायच तुमचं."
असे म्हणून पुष्पा बाई घरी गेल्या.

घरी गेल्या बरोबर त्यांनी खिचडीचा कुकर लावला. अगदी साधीच खिचडी, त्यावर मस्त तुपाची धार आणि सोबत शेंगदाण्याची चटणी. दोघांना काय लागतं खायला.. म्हणून त्यांना पचेल तेच हलकं फुलकं जेवण बनवायच्या. कधीतरी दूध भात किंवा दूध भाकरी खाऊन सुद्धा होत असे त्यांचे जेवण.

जेवण झाले आणि आतल्या रूममध्ये झोप लागणार नाही; म्हणून बाहेरच सोफ्यावर दोघेही झोपले. अत्तराचा उग्र वास अजूनही त्यांच्या नाकाला झोंबत होता आणि त्यावरून पुष्पा बाईंची चिडचिड चालूच होती. बाहेर झोपल्यामुळे कसला तरी खुडखुड आवाज झाला आणि त्या दोघांना जाग आली.

"कसला आवाज झाला बरं?"
असे म्हणून प्रकाशराव उठून बसले.

वयोमानानुसार झोप तशी पक्की लागतं नव्हती त्यांना दोघांना. टाचणी पडली तरी जाग येई. आता चांगलाच खुडखुड आवाज झाला होता. दोघेही उंदीर असणार म्हणून उठून बसले.


"अहो, मी काय म्हणते ती चिकटपट्टी आणली आहेच तर ठेवून देऊया का बाहेर. असला उंदीर तर चिकटून बसेल ना त्याच्यावर. आणि मेडीकलवाला म्हणत होता तसे कळेल सुद्धा आपल्याला की उंदीर मोठा आहे की छोटा."
पुष्पा बाई हसत हसत त्यांच्याकडे बघून बोलल्या तसे ते पुन्हा त्या मेडिकल वाल्याला आठवून चिडले.

"आता ती चिकटवाली पट्टी मी बाहेर ठेवून येतो. सकाळी उठून बघू त्या उंदराला."
प्रकाशराव उठले आणि ती पट्टी घेऊन बाहेर नेऊन ठेवली.

रात्रभर त्या उंदराचा विचार करत दोघेही झोपी गेले. सकाळ झाली तेव्हा पुष्पा बाईंना कसल्यातरी आवाजाने जाग आली. त्या उठून बाहेर जाऊन बघू लागल्या. आणि बघतात तर काय! प्रकाशराव तिथे उभे होते.

"अहो हे काय! तुम्ही इथे काय करताय? ते ही इतक्या सकाळी."
उठल्या उठल्या त्यांनी प्रश्नाला सुरुवात केली.

"अग मला त्या उंदरामुळे झोप आली नाही. पट्टी ठेवली तेव्हापासून वाटतं होतं, की आता कुठे जाऊच शकत नाही तो; म्हणून बघायला बाहेर आलेलो."
प्रकाशराव मागे पाय करत बोलत होते.

"अहो मग चिकटला का त्या पट्टिला उंदीर?"
त्या पुढे होऊन बघू लागल्या.

"नाही ना! मी आलो त्याला बघायला आणि तो कुठे पळून गेला काय माहिती. ह्याच धावपळीत माझाच पाय नेमका त्या पट्टीवर जाऊन पडला."
असे म्हणून त्यांनी इतका वेळ मागे केलेला त्या पट्टीवरचा पाय त्यांना दाखवला.


"चांगलाच मोठा उंदीर फसलाय की!"
असे म्हणून पुष्पा बाई जोरजोरात हसू लागल्या.

"अगं हसतेस काय अशी! आता माझा पाय कसा काढू यातून ते बघ. तास होत आला असेल ह्या पट्टीला पाय चिकटून."
प्रकाशराव त्यांच्या चिकटलेल्या पायाकडे बघत बोलले.


"ही पट्टी इतकी चिकट आहे, की सहजासहजी पाय निघणार नाही."
पुष्पा बाईना माहिती होते.

"कर काहीतरी आणि काढ मला यातून बाहेर."
प्रकाशराव डोक्याला हात लावून उभे होते.

"काय बाई! काय एक एक पराक्रम करून ठेवतात तुम्ही रोजच. लहान मुलं तरी समजदार असतात. नशीब दोन्ही पाय नाही चिकटवून ठेवलेत यावर.. आणि तुम्ही त्या मेडिकल वाल्यावर उगाच चिडत होतात."
पुष्पा बाईंना हसणे आवरत नव्हते.

"आता तू ते नको बोलत बसू बरं. आधी माझी सुटका कर ह्यातून."
बिचारे प्रकाशराव त्यातून कसाबसा पाय सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.

"हो, रोज तुमची नवनव्या पराक्रमातून सुटका करायला आहेच मी. काय रे देवा! पदरी पडले अन् पवित्र झाले. अशी गत झाली माझी."
पुष्पा बाई स्वतः शीच हसत हसत बोलत होत्या आणि प्रकाशराव मात्र केविलवाणा चेहरा करून त्यांच्याकडे बघत होते.


समाप्त