पडक्या बंगल्यातील गूढ - भाग १

एका पडक्या बंगल्यातील रहस्य शोधण्याचा चार युवकांचा प्रयत्न

पडक्या बंगल्यातील गूढ- भाग १

लाल रंगाची महिंद्रा 'थार' गाडी एका सुनसान रस्त्यावरून वाऱ्याशी स्पर्धा करत सुसाट पळत होती. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडं होती. संध्याकाळचे पाच वाजले होते. हिवाळा असल्या कारणाने पाच वाजताच अंधारायला लागले होते. इतक्यात गाडीचा वेग कमी होत गाडी गचके खाऊ लागली. गाडी चालवणाऱ्या मयूर ने गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली. वैतागलेल्या निलेशने त्याला म्हटलं,

"अरे यार मयू आता काय झालं पुन्हा!"

"गाडी बंद पडली. काय झालं बघावं लागेल."

"अरे आत्ताच थोड्यावेळापूर्वी टायर पंक्चर झाला तो बदलला. अशा रीतीने आपण रिसॉर्टवर पोहोचणार कधी". निलेशला वैतागलेले पाहून सचिन म्हणाला,

"निल्या चिल्या यार! गाडी आहे ती. शेवटी एक यंत्रच आहे. मयू तरी काय करणार. चल लवकर आपण सगळे बघूया."

वीकेंडला जोडून दोन दिवस सुट्टी आल्यामुळे मयूर, सचिन, निलेश आणि सुमित हे चार मित्र मुंबई बाहेर
'दवबिंदू' रिसॉर्ट मध्ये एन्जॉय करायला चालले होते . सकाळी दहा वाजताच त्यांनी घर सोडलं होतं. रस्त्यात 'निसर्ग' धाब्यामध्ये यथेच्छ जेवून ते पुढे निघाले होते. आता खरं तर त्यांना चहाची तलफ आली होती. अजून थोड्या अंतरावर चहाची टपरी आहे असं एका गृहस्थाने त्यांना सांगितलं होतं. आता मध्येच गाडी बंद पडली होती. त्यांच्या वेळेच्या अंदाजाप्रमाणे काही अडचण आली नसती तर संध्याकाळी सातपर्यंत त्यांना रिसॉर्टवर पोहोचता आलं असतं.

चौघे खाली उतरले आणि गाडीचे इंजिन उघडून बघू लागले. मयूर आणि सुमित दोघे ड्रायव्हिंग करणारे होते त्यामुळे त्यांना थोडा अंदाज होता. परंतु काही केल्या गाडी सुरू होईना. मग त्यांनी ठरवलं की जवळपास कुठे मेकॅनिक असेल तर त्याला बोलावून गाडी रिपेअर करून घ्यावी. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवायला सुरुवात केली पण एकही माणूस दिसना. रस्त्यापासून थोड्या अंतरावर एक पडका बंगला दिसला. इतक्यात त्याच दिशेने एक माणूस येत असलेला दिसला. हे काही बोलायच्या आधीच तो माणूस थोडा जरबेनेच त्यांना म्हणाला,

"तुम्ही लोक इथे काय करताय? इथून लवकर निघून जा. थोड्याच वेळात काळोख पडेल. तो पडका बंगला दिसतोय ना तो भुतांचा आहे. रात्रीच्या वेळेस इथे कोणीच थांबत नाही." सुमित म्हणाला,

"अहो आमची गाडी बंद पडली आहे. तुम्ही आम्हाला थोडी मदत केली तर आम्ही लवकरच इथून निघून जाऊ शकतो."

"मला गाडीतलं काही कळत नाही. इथून पुढे थोड्या अंतरावर एक गॅरेज आहे. तुम्ही धक्का मारून गाडीला तिथे न्या आणि गाडी दुरुस्त करून घ्या पण आता इथे अजिबात थांबू नका." तो पुढे गेल्यावर निलेश म्हणाला,

"अरे यार! ह्या 'थार'ला धक्का मारून न्यायचं म्हणजे काय खायचं काम आहे का. कोणत्या मुहूर्तावर निघालो कोणास ठाऊक. ए तुम्ही सगळे आंघोळ करून निघालात ना!" सचिन म्हणाला,

"अरे गप रे. मूहूर्त बिहीर्त काही नसतं. हा माणूस आपल्याला इथून निघून जायची इतकी घाई का करायला सांगतो. मला हा जरा संशयास्पद वाटतो." सुमित म्हणाला,

"याला स्वतः सोडून सगळेच संशयास्पद वाटत असतात. अरे काय तुम्ही मर्द मराठे. महाराजांच्या मावळ्यांनी किती कठीण प्रसंगातून निभावून नेले. बोला 'जय भवानी', 'हर हर महादेव' आणि धक्का मारायला सुरुवात करा."

"थोडं पाणी द्या घसा एकदम कोरडा पडला आहे." निलेश म्हणाला.

चौघं जण कशीबशी थोड्या थोड्या अंतरावर थांबून गाडीला धक्का मारून पुढे आले. इथे थोडीफार वर्दळ दिसत होती. सचिनने एका माणसाला विचारले,

"काका इथे जवळपास कुठे गॅरेज आहे का हो."

"नाही रे पोरांनो इथून अर्धा तासावर एक गॅरेज आहे." हे ऐकून निलेश म्हणाला,

"बाप रे अर्धा तास. बाबांनो आता माझ्यात ताकद नाही. इथेच आजची रात्र काढूया. काय सोय होते का पाहूया." मयूर म्हणाला,

"अरे पण त्या माणसाने आपल्याला मुद्दामहून खोटं सांगितलं असेल का पाच मिनिटांवर गॅरेज आहे असं आपल्याला तिथून घालवण्यासाठी. काका इथे मागे थोड्या अंतरावर एक पडका बंगला आहे तिथे खरोखर भूत आहे का?"

"गावातले सगळेजण असेच म्हणतात म्हणून तिथे कोणी कधी फिरकतही नाही."

"तुमच्यापैकी कधी कोणी भूत पाहिले का तिथे."

"अरे कोणी तिथे जातच नाही भुताच्या भीतीने." हे ऐकून मयूर म्हणाला,

"मलाही असंच वाटतंय की नक्कीच त्या बंगल्यात काहीतरी गौडबंगालअसणार."

"ह्याच्यातला बाबुराव अर्नाळकर जागा झालेला दिसतोय." सुमित म्हणाला,

"हे बघा आपण सगळे सुशिक्षित आहोत. जर आपल्याला एखादी गोष्ट संशयास्पद जाणवते तर आपण त्याचा नक्कीच पाठपुरावा करायला हवा. मौजमजा, पिकनिक हे सगळं होतच राहील. आपण एक काम करूया. आजची रात्री इथेच एखाद्या लॉज मध्ये काढूया आणि उद्या सकाळी दिवसा उजेडी मेकॅनिकला बोलावून गाडी दुरुस्त करून घेऊ आणि मग पुढे जाऊ." सचिनला त्याची ही कल्पना पटली आणि तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला,

"अगदी खरे. हे बघा समोर एक लॉज दिसतंय. असेच सर्वसाधारण आहे. इथे आपल्याला नक्कीच हायफाय हॉटेल मिळणार नाही. तिथे आपण आपली सोय करून सामान ठेवू आणि त्या पडक्या बंगल्याकडे लपतछपत जाऊन नक्की काय आहे ते बघूया." निलेश म्हणाला ,

"अरे जर असंच काही तिथे असेल तर तिथे एकापेक्षा जास्त माणसं असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे शस्त्रही असतील. आपण कसे काय पुरे पडणार." सुमित त्याला धीर देत म्हणाला,

"'हिम्मते मर्दां मददे खुदा' ऐकलं आहेस ना. अरे आपण पण चार जण आहोत. कशाला घाबरतोस."

क्रमशः