पडक्या बंगल्यातील गूढ - भाग २

एका पडक्या बंगल्यातील रहस्य शोधण्याचा चार युवकांचा प्रयत्न

पडक्या बंगल्यातील गूढ- भाग 2


चौघांनी गाडीतून सामान काढले आणि ते लॉजवर आले. त्यांनी दोन रूम बुक केल्या. जेवणाची ऑर्डर दिली आणि ते फ्रेश झाले. जेवायच्या आधी त्या बंगल्यावर एक फेरी मारून येऊया असं त्यांनी ठरवलं. निलेशला खरं तर खूप कंटाळा आला होता. जेवून झोपावं असा त्याचा विचार होता परंतु हे तिघं काय त्याला सोडणार नव्हते म्हणून तो नाईलाजाने तयार झाला.

जेवायच्या आधी हळूहळू चालत ते बंगल्याजवळ आले. तिथे आल्यावर ते सजग झाले आणि आजूबाजूची चाहूल घेऊ लागले. इतक्यात त्या बंगल्यातून गुंडसदृश एक माणूस बाहेर आला आणि कडेला लावलेली बाईक चालू करून तो कुठेतरी गेला. सचिन म्हणाला,

"आता कदाचित त्या बंगल्यात एकच माणूस असावा आपण जावून बघायचं का." सुमित म्हणाला,

"अरे वेडा आहेस का आपल्याला काय माहित एकच माणूस आहे का अजून कोणी आहे ते आणि हा जो माणूस गेला आहे तो कदाचित लगेच परतू पण शकेल. आपण इथेच कानोसा घेऊन थोडा वेळ वाट बघूया." सगळ्यांना त्याचं म्हणणं पटलं. खरोखर पंधरा मिनिटात तो गेलेला माणूस परत आला. आता त्याच्या हातात भरलेल्या दोन पिशव्या होत्या. बहुतेक त्याने त्या सगळ्यांसाठी खाण्यासाठी काही सामान आणलं असावं. तो आत गेल्यावर मयूर म्हणाला,

"आता ते सगळे खाण्यामध्ये गुंग असतील. थोडे बेसावध असतील. आपण मागच्या बाजूला जाऊन काही आढळते का पाहूया." त्यांच्यातला सुमित हा कराटे चॅम्पियन होता. सर्वजण दबक्या पावलांनी मागच्या बाजूला गेले. तिथे बऱ्याच बियरच्या, दारूच्या बाटल्या, कागदी प्लेट्स, रिकामे बॉक्सेस फेकलेले दिसत होते. याचा अर्थ त्या बंगल्यात बरेच दिवस त्यांनी वास्तव्य केलेले असावे. बंगल्याचं मागचं दार जुन्या पद्धतीचं होतं. दरवाजाला कडी कोयंडा होता आणि वर थोडसं उघडं एक काचेचं तावदान होतं. सुमितने सर्वांचे लक्ष तिथे वेधलं. तावदानाकडे कडे बोट दाखवून तो सर्वांना म्हणाला,

"आपल्याला काहीतरी करून या तावदानातून
आतमध्ये डोकावून बघता येईल." सुमित तसा उंच होता पण तरीसुद्धा पायाखाली काहीतरी घ्यावं लागलं असतं. म्हणून त्यांनी आजूबाजूला काही दिसतंय का ते पाहिलं. परंतु तशी काही वस्तू त्यांना आढळली नाही. शेवटी सचिन आणि मयूर म्हणाले आम्ही दोघं वाकून खाली उभे राहतो तू वर चढून पटकन बघ. त्याप्रमाणे सचिन आणि मयूर वाकून उभे राहिले. सुमित अलगद त्यांच्या पाठीवर चढला. निलेश कोणी येत तर नाही ना याची काळजी घेत होता. सुमितने पाहिलं तर मागच्या खोलीत मीट्ट काळोख असल्याकारणाने काहीच दिसत नव्हते. पुढच्या खोलीत मिणमिणता प्रकाश होता. तिथे एक माणूस पाठमोरा बसलेला दिसत होता. नक्की काय आहे ते काहीच कळत नव्हते. सुमित खाली उतरला आणि म्हणाला,

"आतल्या खोलीत खूप अंधार असल्यामुळे काहीच दिसलं नाही आणि पुढच्या खोलीत एक माणूस पाठमोरा बसला होता. पण इतकं मात्र नक्की की या बंगल्यात काहीतरी गौडबंगाल आहे. आपण संध्याकाळी जो माणूस बघितला आणि आत्ता बघितला ते बहुतेक इथे जे पण काही आहे त्याच्या पाहऱ्यावर असावेत." सचिन म्हणाला,

"पण आता आपण काय करायचं कसा काय शोध घ्यायचा. नक्की काय आहे ते आपल्याला कळलंच पाहिजे." मयूर म्हणाला,

"मला वाटते आता आपण परत जाऊया. जेवण झाल्यावर एखादा टॉर्च घेऊन पुन्हा येऊया. टाॅर्चच्या प्रकाशात काहीतरी नक्कीच कळेल. तोपर्यंत जेवून ती माणसं सुद्धा झोपलेली असतील." सर्वांना मयूरचं म्हणण पटलं आणि ते परत निघाले. बंगल्याच्या पुढच्या खोलीतून मोठ्याने हसण्याचा आणि दारू पिऊन बोलल्यासारखा आवाज त्यांना ऐकू आलं. हे लोक दारूच्या नशेत असतील तर आपलं काम सोप्प होईल असं त्या सर्वांना वाटलं. त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारला.

सर्वजण लॉजवर परत आले. त्यांनी मॅनेजरला रूममध्ये त्यांचं जेवण पाठवायला सांगितलं. लॉज सर्वसाधारण असलं तरी तेथील जेवण उत्कृष्ट चवीचे होते. चौघांनी जेवणावर मस्त ताव मारला आणि पाच दहा मिनिटं तिथेच गप्पा मारत बसले. सर्वांचंच लक्ष बंगल्याकडे होतं त्यामुळे गप्पांमध्ये मन काही रमेना. चौघंही लॉजच्या बाहेर आले. ठरवल्याप्रमाणे त्यांनी दोन छोटे टॉर्च घेतले. सचिनच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ती त्याने सर्वांना बोलून दाखवली. तो म्हणाला,

"हे बघा त्या बंगल्यात किती माणसं असतील आपल्याला काहीच ठाऊक नाही. आणि ते जर पहाऱ्यावर असतील तर नक्कीच त्यांच्याकडे शस्त्र असावीत. म्हणून आपण आधी गेल्यावर बंगल्याच्या दोन्ही दारांना मोठी कुलूपं लावून टाकू. आतून त्यांनी कडी लावलेलीच असेल. कुलूप लावल्यामुळे ते काय बाहेर पडू शकणार नाहीत." त्यावर सुमित म्हणाला,

"अरे दार बंद असलं तरी ते लोक निर्ढावलेले असतात. ते वरती चढून उड्या मारून पण खाली येऊ शकतात." निलेश म्हणाला,

"अरे ती नंतरची गोष्ट आहे. पुढचं पुढे बघू. आधी आपण तिथे नक्की आहे तरी काय हे पाहूया." त्यांनी गोदरेजची दोन मोठी कुलूपं घेतली आणि बंगल्याकडे गेले. सुमितने आधी सारखंच वर चढून पाहिलं आणि टॉर्चच्या प्रकाशात त्याला तिथे जे काही दिसलं ते
कल्पनेपलीकडचं होतं. क्षणभर त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. तो लगेच खाली उतरला. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ते तिघे त्याला सारखे विचारत होते. त्याचा श्वासोच्छ्वास खूप जलद गतीने होत होता. सुमित ने असं काय पाहिलं असेल?


क्रमशः


🎭 Series Post

View all