पडक्या बंगल्यातील गूढ - भाग ३ - (अंतिम)

एका पडक्या बंगल्यातील रहस्य शोधण्याचा चार युवकांचा प्रयत्न

पडक्या बंगल्यातील गूढ - भाग ३ (अंतिम)


आतलं दृश्य पाहून गर्भगळीत झालेला सुमित म्हणाला,

"अरे मागच्या खोलीत खूप सारी शस्त्रं ठेवली आहेत. टॉर्चच्या प्रकाशात ती कोणत्या बनावटीची आहेत ते कळलं नाही. इतकी शस्त्रं पाहून माझ्या डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखे झालं म्हणून मी पुढच्या खोलीत काही बघू शकलो नाही. हे नक्कीच एखाद्या दहशतवादी संघटनेचं काम असणार. ह्यात सामील असलेले लोक साधेसुधे नसणार एव्हढं मात्र नक्की. आता आपण पुढल्या बाजूला जाऊन आत मध्ये किती माणसे आहेत ते पाहूया." पुन्हा दबक्या पावलांनी सगळे पुढच्या बाजूला आले. पुढच्या दरवाजाच्या वर पण एक अर्धवट उघडे तावदान होते. पुन्हा सुमित वर चढून आत काय दिसते ते बघू लागला. आत मध्ये सहा सात जण आडवे तीडवे झोपले होते. त्यांच्या आजूबाजूला दारूच्या रिकामी बाटल्या, अर्धवट खाल्लेलं जेवण पडलेलं दिसत होतं. तो खाली उतरला आणि त्याने इतर तिघांना हे सांगितलं.

सचिन म्हणाला,"काय रे आपण घुसुया का आतमध्ये? हे सगळे पिऊन झोपले आहेत म्हणजे बेसावध असतील. चला बिनधास्त, करूया साहस."

"वेडा आहेस का. ‌ प्रत्येकाकडे नक्कीच शस्त्र असेल. आपल्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्यापेक्षा आपण पोलिसांना फोन करू. आपण आत्ताच इथे काही गडबड केली तर यांचा जो कोणी सूत्रधार इथून जवळपासच असेल तर तो सावध होईल." सर्वांना त्याचे म्हणणे पटले. सुमितने लगेच पोलिसांना फोन केला. त्यांना लोकेशन दिलं आणि पोलीस येईपर्यंत ते वाट पाहत राहिले. निलेश घाबरून म्हणाला,

"आतापर्यंत असं हे सर्व आपण सिनेमांमध्येच पाहिलं होतं. आज प्रत्यक्ष थरारक अनुभव घेतोय." पोलीस येईपर्यंत त्यांनी बंगल्याच्या आजूबाजूला काही संशयास्पद आढळतं का ते पाहिलं. तसं काहीच दिसलं नाही. एक खिडकी उघडी दिसली. त्याचा एक गज वाकवलेला दिसला. म्हणजेच ते ह्या खिडकीचा उपयोग आत बाहेर करण्यासाठी करत असावेत.

थोड्याच वेळात पोलीस आले. इन्स्पेक्टर राणे पोलीस फौज घेऊन आले होते. त्यांनी लगेच बंगल्याला चारी बाजूंनी गराडा घातला. दरवाजा तोडून काही पोलिस आत शिरले. आत मधले सगळे बेसावधच होते. पोलिसांनी सगळ्यांना पकडून बाहेर आणलं. एक दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना चांगलाच प्रसाद दिला. सगळ्यांना बांधून ठेवल्यावर इन्स्पेक्टर राणेंनी त्यांना चांगलाच दम दिला. त्यांच्यातला एक धीर करून बोलला,

"साहेब आम्ही काहीच केलं नाही हो. आम्हाला सोडून द्या. आम्ही अधूनमधून इथे फक्त खायला प्यायला येतो. आम्हाला बाकी काहीच माहित नाही."

"ए, जास्त शहाणपणा करायचा नाही. तुम्हाला काहीच माहित नाही काय बघतो आता कसं सांगत नाहीत ते." पकडलेली माणसं गयावया करू लागले. इन्स्पेक्टर राणेंनी त्यांना पोलिसी खाक्यात विचारलं,

" शस्त्र इथे कधीपासून आहेत. तुम्हीच आणून ठेवली की आणि कोण सूत्रधार आहे." सर्वजण तत पप करायला लागले. एकाने सांगितलं की आम्हीच आणून ठेवली आहेत.

"इतकी शस्त्रं खरेदी करायला तुमच्याकडे पैसा कुठून आला. " त्यांना चांगलंच फैलावर घेतल्यावर त्या पाच जणांमधला एकजण पोपटासारखा बोलू लागला,

" साहेब सगळं सांगतो. आम्ही फक्त हुकूमाचे ताबेदार आहोत. ह्या गावचे पाटील आहेत त्यांनीच आम्हाला हे काम सोपवलं आहे. आम्ही फक्त पहाऱ्यावर आहोत. ही शस्त्रं कुठून कशी आणली ते आम्हाला काहीच माहित नाही." मुख्य माहिती मिळाल्यावर त्यांनी सर्वांना लॉकअप मध्ये टाकलं आणि लगेचच पोलीस पाटलांच्या घरी गेले. इतक्या रात्री पोलीस आलेले पाहून पाटलांना घाम फुटला. त्यांनी विचारलं,

"इन्स्पेक्टर इतक्या रात्री आमच्या घरी? काय झालं?"

"इथून जवळच एक पडका बंगला आहे तिथे तुम्ही शस्त्र आणून ठेवली आहेत असं आम्हाला कळलं आहे."

"अहो काहीतरीच काय बोलता माझा ह्याच्याशी काय संबंध! मी कायम या गावाचं भलंच करत आलो आहे. गावाच्या भल्यासाठी विविध योजना राबवण्याकडे माझं लक्ष असतं."

"हे सर्व दाखवायला. तुमचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत पाटील. आमच्याकडे पुरावा आहे. आणि तुम्हाला हे सांगायचे आहे की या सगळ्यांमध्ये आणि कोण कोण सामील आहेत. असा अवैध शस्त्रसाठा करणं हा फार भयानक स्वरूपाचा गुन्हा आहे." आधी नाही म्हणणाऱ्या पाटलांना पोलिसांनी इंगा दाखवल्यावर त्यांनी सर्व कबूल केले आणि कोण कोण रथी महारथी सामील आहे ते सगळं सांगितलं. ऐकून इन्स्पेक्टरसह या चौघांना पण धक्काच बसला. समाजातील बरेच 'व्हाईट काॅलर' लोक यात सामील होते.

दुसऱ्या दिवशी सर्वच नामांकित वर्तमानपत्रात या चौघांच्या फोटोसह ठळक बातमी आली. "चार जिगरबाज तरुणांमुळे खूप मोठा शस्त्रसाठा जप्त" या मथळ्याखाली सविस्तर बातमी छापून आली. सर्वत्र चौघांचंही खूप कौतुक झालं. सरकारकडून त्यांचा यथायोग्य सत्कार झाला. त्यावेळी डीएसपी राजे त्याना आणि सर्व उपस्थितांना म्हणाले,

"दहशतवादी कारवायांचे देशावर सावट आहे. अशावेळी तुमच्यासारख्या तरुणांनी, फक्त तरुणांनीच नाही तर प्रत्येक व्यक्तीने सतर्क रहावे. कुठेही काही संशयास्पद आढळले तर लगेच त्याची माहिती पोलीस यंत्रणेला द्यायलाच हवी. सर्वसामान्य नागरिक विचार करतात की पोलीस आहेत तर आपण कशाला मध्ये पडायचे. पण पोलीस सगळीकडेच पुरे पडत नाहीत त्यामुळे सामान्य नागरिकांनी हे आपलं देशासाठी असलेलं कर्तव्य समजून पुढे यायला हवे."

समाप्त