Login

पदरी पडले अन पवित्र झाले, भाग -5अंतिम भाग

“देव नेहमी आपल्याला हवं ते देत नाही,पण जेव्हा तो देतो… ते ‘पदरी पडलं’ असतं आणि ‘पवित्र झालं’ असतं.”
पदरी पडले अन पवित्र झाले, भाग -5 अंतिम भाग
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर 2005


गौरव आता मोठा होत होता. अभ्यासात नेहमीच पहिला.
त्याच्या डोळ्यांत एक स्वप्न झळकत होतं   “मला डॉक्टर व्हायचं आहे.”
सुमनला ते ऐकून दरवेळी छातीत एक हुरहूर आणि अभिमान दोन्ही वाटायचे.
तिला आठवायचं, ज्या दिवशी ते बाळ रस्त्याच्या कडेला रडतं होतं, आणि तिने ते उचलून घेतलं होतं... त्या दिवसापासूनच तिचं आयुष्य बदललं होतं.

अमोलनेही मेहनतीने स्वतःचं छोटं दुकान वाढवलं. आता दुसरं दुकान उघडलं होतं, कपड्यांचं.
सुमन तिथे जाऊन त्याला हातभार लावत असे. दोघांचं आयुष्य आता सुरळीत चालू झालं होतं.
पण त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ गौरवमध्येच होता.

गौरव कॉलेजात गेला, प्रवेश घेतला, डॉक्टर बनायचं स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ लागलं होतं.
सुमन दररोज देवासमोर बसून म्हणायची,
“देवा, हे मूल माझ्या पदरी पडलं, पण तूच सांग, याहून पवित्र असं नातं असू शकतं का?”

एक दिवस गौरव घरी आला.
त्याच्या हातात डॉक्टरचं सर्टिफिकेट होतं.
“आई, आता मी डॉक्टर झालो…” एवढं म्हणताच सुमनच्या डोळ्यात पाणी आलं.
ती काही बोलू शकली नाही, फक्त त्याला मिठी मारली.
अमोलही बाजूला उभा राहून दोघांकडे पाहत होता  त्याच्या डोळ्यांतही अश्रू होते.

त्या क्षणी अमोलच्या आई पुढे आल्या. त्यांनी गौरवच्या डोक्यावर हात ठेवला,
“गौरवा, तू आमचं घर उजळवलंस रे. आणि सुमन… तू देवाचं रूप आहेस. मी जेव्हा म्हणायचे की हे मूल परकं आहे, तेव्हा मला माहीत नव्हतं की एक दिवस हेच आपल्या घराचं प्रकाश होईल.”

गौरव हसत म्हणाला, “आई, मी तुमचंच लेकरू आहे.
ज्यांनी मला उचलून घेतलं, वाढवलं, प्रेम दिलं  तेच माझे खरे देव आहेत.”

सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये आनंद होता, समाधान होतं.
गौरवने पुढे गावातच एक छोटं हॉस्पिटल सुरू केलं,
जिथे तो गरीब लोकांना मोफत उपचार देऊ लागला.
त्याचं म्हणणं असायचं “आई-बाबांनी मला जसं आयुष्य दिलं, तसं मी इतरांना द्यायचं.”

त्या हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर एक छोटा बोर्ड लावलेला होता
“पदरी पडले… अन पवित्र झाले.”

सुमन रोज संध्याकाळी त्या बोर्डकडे पाहायची, आणि तिच्या ओठांवर हसू उमटायचं.
ती मनात म्हणायची

“कधी कधी देव आपल्याला आपलं हवं ते देत नाही…
कारण तो आपल्याला त्याहूनही पवित्र काहीतरी देतो.”