Login

पहिलं प्रेम भाग ४ अंतिम(भूतकाळात डोकावताना)

प्रेम की आकर्षण


"सौम्या..बेटा इकडे ये जरा.." सौम्याचे बाबा

"हा बाबा..बोला!" ओढणीला ओले हात पुसतच सौम्या बाबांच्या बाजूला बसते.

"आई गेल्यानंतर तुला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. पुढे तुझ आयुष्य आणखी सुखकर व्हाव एवढीच माझी इच्छा आहे बघ.. आता शरीर पण थकल आहे." सौम्या चे बाबा तिच्या हातावर हात ठेवत बोलतात.

"बाबा.. असे का हो बोलताय.. मला तुमच्याशिवाय आहे तरी कोण?" सौम्या बाबांच्या कुशीत शिरून रडू लागते.

"हा बघ... मनीष..मनीष सरनोबत. घरी आईवडील असतात. बाबा रिटायर झालेले. आई सुद्धा सरकारी शाळेतून निवृत्त झाल्यात. एकूणच खाऊन पिऊन सुखी कुटुंब. मुलगा गुणी आहे अगदी तुझ्यासारखा.. समाजात ओळख आहे. चार लोकांमधे मान आहे. या फोटो मागे त्याचा नंबर,शिक्षण वैगरे सगळ लिहिलं आहे बघ.. माझी काही जबरदस्ती नाही. तुझा निर्णय शेवटचा असेल." सौम्याचे बाबा फोटो तिच्या हातात देतात.

"बाबा..मी तयार आहे लग्नाला. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्यासाठी घेतलेला तुमचा निर्णय अजूनपर्यंत कधीच चुकला नाही आणि आताही तुमची निवड चुकणार नाही यात शंकाच नाही. तुम्ही म्हणाल तेंव्हा मी बोहल्यावर चढायला तयार आहे." सौम्या

बेटा.. मी खूप खुश आहे.

लगेच बोलणी करून दोनच महिन्यात सौम्या आणि मनीषच लग्न होत. पहिल्याच रात्री सौम्या मनिषला सगळ सांगते. मनीष पण तिला वचन देतो की तो त्यांच्या नात्यात कुठलीच गोष्ट जबरदस्ती करणार नाही. मनीष पूर्ण एक वर्ष सौम्याची वाट बघतो आणि म्हणतात ना सहवासातून प्रेम होतच... मनिषने सौम्याला प्रेमाने जिंकली होती शिवाय या गोष्टीत त्याला त्याच्या आईवडिलांनी पण साथ दिली होती. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी मनीष पुन्हा एकदा नव्याने सौम्या सोबत लग्नगाठ बांधतो सौम्या सुद्धा यावेळी खूपच खुश असते. वर्षभराने घरात इवल्याशा पावलांनी मिहिर येतो त्यात सौम्या मागच्या गोष्टी सगळ्या विसरून जाते. पण..
*****************
"मला माहित आहे तू खुश नाहीस. तुला अजूनही माझी आठवण येते असा मॅसेज सौम्याला एका अंनोन नंबर वरून येतो पण मॅसेज खाली नाव बघते आणि तिच्या काळजात धस्स होते." मनीषच्या वाढदिवसाच्या दोनच दिवस आधी त्याचा मॅसेज येतो.

"आपण भेटूया ना माझ्या घरी. तुझ्या नवऱ्याला आणि माझ्या बायकोला यातल काहीच कळणार नाही. आपण कळूच द्यायचं नाही. हे बघ.. मला कोणीच समजून घेत नाही. प्लीज तू तरी समजून घे. मला तू हवी आहे बास्स...माझी खात्री आहे तू येशील. "विक्रांत


"नाही.. मी कधीच नाही येणार. तू तुझ्या बायकोला फसवू शकतोस पण मी नाही. मी माझ्या नवऱ्याशी लॉयल आहे आणि कायम राहीन. आजही तू हाच विचार करतोस याच आश्चर्य वाटतयं मला. तुला माझ्याबद्दल प्रेम होत की आकर्षण हे मला अजूनही समजल नाही आणि कदाचित कधीच समजणार नाही...पण मी माझ्या नवऱ्याला कधीच फसवू शकत नाही. मी तुझ्याकडे कधीच येणार नाही, कधीच नाही...."सौम्या
एवढा मॅसेज करून सौम्या त्याला ब्लॉक करते पण मनातील एक कोपरा मात्र त्याच्यासाठी थोडा हळवा असतोच. कारण तिने त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होत.
***********
"मम्मा...मम्मा..उठ.. आपल्याला फिरायला जायचं आहे ना. पप्पांच्या हॅपी बद्दे आहे ना!"छोटा मिहिर आवाज देतो तशी सौम्या गडबडून उठते.. कारण बेडवर पडल्या पासून तिला फक्त तिचा भूतकाळ आठवत असतो.
संध्याकाळी फिरून झाल्यावर तिघेही पुन्हा रिसॉर्ट वर येतात. सौम्याने जाण्याआधी तिथल्या मॅनेजरशी बोलून वाढदिसानिमित्त थोडी खास तयारी त्यांना करून ठेवायला सांगितली असते. छोटासा टेन्ट बनवून त्याला डेकोरेट करायला सांगून आतमध्ये गुलाबांच्या फुलांची सजावट सांगितली असते. हे सरप्राइज खास मनीष साठी असत.

"विश यू मेनी हॅपी बर्थडे माय डियर नवरोबा...मला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मी न मागता तू मला दिल्यास त्यासाठी थक्यू सो मच..मला समजून घेतलस.. माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे माहीत असूनही माझ्यावर जीवापाड प्रेम करत राहिलास. माझ्यावर एवढं प्रेम,विश्वास आणि समजून घेण्यासाठी तुला जितक्या वेळा थँक्यू म्हणेन ते कमीच आहे. हा वाढदिवस आणि इथून पुढे येणारा तुझा प्रत्येक वाढदिवस खूप आनंदी आणि उत्साही जावो.. माझं आयुष्य पण तुला लागो आणि पुढच्या प्रत्येक जन्मी देव तुला माझ्या आयुष्यात घेऊन येवो हीच इच्छा.." सौम्या.. मनीषचा हात हातात घेऊन बोलते आणि मग त्याला घट्ट मिठी मारते.

"थँक्यू सो मच बायको... आणि तुझ आधी प्रेम होत... आता तू फक्त माझी आहेस आणि हो मलाही प्रत्येक जन्मी बायको म्हणून फक्त आणि फक्त तूच हवी आहेस आणि मिहिर आपला राजकुमार... हो की नाही! "मनीष मिहिरला उचलून घेतो आणि सौम्याच्या कपाळावर अलगद आपले ओठ टेकवतो.
समाप्त...
@श्रावणी लोखंडे..

🎭 Series Post

View all