पहिला मान - १

पहिला मान
"तुझी सासरची मंडळी येईपर्यंत थांबायचं तरी..की पहिला मान माहेरच्यांनाच??"

मुक्ताची सासू आल्या आल्या तिला बोलू लागली.

मुक्ताचा डोहाळजेवणाचा कार्यक्रम सुरू होता. मुक्ता कार्यक्रमाच्या काही दिवस आधी माहेरी आलेली. माहेर आणि सासर दोघीकडचे कुटुंब अगदी हौशी असल्याने हा कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडायचा असं ठरलं होतं.

नातेवाईक, शेजारची मंडळी, मित्रमंडळी सगळ्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. मुक्ता आपलं गरोदरपण मस्तपैकी एन्जॉय करत होती. मुळात तिला मळमळ, उलटी वगैरे कसलाही त्रास होत नव्हता. त्यामुळे समोर येईल ते आवडती वस्तू ती खात असायची.

तिच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमठिकाणी तिच्या माहेरची बरीच मंडळी आधीच पोहोचली होती. तिच्या बहिणी छानपैकी सजावट करत होत्या. सजवलेलं ताट, वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर तिच्या मावश्यांनी बनवून आणले होते. या कार्यक्रमाचा त्यांना फार उत्साह होता.

संध्याकाळी 6 पासून पाहुणे यायला सुरुवात झाली. सासरची मंडळी अजूनही आली नव्हती, त्यांना बरेच फोन झाले पण येतोय, येतोय म्हणत वेळच निघून जात होती.

मुक्ताने आपल्या नवऱ्याला फोन लावला,

"अहो कुठे आहात? सगळी पाहुनी मंडळी ताटकळत बसलीयेत..माझी ओटी भरल्याशिवाय पुढे काही करता येणार नाही.."

"हो गं... ही आई पण ना, ऐनवेळी मला म्हणते की मला पार्लरमध्ये मेकप करायला जायचं आहे.."

"केव्हा गेले तुम्ही पार्लर मध्ये?"

"6 वाजता.."

"6 वाजता इथे हजर राहायचं सोडून तुम्ही पार्लर मध्ये गेलात? आईचं जाऊद्या पण तुम्हालाही कळू नये?"

तिच्या नवऱ्याची चांगलीच पंचाईत झाली होती..एकीकडे आईलाही दुखावता येत नव्हतं आणि दुसरीकडे कार्यक्रमात लवकर जाणंही महत्वाचं होतं.

"मी येतो लवकर काळजी करू नको.."

तो कसलाही विचार न करता पार्लरमध्ये घुसला,

"आई अगं सगळी पाहुणेमंडळी जमलीये तिथे.. किती वेळ अजून?"

"जमलीये तर काय एवढं? तुला त्या पाहुण्यांचं पडलं आणि इथे आईला काय हवं नको ते महत्वाचं नाही??"

त्याने कपाळावर हात मारला आणि नाईलाजाने वाट बघत बसला...

🎭 Series Post

View all