पहिला मान- २

पहिला मान
तिकडे कार्यक्रमात बरीच पाहुणे मंडळी ताटकळत बसली होती, काहींना लहान मुलं होती, काहींना बराच प्रवास करून घरी जायचं होतं..परिस्थिती लक्षात घेता एका वृद्ध बाईने सांगितलं..

"पाच सवाष्ण बोलवून ओटी भरून द्या आणि तिकडे जेवणाचा कार्यक्रम सुरू करून घ्या.."

मग तिथे हजर असलेल्या मुक्ताच्या मावश्या, बहिणी, माम्या पुढे आल्या आणि त्यांनी तिची ओटी भरली.

पाचवी सवाष्ण सुरू असताना मुक्ताच्या सासूबाई तिथे आल्या,

"हे काय? पहिला मान माहेरच्यांना?? तुझ्या पोटात आमचा वंश वाढतोय म्हटलं.."

हे ऐकून तिथल्या लोकांना संताप आला, मुक्ताची आत्या पुढे आली,

"अहो कितीवेळ पासून तुमची वाट बघत होतो, पहिला मान तुमचाच होता..पण आता इतका उशीर झाल्यावर काय करणार तुम्हीच सांगा.."

"उशीर म्हणजे काय मध्यरात्र झालीये का? थांबला असता आम्ही येईपर्यंत तर कुठे बिघडलं असतं??"

मुक्ताच्या नवऱ्याने आईला कसेबसे आवरले आणि कार्यक्रम पार पाडला. या सगळ्या प्रकरणामध्ये मुक्ता शांत होती. एकही अक्षर ती बोलली नाही. खरं तर तिला राग यायला हवा ना?

पण आपल्या मुक्तेची शांतता फार भयाण..कारण ती काही बोलत नाहीये याचा अर्थ तिच्या डोक्यात भयंकर विचार सुरू आहे असं समजायचं, मुक्ताचा एक स्वभाव होता...कुणी तिला काही बोललं किंवा कुणी तिच्यावर अन्याय केला तर ती उलट उत्तर देऊन वाजत होत नसे...ती वाट पाहे आणि वेळ आल्यावर त्याला असा काही धडा शिकवे की तो त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील.

तिच्या नवऱ्याला याचा चांगलाच अनुभव असल्याने तो तिला म्हणाला,

"मुक्ता, आई चुकीचं वागली... तू तिला त्याची जाणीव करून दे..मी काही बोलणार नाही.."

मुक्ता फक्त हसली आणि तिकडे तिच्या नवऱ्याला घाम फुटला....जेवण करतांना ती सासूबाईंजवळ आली आणि म्हणाली,

"सासूबाई, तुम्ही अगदी खरं बोललात...पहिला मान हा सासरच्यांना हवा..ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवेन.."

सासूबाई आपण जिंकलो या अभिमानात वावरत होत्या...

*****

🎭 Series Post

View all