पहिला मान-४ अंतिम

पहिला मान
सासूबाईंनी भांडण करून अबोला धरलेली त्यांची जाऊ, दिराला घालूनपाडून बोलून वाईट झालेला त्यांचा दिर, ज्यांना पाहून सतत वाकडं तोंड करायच्या अश्या सासूबाईंच्या नणंद...अशी भलीमोठी गाडी गावाहून भरून आलेली, बाळाला पाहायला..

त्यांना पाहून सासूबाईंना आता कुठे जीव देऊ आणि कुठे नको असं झालं..हीच ती मंडळी, सासूबाईंच्या सासरची...ज्यांच्याशी सासूबाईंचं कधीच पटलं नव्हतं...त्यांना मान देणं तर दूरच...

सासूबाई आधीच ढगळ्या गाऊनवर, त्यात गावाकडचे लोकं पाहुज त्या पटकन आत पळाल्या आणि साडी नेसायला लागल्या,

पलीकडून आवाज आला,

"काय बाई आजकाल शहरात सुद्धा आपली पद्धत विसरत चालले.."

सासूबाईंच्या नणंदेचा आवाज होता, सासूबाई चरफडू लागल्या,

"यांना कुणी बोलावलं इथे? गेली कित्येक वर्षे मी या कोणाशीच बोलत नाही हे माहीत नाही का घरात??"

मुक्ताने सासूबाईंना हाक मारली,

"आई, माझ्या सासरची मंडळी आलीयेत...खरं तर माझी मावशी आणि मामी येणार होत्या.."

"अगं मग बोलवायचं की त्यांना.."(त्या आल्या की त्यांना आयतं द्यावं लागत नसे, त्या स्वतः किचनमध्ये जाऊन सर्व आवरून घेत.."

"अहो असं कसं त्यांना बोलवायचं?? पहिला मान....सासरचा.."

सासूबाईंच्या कानावर दहाव्यांदा हे वाक्य पडलं आणि त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली..पण आदळआपट करायला समोर त्यांचा भोळवट नवरा आणि मुलगा नव्हता ना,समोर सासरची मंडळी..त्यामुळे गपगुमान राहणं त्यांना भाग होतं..

"आई, सर्वांसाठी आपण मस्तपैकी बटाटा भाजी, वरण भात, पोळी, शिरा, उसळ, वडे आणि कढी करूयात..."

तेवढ्यात त्यांची जाऊ ओरडली,

"तू अजिबात उठायचं नाहीस, ओली बाळंतीण तू...अजिबात कामं करायची नाही...हो की नाही जाउबाई??"

जाउबाई सासूबाईंकडे बघून म्हणाल्या आणि त्यांना जुने दिवस आठवले..- सासूबाई जेव्हा बाळंतीण झाल्या तेव्हा एकत्र कुटुंबात ते सर्व होते, सासूबाई बाळाला बघायला त्यांच्या माहेरची मंडळी सारखी बोलवत, त्यांच्या जावेला राबराब राबवत आणि स्वतः कशाला हात लावत नसत

आज तो हिशेब त्यांच्या जावेनेही पूर्ण केला होता...

सासूबाई मन मारत स्वयंपाकाला लागल्या, पाहुणे मंडळी जेवली आणि हसतमुखाने घरी गेली..ते गेल्यावर सासूबाईंनी घरात सर्वांना धारेवर धरलं..

"कुणी बोलावलं होतं यांना? कुणी शहाणपणा करायला सांगितला??"

"अहो सासूबाई तुम्हीच तर सांगितलं होतं.."

"मी काय सांगितलं??"

"की....पहिला मान सासरचा..."

सासूबाई आता रडकुंडीला येत तिथून निघून गेल्या...

मुक्ताचा नवरा तिच्याजवळ आला आणि म्हणाला,

"मुक्ते, यापुढे कुणाचं काही चुकलं तर तोंडावर बोलत जा...ते खूप परवडतं..."

मुक्ताला हसू आवरेना...

याला म्हणतात, "लाठी भी न टूटे और साप भी मर जाये.."

समाप्त




🎭 Series Post

View all