Login

पाहिले न मी तुला! भाग -25

चिमुकल्या छवीची हृदयस्पर्शी कथा!


पाहिले न मी तुला..!
भाग -पंचेवीस.


"मग आजीच्या गुलाबाला आजीची आठवण येतेय का?"  तिला गुदगुल्या करत आसावरी.
ह्यावेळी छवी जराशी हसली.

"थोडा आराम कर. नंतर आपण आजीला व्हिडीओ कॉल करूया हं." तिला आसावरी प्रेमाने कुरवाळत होती.
छवीने आपले डोळे मिटून घेतले.


"मम्माऽ, तो मला पुन्हा भेटेल का गं?"
काही वेळाने डोळे उघडून छवी आसावरीला विचारत होती.

"कोण?"  आसावरी.

"तोच गं. गार्डनमध्ये मला भेटलेला, माझा न्यू फ्रेंड."   छवी.
तो मला भेटायला तिथे येत असेल का गं?"

"हम्म, कदाचित येत असेल. तो फ्रेंड आहे ना तुझा. मग केव्हातरी नक्की भेटेल."  तिच्या गालावर हात फिरवत आसावरी.

"मी अशी आजारी आहे हे त्याला कळले असेल का गं?"  छवी.


"काहीही गं. त्याला कसे कळणार?"


"आशू, मला त्याची खूप आठवण येत आहे गं. तुला माहितीये? तो माझ्यासारखाच आहे सेम टू सेम. डोळे सुद्धा माझ्या डोळ्यासारखे घारे -घारे! तू बघशील ना त्याला तर तुला पण तो आवडेल."
त्याच्याबद्दल बोलताना तिच्या टपोऱ्या डोळ्यात आनंद जमा होत होता.


"तुला आवडतो ना? मग मलाही नक्कीच आवडेल. तुला आवडणारी प्रत्येक गोष्ट माझी पण आवडती असेल. आता डोळे मिट बघू. जास्त बोलू नकोस."
प्रेमाने दरडावत आसावरी तिला म्हणाली.



"लव्ह यू मम्मा! तू किती गोड आहेस." तिच्याकडे बघून छवी मंद हसली आणि डोळे मिटले.

तिचा हसरा चेहरा बघून आसावरीचे ओठ देखील आपोआप रुंदावले. आसावरी तिच्याशेजारीच खुर्चीला डोके टेकवून बसली.

'कोण आहे हा हिचा मित्र? एवढी का त्याची हिला आठवण येत आहे?' 

'कोणी का असेना. त्याच्याविषयी बोलल्याने माझ्या पिल्लूला बरं वाटत असेल तर ठीक आहे ना. तसेही डॉक्टर म्हणाले होते की ही जास्तीत जास्त आनंदी राहायला हवी. तिच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते.'

डोळे मिटून ती त्याच्या विचारात गुरफुटून गेली.

शेखरच्या विचारात झोपी गेलेल्या छवीच्या स्वप्नात तो हळूच डोकावला. दोघे त्याच पार्कमध्ये बोलत होते.

"फ्रेंड आलास तू? तुला माहितीये मी कित्ती कित्ती मिस केलं तुला." ती त्याला बिलगून म्हणाली.


"हो गं प्रिन्सेस, आता आलोय ना मी." तो.


"पण मी कट्टी आहे तुझ्याशी. तू मला रोज भेटशील म्हणून प्रॉमिस केलं होतेस ना?" लटक्या रागाने ती.


"सॉरी ना गं. मी कान पकडून उठकबैठक करू का?" तो कान पकडून उठाबशा करायला लागला.



"ही ही ही! सो फनी. केलं मी तुला माफ. पण यापुढे असे नाही वागायचे हं." ती हसत हसत म्हणाली.

"द्याट्स लाईक अ गुड गर्ल! चल झोक्यावर बसूया?" त्याने तिचा हात हातात घेत विचारले.


"हो. तू मला झोका देशील?"  ती.


"हो." म्हणत त्याने तिला पकडून झोपाळ्यावर बसावले आणि तिला झोका देऊ लागला.

"इतक्या हळू नको, जोरात  देना. आणखी जोरात..
आणखी जोरात…"  ती.

"एवढे ठीक आहे? आता आणखी जोरात नाही हं." तिला झोका देत तो म्हणाला.

हा झोका खरेच खूप जोरात होता. तिचा झोपाळा उंचचउंच जाऊ लागला. खूप उंच. इतका की तिला खालचे काही दिसेना. ती खूप घाबरली.

"फ्रेंऽऽड" घाबरून तिने जोरात किंकाळी मारली.


"छवीऽऽ काय झाले?" डोळे उघडून आसावरीने घाबरून विचारले.

छवीचा श्वास वाढला होता. मॉनिटर बीप बीप करायला लागले.

"फ्रेंड, फ्रेंड.." तिच्या तोंडून अस्पष्ट आवाज येत होता.


"सिस्टर, बघा ना काय होतेय हिला?" आत आलेल्या नर्सला रडकुंडीला येत आसावरी विचारत होती.


"हो हो बघते मी. हार्ट रेट वाढले आहेत. सरांना कळवते." असं म्हणून तिने डॉ. निशांतच्या केबिनमध्ये कॉल लावला.
निशांत येईपर्यंत नर्सने सलाईनचा फ्लो हळू केला. तिचे हात चोळले.

"व्हॉट हॅपन्ड सिस्टर?" आत येत डॉ. निशांतने मॉनिटरवर नजर टाकली.
छवीच्या फिकट झालेल्या झालेल्या चेहऱ्यावर एक चापटी मारली.


"काय झालेय प्रिन्सेस? ऐकते आहेस ना मला?" डॉ. निशांत.


"फ्रेंड, कुठे होतास तू? किती घाबरले मी. एवढा उंच झोका कोणी देतो का?" डॉक्टर निशांतचा हात पकडत ती म्हणाली.

त्याचा हात पकडल्याने वायर वेगळे होऊन मॉनिटर परत बीप बीप करायला लागले. त्या आवाजाने तिने डोळे उघडले.

"मम्मा काय झाले? तू का रडते आहेस? डॉक्टर अंकल काय झाले?" सगळ्यांना असे आजूबाजूला बघून ती कावरीबावरी झाली. आसावरीने डोळे पुसले.

"आशू रडू नको ना. सॉरी. मी खूप त्रास देतेय ना तुला?" आसावरीकडे बघून ती म्हणाली.

आसावरीने फक्त नाही म्हणून मान हलवली. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते.

ती आता नॉर्मल झाली होती. त्यामुळे मॉनिटरवरचे सर्व रिडींग सामान्य दिसू लागले होते.


"शाळेतील कोणी स्पेशल फ्रेंड आहे का? बहुतेक जास्तच क्लोज फ्रेंड? त्याच्याविषयी वाईट स्वप्न पडले असावे म्हणून ती तशी रिऍक्ट झाली.जमेल तर व्हिडीओ कॉलिंग द्वारे तिला बघू, बोलू द्या. बाहेर निघताना निशांत आसावरीला सांगत होता.

आसावरी केवळ 'हूं हूं' करत होती. आजवर छवीला तिने असे कधीच पाहिले नव्हते. तेवढ्यात मोबाईलची रिंग झाली. रजनीताईंचा फोन होता.


"आसावरी काही खायला घेऊन येऊ का गं? छवी एव्हाना उठली असेल ना?"

त्यांचा आवाज ऐकून तिला एकदम गलबलून आले. तिला वाटलं म्हणावं, 'हो काकू, या तुम्ही. मला गरज आहे तुमची. तुमच्या कुशीत शिरून मला रडायचे आहे.' पण तिने स्वतःवर आवर घातला.

"काकू, अहो इथे कॅन्टीनमध्ये सगळं मिळतंय हो. उगाच येण्याजाण्यात तुम्हाला त्रास नको."


"मला गं कसला त्रास? सगळा त्रास तर तू सहन करते आहेस." त्यांनी डोळ्याला पदर लावला.


"काकू काय हे? दिवेलागणीची वेळ झालीय ना? ह्या वेळेस कोणी रडतं का? थांबा, मी तुम्हाला तुमचा गुलाब दाखवते. दोघी मिळून 'शुभं करोती' म्हणा."

ओठावर उसणे हसू आणून तिने व्हिडीओ कॉल केला आणि छवीशेजारी ती जाऊन बसली.

"पिल्लू, शुभं करोतीची वेळ झालीय. आजी दिवा लावून तुझी वाट बघतेय बघ."

"आजी, मी बरी आहे. तू काळजी करू नको. चल हात जोड बघू. शुभं करोती करायचे आहे ना?." बेडवर पडल्या पडल्या तिने म्हणायला सुरुवात केली.


'एवढ्याशा वयात कुठून आलं हे शहाणपण?' फोन ठेवल्यानंतर रजनीताई विचार करत होत्या.

"बाळकृष्णा, माझ्या गुलाबाला काही झाले ना तर मी तुझं तोंडही पाहणार नाही. खूप छळलेस मला. कितीदा माझी परीक्षा घेतलीस. आसावरीशीही सावत्रपणाने वागलास. सगळी सुखं तिच्या पदरातून काढून घेतलीस. तरीही तिची काहीच तक्रार नाहीये. आता त्या एवढ्याशा जीवाची कसली परीक्षा घेतो आहेस रे? अशाने माझ्यासारख्या सामान्य माणसाचा तुझ्यावरचा विश्वास उडून नाही का जाणार?" त्यांच्या डोळ्यातून धारा बरसू लागल्या.

'काकू, असं ह्या वेळेला कोणी रडतं का? पुसा बघू ते डोळे.'  जणू आसावरीच बोलतेय असा त्यांना भास झाला.

त्यांनी एकवार आपल्या बाळकृष्णकडे नजर टाकली. त्यांच्याकडे बघून तो हसतोय असे त्यांना वाटत होते.


"माफ कर रे. रागाच्या भरात खूप काही बोलून गेले." दिव्याच्या प्रकाशात उजळलेल्या प्रतिमेकडे बघून त्यांनी हात जोडले. मनात नामस्मरण चालू होते.

थोडयावेळाने त्या अंगणातील बागेत आल्या. सकाळी फुललेला गुलाबी गुलाब त्यांना खुणावत होता. त्याच्याशेजारी जाऊन त्या उभ्या राहिल्या. हात आपसूकच गुलाबाला स्पर्शण्यासाठी पुढे आला.

"आई गं ऽऽ!" गुलाबाचे काटे बोटात रुतले होते.

त्यांच्या डोळ्यासमोर हाताला सलाईन लावलेला छवीचा चेहरा आला.

'छोट्याशा काट्याने मला इतकी वेदना झाली, मग माझा गुलाब हे सगळं कसे सहन करत असेल?'
झोपाळ्यावर बसून त्या तिचा विचार करू लागल्या.

******

"चला आ करा. व्हेरी गुड!"
छवीला आसावरी लिक्विड डाईट भरवत होती.

"मम्मा, तुला माझ्यासाठी किती करावं लागतंय गं? मी गुड गर्ल नाहीये ना गं?"

आपला चेहरा पिटुकला करत छवी विचारत होती.

"अरे, तू तर माझी गोड प्रिन्सेस आहेस. तुझ्यासाठी सर्वकाही. आणि भरवून  देण्याबद्दल म्हणत असशील तर बरी झालीस ना की एक संपूर्ण दिवस तू माझी केअर घे. माझे केस विंचरून दे. मला चारून दे. मला झोपवून दे. मग सगळं एकदम फिट्टमफाट होऊन जाईल."
तिच्या उष्ट्या मुखाचा मुका घेत आसावरी म्हणाली.

"आणि ह्यापुढे असे नाही बोलायचे. तुझ्यामुळे मला कधीच कसलाही त्रास होत नाही. कारण तू कोण आहेस हे माहितीये ना?" आसावरी.

"हो."   ती.

"कोण?"  आसावरी.

"छवी म्हणजे आशुच्या हृदयाची स्पंदनं आहे." ती हसून म्हणाली.

"गुणाची गं बाय माझी! किती हुशार आहेस. नेहमी अशीच हसत रहा. तुझ्या अशा गोड हसण्याने माझे सर्व टेंशन भुर्रकन उडून जातात."
तिने अलवारपणे छवीला मिठी मारली.


क्रमश :
*******

पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******

       *साहित्यचोरी गुन्हा आहे.*
                 ******

🎭 Series Post

View all