पाहिले न मी तुला..!
भाग -एकावन्न.
"खरी परिस्थिती तुम्हाला सांगावीच लागेल. तुम्हाला आम्ही अंधारात ठेऊ शकत नाही. तिच्या पोटामध्ये इंटर्नल ब्लीडींग झाले आहे. कशामुळे झालेय ते नेमके कळले नाही. त्यामुळेच हे ऑपरेशन लवकर करणे गरजेचे आहे."
"मला अनू हवीय. बाळ नसले तरी चालेल." तो निग्रहाने म्हणाला.
रक्तपेढीतून रक्ताची सोय करण्यात आली. रजनीताईंना काय होतेय काहीच कळत नव्हते. डोळ्यातल्या धारांना तिथेच अडवून त्या मंगेशरावांना धीर देत होत्या. मंगेशरावांनीच वेळेचे गांभीर्य ओळखून विनायकराव आणि नयनाताईंना दवाखान्यात बोलावून घेतले. शेखरची अवस्था एखाद्या लहान मुलासारखी झाली होती. डॉक्टरांच्या बोलण्याने तो पार खचून गेला होता. दहा पंधरा मिनिटात तिला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले. स्ट्रेचरवरून जाताना तिने शेखरचा हात घट्ट पकडला होता.
"शेखर, मला प्रॉमिस कर. मला काही बरंवाईट झालं तर तू आशुशी लग्न करशील." आत्ताआत्तापर्यंत तेजाने उजळलेला तिचा चेहरा फिकट पडला होता.
"अनू, तुला काहीही होणार नाही. सगळं ठीक होणार आहे." आसवांना थोपवून तो म्हणाला. तिचे शब्द हळू हळू विरत होते. तो वेड्यासारखा तिचा हात हातातच पकडून होता.
"अहो दादा, हात सोडा. पेशंटची शुद्ध हरपत चाललीय. तातडीने ओटीमध्ये जाऊ द्या." सोबतच्या नर्सने त्याचा हात सोडवत म्हटले नि पुढच्याच क्षणाला ओटीचा दरवाजा बंद झाला.
"शेखर, स्वतःला सावर रे बाबा. असे हातपाय गाळून कसे चालेल. देवावर विश्वास ठेव." नयनाताई त्याला धीर देत होत्या.
टिंग टिंग टिडींग..
अनुच्या मोबाईलची रिंग वाजत होती. ऑपरेशन थिएटर कडे नजरा लाऊन उभ्या असलेल्या रजनीताई दचकल्या. तो आवाज त्यांच्याच बॅगेतून येत होता. त्यांनी घाईघाईने मोबाईल बाहेर काढला. आसावरीचा फोन होता. इतका वेळ थोपवून धरलेले अश्रू डोळ्यांच्या काठावर उभे राहिले.. त्यांनी थरथरत्या हाताने मोबाईल कानाला लावला.
त्या 'हॅलो' म्हणायच्या आधीच पलीकडून आसावरी बोलायला लागली.
"अनू, अनू, अनू.. अगं कॉल रिसिव्ह करायला किती वेळ? बरं ते जाऊ दे, ऐक ना शेवटी प्रमोशन मलाच डिक्लिअर झालेय. मी म्हटलं होतं ना, तुझं बाळ माझ्यासाठी लकी आहे. त्याच्याचमुळे सगळं घडतंय. आय एम सो हॅपी यार. हं, आणखी एक, काकूंना भरली वांगी करायला सांग ना. मी घराकडेच येतेय. बाकी नंतर बोलू."
ती कॉल कट करणारच की रजनीताईंचा हुंदका तिच्या कानावर पडला.
"काकू? काय झाले? अनू ठीक आहे ना? तुम्ही का रडताय?" तिचा प्रश्नांचा भडीमार सुरू झाला.
"आसावरी आपली अनू ॲडमिट आहे गं. लवकर ये." त्यांनी फोन ठेवला.
तिच्या समोर अचानक अंधार दाटल्यासारखा झाला. काकू काय म्हणाल्या त्याचा अंदाज लागत नव्हता. कालच तर ती अनुशी बोलली होती. रात्री अनूने तिचे फोटोही पाठवले होते आणि आता काकू अशा बोलत होत्या. तिला गरगरल्या सारखे झाले.
"अगं अगं पडशील." शेजारणीने तिला हाताला पकडून बसवले. एकीने प्यायला पाणी दिले. आत्ताच तर ही आनंदाने नाचत होती अचानक काय झाले म्हणून सगळे तिच्याकडे बघत होते.
"आसावरी, आर यू ऑलराईट?" कुणाचे तरी शब्द कानावर पडले आणि ती तडकन उठून उभी झाली.
"अं? हो. आय एम ऑलराईट! मला निघायला हवे." म्हणून टेबलावरची पर्स आणि हेल्मेट घेऊन ती निघाली. कधी हॉस्पिटलला पोहचते असे तिला झाले होते. हृदयाची धडधड वाढली होती. विचाराच्या गतीबरोबरच तिने आपल्या स्कुटीचाही वेग वाढवला.
"आय एम सॉरी! खूप प्रयत्न करूनही आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. त्यांच्या उदरात झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे सगळं कॉम्प्लिकेटेड झाले होते. पेशंट नाही पण तुमचं बाळ मात्र सेफ आहे." डॉक्टर शेखरला सांगत होते.
"तुम्हाला मुलगी झालीय. वजन फार कमी आहे तेव्हा तिला हॉस्पिटलाईझ करावं लागेल."
"मला माझी अनू हवीय. जिच्यामुळे हे झालंय त्या मुलीशी माझा काहीच संबंध नाहीये. तुम्हाला जे वाटेल ते करा." तो रडत रडतच डॉक्टरांवर ओरडला.
"डॉक्टरऽऽ, काय झाले?" तिथे पोहचताक्षणीच आसावरीच्या कानावर शेखरचा आवाज आला तसे धावत जाऊन तिने डॉक्टरांना विचारले.
"त्यांच्या गर्भाशायाच्या मागच्या बाजूला एक ट्यूमर होते. प्रेग्नन्सीत वाढणाऱ्या गर्भाशयाच्या आकाराबरोबर ते ट्यूमरदेखील मोठे होत होते. मागच्या बाजूने असल्यामुळे आणि बाळाच्या वाढीमुळे सोनोग्राफीत आपल्याला ती गाठ निदर्शनास आली नाही. म्हणून हा अनर्थ घडला."
त्यांचे बोलणे ऐकून तिथे जमलेल्या सगळ्यांचा बांध फुटला.
"आणि बाळ..?" भीतभीत आसावरीने विचारले.
"बाळ सध्या ठीक आहे. परंतु कमी वजनाचे असल्यामुळे तिला लवकर आयसीयू मध्ये भरती करावे लागेल."
"ठीक आहे डॉक्टर. आम्ही बाळाला चाईल्ड स्पेशालिस्ट कडे घेऊन जातो." नयनाताई म्हणाल्या.
"खबरदार आई, बाळाला हात लावशील तर. माझी शपथ आहे तुला. जिच्यामुळे मी अनुला गमावलं ते बाळ नकोय मला." तो नयनाताईच्या गळ्यात पडून रडत होता. रडता रडता अतिव दुःखाने त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. विनायकराव आणि रजनीताईंना त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले.
इकडे रजनीताई आणि मंगेशरावांची स्थिती फारच विदारक होती. त्यांना सोडून गेलेली त्यांची लेक, तिकडे शेखरची ती अवस्था.
बाळाला कुणाकडे सोपवायचे हा नर्सला प्रश्न पडला. त्या छोट्या जीवाला घेऊन ती बाहेर आली. रजनीताईकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना आसावरीने हात समोर केले. त्या चिमण्या गोळ्याला आपल्या हातात घेताना चिमुकल्या हाताला तिचा स्पर्श झाला आणि तिला गहिवरून आले. त्या हाताला तिने हलकेच आपल्या ओठाला लावले.
"पिल्लू, प्रतिबिंब आहेस तू माझं. माझी छवी आहेस तू. जन्माला आलीस नि माझ्यासारखेच आईवडीलांच्या प्रेमाला पारखी झालीस. पण मी तुला कधीच अंतर देणार नाही. मी सांभाळेन तुला. मी तुझी आई होईन."
अनुच्या दुःखाला बाजूला ठेऊन ती बाळाला घेऊन चाईल्ड स्पेशालिस्टकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी त्या चिमणीला तपासले आणि आयसीयू मध्ये भरती करायला लावले. तारखेआधीच झालेली प्रसूती, त्यामुळे बाळाचे कमी असलेले वजन, साखरेची खालावलेली पातळी.. किमान चार पाच दिवस तरी बाळाला भरती ठेवावे लागेल असे डॉक्टर बोलले. त्या चिमुकलीला हॉस्पिटलच्या स्टॉफवर सोपवून आसावरी माघारी फिरली.
नर्सच्या हाती तिला देताना नाजूक चणीच्या तिच्या इवल्या मुठीत पकडलले आसावरीचे बोट, मघापासून पहिल्यांदा उघडलेले घारे डोळे..जणू ते सांगत होते, की आईबाबांनी तर सोडलं मला, तू तरी नको ना सोडून जाऊ.
आसावरीने डोळे पुसत तिच्या हातून आपले बोट हलकेच सोडवून घेतले. हॉस्पिटलचा ॲडव्हान्स भरून ती परत नर्सिंग होमकडे निघाली.
ती येईपर्यंत मंगेशरावांनी दवाखान्यातले सर्व सोपस्कार आटोपले. रजनीताई रडत होत्या. मंगेशरावांच्या डोळ्यात टिपूसही नव्हते. सायंकाळी अनुचा अंत्यविधी आटोपला. शेखर तिथे येऊ शकला नाही. सकाळपासून सायंकाळपर्यंत एका दिवसात खूप काही घडून गेले होते. आसावरी त्यांच्याकडेच थांबली.
रजनीताईंना मंगेशरावांची अवस्था बघवत नव्हती. त्या रडून मोकळ्या तरी झाल्या होत्या. मंगेशराव आतल्या आत कुढत होते. तिसऱ्या दिवशी पूजा झाली. पिंडदानाची वेळ झाली. कावळा पिंडेला शिवत नव्हता.
"अनू तुझी लेक आता माझी झाली. मी तिच्यावर मायेचे पांघरून घालेन. तुझी जागा तर घेऊ शकणार नाही पण तिची आई बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन." आसावरीने डोळे मिटून हात जोडले आणि कावळ्याने पिंडेला स्पर्श केला.
कावळा स्पर्शला आणि मंगेशराव खाली कोसळले. कोसळले ते उठलेच नाही. जणू त्यांचा जीव त्यांच्या लेकीत अडकला होता.
तीन दिवसात झालेले दोन आघात! रजनीताई पुरत्या कोलमडून गेल्या. त्या घरात त्या सैरभैर झाल्या होत्या. आसावरी त्यांना आपल्या फ्लॅटवर घेऊन आली. घरून येताना रजनीताईंनी देवघरातला बाळकृष्ण आणि अंगणातला गुलाब तेवढा सोबत घेतला.
आठवड्याभराने हॉस्पिटलमधून छवीला सुट्टी झाली. आसावरी तिला आपल्या फ्लॅटवर घेऊन आली. अनुच्या प्रसूतीनंतर काही दिवसांनी ती बाळ आणि अनुला आपल्याकडे घेऊन येणारच होती. आज मात्र तिच्या हातात केवळ बाळ होते. रजनीताईंनी पाणीभरल्या डोळ्यांनी तिचे औक्षण केले. आज अंगणातला गुलाब पहिल्यांदा फुलला होता. गुलाबासारखीच गुलाबी दिसणाऱ्या त्या परीला त्यांनी आपल्या हातांच्या झोळीत घेतले. "माझा गुलाब आहे हा!" त्यांच्या तोंडून आपसूकच बाहेर पडले.
तेव्हापासून ती चिमुकली रजनीताईंचा गुलाब अन आसावरीची छवी झाली. ही पाच वर्षे भुर्रकन उडून गेली. आसावरीचा पहिला जॉब जॉईन न होऊ शकल्यामुळे गेला होता. त्यानंतर तीन महिन्यांनी तिने सागरच्या ऑफिसमध्ये जॉब मिळवला. त्या दुःखातून तर दोघी सावरल्या नव्हत्या पण छवीसमोर त्याबद्दल कधी अवाक्षारही काढत नव्हत्या. छवीला अनू माहिती होती ती फक्त तिच्या आशुची बेस्ट फ्रेंड म्हणून!
अनुचे तसे झाले, शेखर आठ दिवस दवाखान्यात होता त्यानंतर जवळपास सहा महिने डिप्रेशन मध्ये. नंतर इथले सर्व सोडून तो अमेरिकेला गेला तो आत्ता कुठे परतला होता.
त्याच्या येण्याबद्दल तर रजनीताईंना ठाऊक होते, पण तो असा दवाखान्यात येईल हे कुठे ठाऊक होते?
"काकूऽऽ"
आसावरीने त्यांच्या खांद्यावर अलगद हात ठेवला.
"आसावरी, माझा गुलाब.." त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
"तिन्ही सांजेला रडायचं नसतं हे सांगायला तुमच्या गुलाबाने मला पाठवलंय. सावरा स्वतःला. शेखरला बघून आपण असे रिॲक्ट होऊ तर ती कोमेजून जाईल. खूप साऱ्या प्रश्नांत अडकेल. तुमचा लाडका गुलाब असा कोमेजलेला आवडेल का तुम्हाला?"
"नाही." त्यांनी पटकन आपले डोळे पुसले आणि तिच्यासोबत आत आल्या.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.
******
फोटो गुगल साभार!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा