भाग -आठ.
*******
थोड्यावेळात छवी झोपी गेली.आसावरीच्या डोक्यात मात्र तिच्या प्रश्नांचा भुंगा गोल गोल फिरत होता.
तिचे करपलेले बालपण!!
तिने निजलेल्या छवीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि डोळे मिटले. आपल्या छोट्याशा चेहऱ्यावरून एक प्रेमळ हात फिरतोय असे तिला वाटत होते. अलगद एक टपोरे मोती गालावर घरंगळायला लागला.
'हा प्रेमळ स्पर्श किती वर्षांपूर्वी मी अनुभवला असेल? कदाचित तीस वर्षांपूर्वी! ह्या चिमण्या छवी येवढीच असेन का मी?' विचारांच्या गर्तेत ती हरवली.
डोळे मिटलेले आणि मन..? ते केव्हाच जाऊन पोहचले भर दुपारच्या रखरखत्या उन्हात! गावात राहणाऱ्या मामाच्या अंगणात! अंगण कसले? तिची तर खेळण्याची हक्काची जागा होती ती. मामाचे घर म्हणजे दोन खोल्यांची झोपडीच. समोर हे अंगण. अंगणात डौलाने उभे असणारे तुरटसर गोड चवीच्या जांभळाचे झाड!
"आसावरी!"
इतक्या दिवसांनतर आई आज प्रेमाचा वर्षाव करत होती. पाच वर्षाचा कोवळा जीव त्यात न्हाऊन निघाला.
"आई,मी सोबत येऊ?" तिने विचारले.
लताने पुन्हा एकदा तिची पापी घेतली आणि एक घट्ट आलिंगन देऊन जायला वळली. काही न कळल्यामुळे भांबावलेल्या नजरेने चिमुकली आसावरी तिला पाठमोरी बघत राहिली आणि मग परत आपल्या बाहुलीच्या खेळात गुंतली.
मामा आल्याची वर्दी देत ती स्वयंपाक घरात पळाली. काही बोलायला तोंड उघडणार तोच मामी कडाडली, "माझ्या कानावर आलंय. मी आणते चहा. तू जा."
तांब्याभर पाणी घेऊन आल्यापावली आसावरी माघारी वळली. डोळ्याच्या कोपऱ्यातून चुलीशेजारी चहात पोळी बुडवून खात असलेला मामाचा मुलगा, योगेश तिला दिसला आणि तिलाही भुकेची जाणीव झाली. पण बोलणार कोणाला? ती गुमान मामाच्या हातात तांब्या देऊन त्याच्याजवळ बसली.
"तुझी आई कुठे दिसत नाहीये गं. झोपली आहे का?" आसावरीच्या डोक्यावरून हात फिरवत मामाने विचारले.
"झोपतील कशाला? कुठेतरी गाव उंडारायला गेल्या असतील." त्याच्यापुढे चहाचा कप ठेवत मामी म्हणाली.
"कधीतरी चांगलं बोलत जा की." मामाचा आवाज करडा झाला तशी नाक मुरडून मामी आत गेली.
आता चांगलाच अंधार पडायला सुरुवात झाली होती तरी लता घरी आलेली नव्हती. तिच्या आठवणीने आजीच्या पदरात तोंड लपवून आसावरी स्फून्दू लागली. आजीला अर्धांगवायू झालेला. मुखातून नीट शब्द उमटत नव्हते. कसेबसे तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा ती प्रयत्न करू लागली. तरणीताठी पोर कुठे गेली असेल ह्या चिंतेने तिच्याही डोळ्यातून पाणी वाहायला लागले होते.
"तुला काही बोलली होती का गं?" मामानं विचारलं.
"रानात जाते म्हणाली होती." ती काहीसं आठवून म्हणाली.
" घ्या, तेवढंच बाकी राहिलं होतं." मामी दारात येत म्हणाली.
मामाने रागाने पाहिलं तसे ती गप्प झाली.
"मी जाऊन येतो जरा." आपली सायकल घेत मामा.
"अहो थकून आलात. दोन घास वाईच पोटात घाला आणि मग जिथे जायचं असेल तिथे जा." मामी.
"तुला काही गांभीर्य आहे की नाही गं? रानात एक चक्कर मारून आलोच मी."
सायकलवर टांग मारत मामा रानाच्या दिशेने निघाला. वाटेत त्याने गावातील एक दोघांना घेतले. विजेरीच्या प्रकाशात अख्खे रान धुंडाळले पण लता कुठेच गावली नाही.
तासा दोन तासाने खाली मान घालून मामा परतला. आसावरी आजीच्या कुशीत निजली होती. त्याने खिन्न नजरेने तिच्याकडे पाहिले. गालावर ओघळलेल्या आसवांच्या सुकलेल्या रेषा, भुकेने खोल गेलेले पोट..! तिच्याबद्दल एक कणव दाटून आली.
" मुकुंदा, लता भेटली का रे?" आजीचा थरथरणारा हात आणि ओठांची होणारी हालचाल हाच प्रश्न विचारत असावीत हे त्याला कळले.
"आई, येवढया रात्रीचा कुठेच पत्ता लागला नाही गं. सकाळी उजाडल्या उजाडल्या परत जाईन आणि नाहीच पत्ता लागला तर तालुक्याला जाऊन पोलिसांत तक्रार नोंदवून घेईन."
आईजवळ येत मामा समजूत काढू लागला.
"आधी तू जेऊन घे बरं!" म्हणून जेवणाचे ताट तिच्यासमोर आणून पोळीचा घास समोर केला.
तरुण लेक अशी घर सोडून गेल्याच्या दुःखात त्या माऊलीच्या गळ्याखाली घास उतरेना. तिने ताट बाजूला केले.
मामीने जेवण वाढले. जणू काही घडलेच नाही अशा भावात दोघे मायलेक जेवायला लागले.मामाची नजर कोवळ्या आसावरी कडे गेली.
" ही जेवली?" त्याने बायकोला विचारले.
झोपायचा प्रयत्न करूनही मुकुंदाचा डोळा लागेना. सारखा लताचा चेहरा नजरेसमोर येत होता.
सासरी दोन दीर, दोन नणंदा. म्हातारे सासुसासरे. लताने सगळ्यांना माया लावली. नवऱ्याच्या मदतीने दीर नणंदेचे लग्न लाऊन दिले. हे सगळे करण्यात आलेल्या खर्चाने त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला.नेहमी दादा वहिनीच्या मागे मागे करणारे दीर कर्ज फेडतांना मात्र पुढे आले नाही. दोन वर्षापासून शेतीची मिळकत देखील कमी झाली होती. शंकर मनातून खचला होता. घरातील परिस्थितीने हतबल झाला होता.
लता सतत त्याला धीर द्यायची, "कोणी नसेल सोबत तरी मी आहे ना? आपण दोघे मिळून कष्ट करू, सगळं ठीक होईल."
शंकर गेल्यानंतर आठवडा लोटला पण लता तशीच होती. तिची ही अवस्था मुकुंदाला बघवेना. लहानग्या आसावरीची नुसती आबाळ होत होती. तो दोघींना आपल्या घरी घेऊन आला. त्याची परिस्थितीही तशी बेताचीच. अर्धांगवायुने खाटेवर असलेली म्हातारी आई, खाष्ट बायको, मंदा. अतिप्रेमाने लाडावलेला मुलगा, योगेश आणि तो असे त्याचे कुटुंब!
लता आणि आसावरी घरी आल्या. आता त्या कायमच्या इथेच राहणार या विचाराने मंदाचा नुसता जळफळाट व्हायला लागला. शंकर घरी नसला की ती लताला नाही नाही ते बोलायची. लता आपल्याच विश्वात शून्यात नजर लाऊन बसलेली असायची आणि आसावरी दिवसभर अंगणातील जांभळाच्या झाडाखाली खेळत असायची.
आजही ती अशीच झाडाखाली खेळत बसली होती आणि लताने तिला आवाज दिला. बाबा गेल्यापासून आईने मारलेली ती पहिली हाक, ती हाक कदाचित शेवटची असेल असे त्या चिमुकलीच्या ध्यानातही आले नसेल.
पहाटे ती दचकून जागी झाली.
"आसावरी? काय झाले गं चिमणे?" मुकुंदा तिच्या जवळ येत म्हणाला.
" उगी हं बाळ. सकाळी शोधेन मी तिला." तो तिला थोपाटू लागला.
तिचं रडू काही थांबेना. रडता रडता अचानक तिला आईने दिलेला कागदाचा चिटोरा आठवला.
.
.
.
क्रमश:
असे काय लिहिले होते त्या कागदामध्ये?
कळण्यासाठी वाचत रहा.. कथामालिका
पाहिले न मी तुला..!
साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेखक आपल्या कल्पनांना आकार देऊन कथा लिहीत असतात. त्यामागे त्यांचा वेळ, मेहनत असते. त्यामुळे कथेतील प्रसंग, पात्र यांचा कुणीही गैरवापर करतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
धन्यवाद!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा