पहिलं प्रेम विसरताना

Pahile pream visartana

नव्याचे नवे दिवस केव्हाच  संपले हाेते. अाता तिला अाेढ लागली ती माहेरच्या उंबरठ्याची. कधी एकदा माहेर गाठते असेच तिला झाले.  पावसाच्या चार थेंबांसह तिने अापल्या माहेरी पाऊल ठेवलं. सारं वातावरण उत्साहात न्हाऊन निघालं.  दाेन वर्षापुर्वी,  उंबरठा अाेलांडून गेलेली लेक माहेराला अाल्याने घरात बाप अन मायेच्या उत्साहाला उधाण अालं हाेतं. तिनंही घाेटभर पाणी गळ्याखाली उतरवतं..अापल्या मंद पावलांनी साऱ्या घराचा ताबा मिळवला. सारे काही जिथल्या -तिथेच हाेतं. तिच्याही मनात दाटून अालेला अानंद गगनात मावत नव्हता. इकडुन-तिकडे करत ती सारं काही न्याहाळु लागली. तिला साऱ्याच सग्या-साेयऱ्यांच्या भेटीची अाेढ लागलेली हाेती. त्यामुळेच प्रत्येकाला अाणि घरा-दारातील प्रत्येक वस्तुला भेटत हाेती. मुक्त पक्षासारखा तिचा संचार सुरू हाेता. तहान-भुक हरवून ती हे सारं काही तुडवत हाेती. मायेनंही तिला मनसाेक्त भेटू दिलं. या साऱ्या वातावरणानं तिच्या अंगात वेगळीच जादु संचारली हाेती. प्रवासाचा थकवा केव्हाच हवेत विरून गेला. अन नव्याने चेहऱ्यावर तलतली अाली हाेती. फक्त माहेरच्या अंगणात पाय ठेवल्यानं तिला ही सारी काही दैवी शक्ती लाभली हाेती.  या मातीमध्येच वेगळीच जादु असते, हे अाईचे वाक्य अाता तिला तंताेतत पटत हाेते. या मातीची अाेढ अंगात नव्याने उत्साहाचा संचार करण्यास भाग पाडते, याचाच प्रत्यय अाता तिला क्षणाक्षणाला येत हाेता. माज घरातून तिची पावलं अाता हळूहळू काेपऱ्या काेपऱ्यांकडे वळत हाेती. याचदरम्यान क्षणात तिची नजर खिडकीच्या बाहेर पडली. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्यानं ती काहीशी सुखावली. चेहऱ्यावरच्या तलतलीला अाता या वाऱ्यानं वेगळेच टाॅनिक दिलं हाेतं. अासपासच्या प्रत्येक घर अाणि झाडांवर ती नजर टाकत हाेती.
याच दरम्यान कानावर पडलेल्या मंदिरातील घंटेच्या अावाजाने तिचं सैरावैरा झालेलं मन जागेवर स्थिरावलं. सासरी जाताना शेवटंची मंदिराची पायरी चढल्याचं तिला अाठवलं. तिनं डाेळे बंद केले अाणि मंदिरातील पंचमुखी माराेतीचं दर्शन घेतलं. याचदरम्यान हसण्याच्या अावाजानं तिचे लक्ष वेधल्या गेले.  या वेळी कानावर पडलेला अावाज हा अाेळखीचा अाणि अाेढ लावणारा हाेता. ती क्षणात त्या अावाजाचा कानाेसा घेत जागेवरच थबकली हाेती.  मंदिराच्या पाऱ्यावर चार चाैघांत बसलेल्या त्याच्यावर तिची नजर खिळून बसली. अाता ती स्थितप्रज्ञासारखं ते चित्र न्याहाळू लागली. दाढीचे केस किंचीत वाढलेले, डाेळे खाेल, चेहरा सारा खप्पाड झालेला, असे असतानाही चेहऱ्यावरचे ते हास्य कायम हाेते. ताे मनसाेक्तपणे हासत हाेता. याच अावाजानं तिचं सारं चित्त अाता त्यावर स्थिर झाले. पाय खाेल जमीनीत रुतल्यागत झालीत.  हात वेणीवर गेला अन काही तरी हरवल्यागत तिला झालं.
त्याच्यातल्या त्या वेगळेपणाने तिचं लक्ष वेधून घेतले. त्याच्या मुखदर्शनाने ती अधिकच सुुखावली.  मात्र, हा अवतार पाहून अातल्या अात जीवाची काहीली हाेत हाेती. तिनं मनभरून ते मुखदर्शन केलं. अाता मनात दाटून अालेला हुंदका तिला राेखता येईना. पापण्याच्या कडा तर केव्हाच पाणावल्या हाेत्या. त्यामुळेच त्याच्या  चेहऱ्याभवती न कळत अश्रुचं रिंगण तयार झालं हाेतं. ती मनभरून ताे चेहरा पाहू लागली. मनात साऱ्या गाेष्टींचा कल्लाेळ सुरू हाेता.
काय हा अवतार....काय
 हरवलं.
म्हणून हा असा दिसताेय. काेणती बाधा झाली’
अशा अगणित प्रश्नांनी  तिच्या मनात एकच कल्लाेळ माजवला हाेता. याच प्रश्नाची उत्तरे अाता तिला शाेधायची हाेती. काही केल्या तिला हे सारं काही जीवघेणंच वाटत हाेतं. असंख्य प्रश्नाना सामाेरे जात असताना
माझ्यामुळे तर नसेल ना
याच उत्तरावर तिच्या विचाराचे चक्र काहीसे स्थिरावले.
शांत सागरात एका वादळानं असंख्य लाटा निर्माण कराव्या, बस, असेच काहीसे तिच्या बाबतीत झाले हाेते. त्याच्या मुखदर्शनाने अाता तिच्या  अनेक लाटा तिच्या मनाच्या कप्यावर एकापाठाेपाठ एक येऊन  धडकत हाेत्या.
 तिच्या जुन्या अाठवणींना उजाळा मिळाला. माप अाेलाडलं अन तिने सासरी नव्याने संसार थाटला. मात्र,  तरीही त्याच्यासाेबतच्या अाठवणी, तिच्या मनात तश्याच कायम हाेत्या. पहिल्या प्रेमाच्या त्या सुखद अाठवणी. यात जगलेल्या प्रत्येक क्षणांची स्मृती अाता ताज्या हाेत हाेत्या.
त्याच्यासाेबत मनाेमन रंगवलेल्या सुखी संसाराचे चित्र अपुर्ण राहिल्याची सल तिला सारखी बाेचत हाेती. याच विचारानं तिला वेड लागल्यागत  झालं.
शे-दाेनशे उंबऱ्याच्या या गावात त्याचं व्यक्तीमत्वच चार चाैघांत उठून दिसणारं. नजरेत भरणारा ताे करारी  बाणा. सारं विश्व अापल्या मुठीत सामावून घेण्याचा जिगर त्याच्यात हाेता. त्यामुळेच पहिल्याच नजरेत अापलंसं करून टाकणारी जादूच त्याच्याच.
त्यामुळे काेणीही भाळेल, असेचं. याला ती तरी कशी अपवाद ठरणार. तीही त्याच्या नजरेनं घायाळ झाली हाेती. अन मनात frist site love ची पालवी सहज फुलली हाेती. तिलाही अाता त्याच्या शिवाय करमेना. अन ती अाता त्याच्या सुखद अाठवणींमध्ये हरवून गेली. ते विश्वच वेगळ हाेतं. त्या अाठवणींच्या माेरपंखी स्पर्शानं ती स्वत:ला हरवून बसली.
कृषीची भली माेठी डिग्री घेऊन ताे गावात परतला. माेठ्या शहरात अाणि थेट विद्यापीठात शिकल्यानं त्याचा गावात भला माेठा रुबाब. पण, त्याच्या वागण्या-बाेलण्यात ताे कधीही जाणवत नव्हता. माहित असणाऱ्या प्रत्येकालाच त्याचा सार्थ अभिमान वाटायचा.
‘ते पाेरगं अामच्या गावचं.
भलतंच संस्कारी अाहे.
बापुच्या  शब्दा पुढे मरेल पण कधीही जाणार नाही’
असा सबुतच प्रत्येक जण त्याच्याबाबतीत देत हाेता.
भल्या माेठ्या शहरात शिक्षण घेतलेले असले तरीही   संस्कार तसेच गावाकडचेच कायम हाेते. बाेलण्या-वागण्यातील ती गावाकडची संस्कृती तशीच कायम हाेती. त्यावर  कधीही शहरी भागातील ताे बेगडीपणा अालेला दिसत नव्हता. हेच वेगळंपण जपत ताे प्रत्येकाच्या मनात घर करून हाेता. अनेक मुलींच्या स्वप्नातील ताे राजाच हाेता. अनेकांनी मनाेमन त्याला वरले हाेते. ताे मात्र, जबाबदारी अाणि कर्तव्याची धुरा सांभाळत हाेता.
पुण्यात इंजिनिअर असलेल्या अाताच्या स्थळापेक्षाही तिला गावात साेशल वर्क करणाऱ्या त्याचीच तिला अधिक भुरळ पडलेली हाेती. सर्वच कामात ताे पुढे असायचा. गणपतीचा उत्सव असाे की नवरात्र. गावात पाेरीच लग्न असाे की मित्राचे नानमुख.
 सारं काही उत्साहात ताे सर्वांना साेबत मिळुन-मिसळुन पार पाडत हाेता. त्यामुळेच त्याचे व्यक्तीमत्वच अधिक खुलुन निघणारं. साऱ्या कामात ताे पुढे असायचा. कश्याचीही लाज ताे बाळगत नव्हता. लग्नात वाढपी पासून अन्न जमा करेपर्यंतची सारी कामं ताे बिनधास्तपणे करत हाेता. मरण कार्यातही त्याची  उपस्थिती अावर्जुन असायची. सुख-दुखात सातत्याने सहभागी हाेण्याचा त्याचा स्वभाव.
कृषीची डिग्री घेऊन अाल्यापासून त्यानं बघता बघता दाेन वर्षात बापाच्या हातातला सारा काही कारभार स्वत:कडे घेतला. अाणि वडीलांचा भारही हलका केला. मात्र, हे करताना कधीही वागण्या अाणि वर्तनामध्ये गर्वाचा लवलेशही नव्हता. तसा विचारही कधी त्याच्या मनाला शिवत नसे. त्यामुळेच ताे सारं  करताना  वडिलांच्या जुन्या विचारांना अत्याधुनिक साधनांची जाेड देत हाेता. त्यामुळेच त्याला यश सहज गाठता येत हाेतं.
वडीलाेपार्जित धुऱ्यावरून असलेला वादही त्याने अत्यंत माेजक्या अाणि शांत शब्दात निवळला. सहा फुटाच्या धुऱ्यात त्याने भले माेठे खाेल खड्डे केले. तर काही ठिकाणी कडाळं टाकलं. अन गुरांना चारा मिळाला अाणि पाणीही. त्यामुळे वाद कापरागत हवेत विरला.
या साऱ्या अनेक कर्तबगारीच्या कार्यात ताे नेहमीच अग्रेसर असायचा.
असे असताना प्रेमाच्या बाबतीत त्याचे विचार वेगळेच हाेतं. भागवत सप्ताहाच्या वेळी न कळत झालेल्या भेटीतून तिनं  माेठ्या धीटाईनं त्याला बाेलतं केलं. मात्र, ताे तसले काहीही मनात नाही, असे सांगत हाेता. अखेर वेळाेवेळी मनात असलेल्या प्रेमाची प्रचिती त्याला अाली अाणि त्याने या साऱ्या जबाबदारीतून काहीसा वेळ काढला. स्विकारला ताे प्रेमाचा प्रस्ताव. मंदिराच्या पाठीमागे पहिल्याच भेटीत ताे करारी बाणा पुढ्यात येऊन थांबल्याचं...तिला स्वप्नागत वाटत हाेतं. गावातील शंभर पाेरी नजर ठेऊन असतानाही त्यानं अापल्याला प्रेमाचा स्विकार करावा, हेच तिला सुखावणारं हाेतं. मात्र, काैतुकाची ही गाेष्ट तिला काेणाकडेही व्यक्त करता येईना. वेळात वेळ काढून शेताच्या बांधावर तर कधी नदीच्या काठावर हाेत असलेल्या भेटीतून तिला वेगळाच अानंद मिळत हाेता. तिची सारखी धडपड असायची, प्रत्येक भेटीत त्याला बाहुपाश्यात घेण्याची. मात्र, प्रत्येक वेळी सावध असायचा. अखेर तिनंही माेका साधून अाणला. पायात काटा रुतल्याच्या बहाण्यातून त्याचा स्पर्श झाला. हिच्या अंगाअंगात वेगळाच राेमांच निर्माण झाला. ती अातुरलेली हाेती, या स्पर्शासाठी. ताे मात्र, टाळत असायचा ितला. त्यामुळे अधीर असलेल्या तिच्यासाठी हा वेगळाच अानंद ठरत हाेता. तिनंच पुढाकार घेतला. अन त्याचा स्पर्श झाला. संधी मिळताच ती सहजपणे त्याच्या बाहुपाश्यात विसावली. अनेक संकटात अाता हीच सुखाची प्रचिती अाणुन देणारी जागा असल्याचे तिच्या काेवळ्या मनाला पटत हाेते. ती क्षणभर डाेळे मिटून शांत बसली. त्यानंही ती उब तिला दिली. याच जाणीवेतून हाच अापल्या अायुष्याचा जाेडीदार. हे अाता तिनं त्याला स्पष्ट सांगितलं. अन वचनंही त्याच्याकडून घेतली. याच विश्वासाच्या नव्या नात्यानं ती अधिकच हरखून गेली. लगेच त्याला जवळ घेत तिनं अाेठावर अाेठ टेकवले. अन दाेघंही  नव्या विश्वात क्षणात दाखल झालं. दाेघांचेही श्वास एकाच वेगाने सुरू हाेते. क्षणात त्याने स्वत:ला सावरले. बाजुचा कानाेसा घेत त्याने तिचा निराेप घेतला. मात्र, पहिल्या प्रेमाच्या पहिल्या चंुबनाच्या त्या गाेड अाठवणींना ताे देऊन गेला. तिच्यासाठी हे सारं काही वेगळंच हाेतं. त्यानंतर नित्याच्या भेटीतून सुखीसंसाराची  चित्र अधिकच रंगत गेले. ताे प्रत्येक भेटी तिच्या वेणीवर मावळायचा गुलाबाचे फुल.  त्यासाठी त्यानं खास राेपं अाणली हाेती कृषी विद्यापीठातून फक्त तिच्याचसाठी. याच गुलाबाच्या सुगंधाच्या सहवासात ती  शाेधायची त्याला रात्रभर.
तु श्वास अाहेस,
तुझ्यावाचून जगण अशक्य. साेडून जाणार नाही. तुही साथ दे,’
हेच शब्द घेऊन त्यानं वचन दिलं.  याच शब्दाखातर ती त्याला साथ देत हाेती.
मात्र, दैव जाणिले कुणी....
एका अाठवड्यात या साऱ्या गाेष्टींना पुर्णविराम मिळाला. काही कळण्याच्या अात ती पुण्यातील इंजिनिरअरसाेबत विवाहबद्ध झाली. ताे पाहत राहिला तिचा हा साेहळा, उघड्या डाेळ्यादेखत. पाणावलेल्या कडा अाणि दाटून अालेल्या हुंदक्याला दाबत.
ताे अाघात....
मात्र, अाता  काकीने खांद्यावर हात ठेवल्याने अाता ती क्षणात या अाठवणीतून बाहेर अाली. हे सारं काही अाठवतं ती तशीच खिडकीपाशी थबकली हाेती.
‘वर्षभरापासून सारं गणित हुकलं. बापु (वडिल)  दाेरीला  लटकुन इहलाेकी गेला. पीकपाण्याचं सार समीकरण चुुकलं. हाती काही पडलं नाही. लाखभर अडचणी अाणि डाेंगऱ्याएेवढ्या संकटांचा ताे एकटा सामना करताेय.यातून
ताे अाता सारं काही सावरण्यासाठी धडपडताेय. पण, निसर्ग काही केल्या साथ देईना. अाेसाडलेलं रान ताे तुडवताेय. उद्याच्या अाशेवर. म्हणुनच बिचाऱ्याची हाडंच राहिली,’
काकीच्या या वाक्यांनी ती भानावर अाली. काकीनं तिला गळ्याशी लावलं. या कानावर पडलेल्या वाक्यांनी तिच्या डाेळ्याच्या कडा क्षणात पाणावल्या. तिनं हुंदका  अावळला. अन तसा काकीनं तिचा हात धरला अन धीर दिला.
त्याला पाहुन तिच्या मनाची झालेली काहिली, काकीनं अापल्या डाेळ्यानं हेरली हाेती.
काेपऱ्यात बसुन तिनं  वर्षभरात त्याच्यावर
अाेढावलेल्या साऱ्या संकटाची कथा तिच्या कानावर टाकली. अन तिच्या जीवाचा थरकाप उडाला.  बरं झालं तु हाेकार दिला. नाहीतर..यंदाच्या साली पाण्यानं चाट दिली अन काहीच नाही अालं. म्हणुन त्याचा बाप दाेरीला लटकला. अाता तर तिच्या जीवाचा थरकाप उडाला. अापल्या एका चुकीनं ताे किती अडचणीत सापडला. मात्र, अाजही लढताेय या साऱ्या संकटांचा सामना करत. काेणत्याही कुरबुरी शिवाय.
या काकीच्या वाक्यांनी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. किती स्वप्न रंगवली हाेती, त्याच्यासाेबतच्या सुखी संसाराची. पण, पुण्याच्या या स्थळानं, या साऱ्या स्वप्नांवर पाणी फेरलं त्याच्या. अलीशान टु-बीचकेच्या  भव्यतेतून परिस्थितीमुळे  तिनं सारं काही विसरून सप्तपदी  घेतली. मात्र, तिला काही केल्या या
थाटलेल्या संसारात अजुनही गाेडी लागत नव्हती. अाता तर, तिचं मनही कश्यातच रमेना. सातत्याने कुठल्याही परिस्थितीत असणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावरचं ते  हसु अाता लाेप पावलं हाेतं. पाण्याअभावी भेगाळलेल्या वावरागत त्याचा चेहरा झाला. काय हाेऊन बसलं....कधी सावरणार ताे, या साऱ्या चक्रव्युहातून.... त्याच्याच विचारात तिचे पाच-सहा दिवस असेच वाऱ्यागत निघून गेले. सकाळीच पती सुटाबुटात दारात उभा हाेता. सासरी पाठवण्यासाठी साऱ्याची लगबग सुरु हाेती.मायनं तुकडा अाेवाळला अाणि तशी ती नवऱ्यासाेबत फाेर व्हिलर जवळ अाली. धाकट्यानं गाडीच्या डिक्कीत सामान भरलं.
अाता अाखजीले पाठवा, लेकीले, अशी विनंती माय अापल्या लाडक्या  जावयाले करु लागली. काकीनंही हिच अाठवण करून दिली.
तेवढ्यात ताे हातात दाेर घेऊन गाडीच्या समाेरून धावताना तिच्या नजरेत पडला. गाडीच्या बाजुलाच गुलाबचं टवटवीत फुल पडलेलं तिच्या नजरेनं हेरलं. अन काळजाचा ठेका चुकला.   बापासारखंच केलं तर....या विचारानं तिच्या काळजात धस्स झालं...अाणि अन तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काहीही सुचेना. श्वास अातल्या अात गुंतला. हे विश्वच अाता गडद झाल्यासारखं तिला वाटत हाेतं. डाेळ्यासमाेर अंधाऱ्या अाल्या.  त्यामुळे भान हरपून गेली अाणि जमीनीवर पडणाराच तेवढ्यात कुणाचही लक्ष जाण्याच्या अात काकीनं तिचा हात धरला अन ती काकीच्या गळ्यात पडली. दाटुन अालेल्या भावनांना माेकळ करत ती काकीच्या गळ‌्यात पडून हमसुन हमसुन रडू लागली. मात्र,
 काकीनं सावरत तिच्या कानात सांगितलं अन तिच्या जीवात जीव अाला.
भिऊ नकाे, पाखऱ्या बैल उधळल्यानं ताे दावं घेऊन पळताेय...

©®ऋषिकेश पाठक