शीर्षक:- पहिल्या पगारातील साडी
भाग:-१
"आज पहिला पगार भेटला, खूप आनंद होतोय. स्वतःची कमाई हातात घेताना एक वेगळंच समाधान भेटतं ना." शुभा तिच्या कलिग राणीला हसत म्हणाली.
"हो गं, हे मात्र अगदी खरं आहे बघ. नाही तर थोड्याशा खर्चासाठी आणि काही हौसमौज करायची म्हटलं तरी सतत लग्नाआधी वडिलांसमोर नाही तर भावासमोर आणि लग्न झाल्यावर नवऱ्यासमोर हात पसरावे लागत होते. त्यात कारभार जर सासूच्या हातात असेल तर मग विचारूच नको. कशाला, काय म्हणत शंभर प्रश्न विचारून भंडावून सोडतात. वरून भलं मोठं लेक्चर ऐकावं लागतं ते वेगळंच." राणी नाक तोंड मुरडत म्हणाली.
"हो ना, तू म्हणतेस ते बरोबर आहे गं. पण माझ्या घरचे तसे नाहीत." शुभा म्हणाली.
"हुं, तुझ्या लग्नाला फार काही दिवस झाले नाहीत म्हणून तुला तसं वाटतं. हळूहळू कळेलच तुला नंतर. त्यात मी सासू असते महामाया असते. लग्नाच्या आधी एक रंग आणि लग्नानंतर वेगळा रंग असतो तिचा. बरं ते जाऊ दे आता सांग काय करशील या पगाराचं?" राणीने सुस्कारा सोडत विचारले.
"तेच समजत नाहिये गं, काय करू?" ती डोक्याला हात लावून म्हणाली.
"एक काम कर, तुझ्यासाठीच एखादी छानशी साडी किंवा दागिना घे. कायम लक्षात राहिलं तुझ्या." राणीने सल्ला दिला.
त्या गोष्टीचा विचार करत ती ऑफिसमधून बाहेर पडली. तिने रिक्षा पकडली आणि त्यात बसून ती घरी निघाली.
'वाटेत एखादे दुकान आले की घेऊ काहीतरी' असा विचार ती मनात करू लागली. तिला तिच्या आईची आठवण आली. तिने ही बातमी आधी तिला सांगावं म्हणून तिला काॅल केला,"हॅलो, आई.."
तिची आई संगीता दटावत म्हणाली,"बोल गं, आज कशी आठवण आली आईची? गधडे, महिना झाला फोन नाही तुझा. इतकी कशात बिझी झालीस गं? "
"अगं आई, नवीन जाॅब आहे. घरचं करून ऑफिसला जावं लागतं. त्यात मिटिंग, प्रेझेंटेशनची आधीच तयारी करावी लागते. त्यातच वेळ जातो. ते जाऊ दे गं. एक आनंदाची बातमी सांगायला फोन केला तुला." शुभदा आनंदाने म्हणाली.
"अग्गं बाई, मी आज्जी होणार आहे की काय? मला तर खूप आनंद झाला बघ." तिच ऐकून न घेता संगीता उत्सुकतेने म्हणाली.
तिच्या बोलण्याने शुभा लाजली. पण सावरत म्हणाली,"काय गं तू पण ना..ती बातमी नाही गं."
"मग..?" संगीताने कपाळावर आठ्या पाडत विचारले.
"अगं आज माझा पहिला पगार भेटला. हिचं आनंदाची बातमी तुला सांगायची होती आणि तुझ्या डोक्यात आपलं भलतच काहीतरी येतं." शुभा लाजून हसत म्हणाली.
"असं होय, वा ! छान की..अभिनंदन बाळा." संगीता कौतुकाने म्हणाली.
"थॅंक्यू आई." शुभा हसून म्हणाली.
"काय मग घ्यायचं ठरवलंस तू?" संगीताने विचारले.
"अम्म, विचार करतेय." शुभा विचार करत म्हणाली.
"एक सुचवू का?" संगीताने विचारले.
तिने हुंकार भरला.
तिने तिला काही तरी सांगितले. त्यावर शुभाने हुंकार भरत फोन ठेवला.
क्रमशः
काय सांगितले असेल संगीताने शुभाला? काय घेईल ती?
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा