Login

पाहुणे येता घरा

जरा घरच्यांच्या विचार करा.
पाहुणे येता घरा

©️®️शिल्पा सुतार

प्रीती ऑफिस मधे बिझी होती. तिचा फोन वाजला. "माई" तिने नाव बघितलं. सासुबाईंनी यावेळी फोन केला म्हणजे नक्की काहीतरी काम असेल.

"बोला माई."

"अग गावाहून पाहुणे आले आहेत. ते जेवायला आहेत. आज आपल्याकडे थांबतील. येतांना भाजी घेवून ये."

"माई दळण ही कराव लागेल."

"मी दिल."

"कोणी नेल?"

"खालच्या पिंटूला सांगितल."

"ठीक आहे."

"लवकर ये."

"हो माई."

प्रीतीने फोन ठेवला. तिच्या कपाळावर आठ्या होत्या. घरी येणारे पाहुणे काही कमी होत नाही. त्यांच्या पाहुणचारात वेळ जातो. ओळखीचे ना पाळखीचे. वैताग आला आहे. आम्हाला एकमेकांसाठी वेळ मिळत नाही. ऑफिस सुटल्यावर घरी जावसं वाटत नाही. तिने आशिषला फोन करून चिडचिड केली.

" शांत हो प्रीती." तो म्हणाला.

" काय शांत हो. दिवस भर ऑफिस संध्याकाळी एवढ काम. मला ना खूप राग येतोय."

" आता कोण आलय?"

" गावाहून कोणी ओळखीचे आहेत."

" कठिण आहे."

दोघ नवरा बायको एका ऑफिस मधे काम करत होते. तो पाचव्या मजल्यावर बसत होता. तर ती दुसर्‍या. तिथे त्यांची ओळख झाली होती. लव मॅरेज होतं. दोघ मोठ्या पोस्टवर होते. त्याला ऑफिसची जबाबदारी होती. तिला ऑफिस सोबत घरचं ही करायच होतं. घरी सासू सासरे लग्न झालेली नणंद नेहा होती. ते वागायला चांगले होते. घरच्यांच करायला प्रीतीला प्रॉब्लेम नव्हता. अति पाहुणे नको वाटत होते.

" तू आई बाबांशी कधी बोलणार आहेस आशिष?" तिने विचारल.

" हो बोलतो."

" कधीच तेच ऐकते आहे. "

" बर मी मीटिंग मधे आहे." त्याने सांगितलं.

" मी काही बोलत असली की तू बिझी असतोस." ती शेवटी म्हणाली.

"अस काही नाही प्रीती. आपल ठरलं आहे ना भांडायचं नाही. संध्याकाळी बोलू. बरोबर घरी जावू. माझ्या साठी थांब." आशिषने फोन ठेवला. प्रीती ही बिझी होती.

प्रीती आणि आशिष संध्याकाळी सोबत घरी निघाले. रस्ता भर प्रीतीची बडबड सुरू होती.

" मला एवढं काम जमणार नाही. नाना माईंचा काही प्रॉब्लेम नाही. पण सारखे पाहुणे आलेले चालणार नाही. "

" मी घरी बोलतो म्हणालो ना. आता पुरे ना प्रीती. "

दोघ घरी आले होते. घरात पसारा होता. आलेले पाहुणे नाना माई बोलत बसले होते. खूप कप बश्या पडल्या होत्या. दळणाचा डबा घेऊन प्रीती आत गेली. किचन मधली भांडी बघून प्रीती कंटाळली.

" ते लोक जेवायला आहेत. मी मदत करू का? " आशिष म्हणाला.

" काही नको. परत गावाकडे सगळया नातेवाईकांमध्ये जाहिरात होईल की मी तुझ्या कडून सगळे काम करून घेते. तुला घरगडी करून ठेवला आहे ." प्रीती रागात म्हणाली. तिने भाजी ओट्यावर ठेवली.

" मग आहेच मी जोरू का गुलाम. दे ती भाजी माईला निवडायला देतो. सगळे काम करतील तर पटकन होईल. " आशिष लाडीगोडी लावत म्हणाला.

प्रीती आज खूप थकली होती. त्यात हे दुप्पट काम. तिने कामवाल्या मावशींना फोन लावला. "या आता मी एक्स्ट्रा. पैसे देते."

त्या आल्या. भाडे घासून पोळ्या करुन गेल्या. तो पर्यंत प्रीती ऑफिसच्या कॉल मधे होती. तिने वरण भात भात लावला. दोन भाज्या केल्या. आशिष गोड घेवून आला.

"पाहुण्यांना आधी वाढ." माई म्हणाल्या.

"ते जमणार नाही. सगळ्यांनी बरोबर बसा. नुसत जेवणात दोन तीन तास मी घालवणार नाही. मला उद्या महत्वाची मीटिंग आहे. आटपा."

जेवण झाल. प्रीती आशिषच्या रूम मधे बायका झोपल्या. पुरुष नाना माईंच्या रूम मधे झोपले. नाना माई पुढच्या खोलीत होते. आशिष, प्रीती किचन मधे झोपले होते. प्रीती बर्‍यापैकी चिडली होती. आशिष तिच्याकडे बघत होता त्याने तिला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला. तिने झटका मारला. तो तिकडे तोंड करून झोपला.

सकाळी लवकर पाहुणे गेले. त्यांना आशिषने चहा केला. प्रीती आणि तो ऑफिस साठी निघाले.

"हे घर आहे की काही चेष्टा? ही धर्मशाळाच वाटते आहे. प्रत्येक आल्या गेलेला पाहुणा आपल्याकडेच उतरतो. मला ना आता या गोष्टीचा आता खूप कंटाळा आलेला आहे. हे आधीपासून होतं का? आत्ता सुरू झालं आहे? थोड्या पाहुण्यांना नाही सांगून द्यायचं." तिची चिडचिड सुरू होती.

ती तरी करेल काय? रोज कोणी ना कोणी असतंच. किती स्वयंपाक करणार. चहापाणी तर नेहमी सुरूच असतं. परत प्रायव्हसी मिळत नाही.

" आधी ही बर्‍याच वेळा पाहुणे येत असत. "आशिष म्हणाला.

" मला तर अस वाटत आहे माई मुद्दाम या पाहुण्यांना इकडे बोलवतात. "प्रीती म्हणाली.

"ती कशाला बोलवेल. आपण शहरात रहातो. इकडे कोणी कामासाठी आले की आपल्याकडे येतात. ते आपले नातेवाईक आहेत. आई-बाबांच्या जुन्या ओळखीचे आहेत. आपण पण गावाकडे गेलो की त्यांच्याकडे जातो ना म्हणून ते हक्काने आपल्याकडे येतात."आशिष म्हणाला.

" आई बाबा थोडी त्यांच्याकडे कडे रहायला जातात. "

" काय अस प्रीती. सोड ना आता. तस तू म्हणते ते बरोबर आहे. पण नाना माईंना कोण सांगेल. "

"ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो ते बोलायला हवं. माझ्या कडून एवढं काम होत नाही. परत खर्च दुप्पट होतो. एवढ असेल तर त्यांचं सगळं तुम्ही सगळे करत जा ना. नाहीतर त्या दिवशी बाईला सगळं काम द्यायचं. नेहमी सगळं काम मलाच देतात. मी यापुढे कोणी आलं तर काही करणार नाही." प्रीतीने स्पष्ट सांगितलं.

" बर ठीक आहे मी आईशी बोलतो. आता मूड बदल. संध्याकाळी मला उशीर होईल. "

" ठीक आहे. " तिला खूप राग आला होता. ती तिच्या जागेवर येवून बसली. थोड काम झालं. मीटिंग होती. त्याआधी तिची खूप धावपळ झाली. जे प्रेझेंटेशन तिला काल करायच होत ते पाहुण्यांमुळे जमलं नव्हतं. कसतरी तिने मॅनेज केल. रोज अस चालणार नाही. अस नेहमी झालं तर मला नोकरी सोडावी लागेल.

लंच ब्रेक मधे तिने तिच्या आईला फोन केला. ती खूप चिडली होती. "काय सासर मिळालं आहे. सारखे पाहुणे येतात. घर आहे की हॉटेल आहे समजत नाही आणि बाकीचे सगळे एका जागी बसून मस्त त्यांच्याशी बोलत असतात. मला सगळं काम पडतं. मी दिवस-रात्र स्वयंपाक घरात उभीच असते. प्रत्येकाच्या मागण्या पूर्ण करत असते. आई मला खूप कंटाळा आला आहे."

"तु चिडचिड करू नकोस. तुमच तुम्ही असतांना अस होत का? "

" नाही, तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. नाना, माई चांगले आहेत."

" मग पाहुणे आल्यावर प्रॉब्लेम होतो. "

" हो, आज तर माझ प्रेझेंटेशन ही तयार नव्हतं. "प्रीती म्हणाली.

" जास्त काम असल की कोणाची तरी मदत घेत जा. "

" पण नेहमीच इतक्या लोकांना बोलवायचं का? एखाद्या वेळी सांगून द्यायच ना मुलगा सून बिझी असतात. "

" हो ना असे येणारे पाहुणे नुसत स्वतः चा फायदा बघतात. आपल्याला गरज असल्यावर मदत ही करत नाही. "आई म्हणाली.

" हो ना आई. आमच्या घराच्यांना हेच समजत नाही. काल मी मावशींना बोलवलं होतं. आता अस कराव लागेल. पण दुप्पट खर्च होतो ग. "

" काय करणार काही बोलता येत नाही. "

" हो आई मी सांगितल आहे आशिषला. तो नाना माईंना समजावून सांगेल. बघू कितपत होत. "

ती संध्याकाळ घरी आली. माई भाजी निवडत होत्या.

तिने चहा ठेवला. लगेच स्वयंपाक केला. ती रूम मधे बसुन तीच काम करत होती. आशिष ऑफिस हून आला.

" काय सुरू आहे नाना माई ?"

"काय करणार टीव्ही बघतो आहे. तुझी बायको काही आमच्याशी जास्त बोलत नाही. " माई म्हणाल्या.

" काय झालं ती काही म्हणाली का?" आशिषला माहिती होत ती पाहुण्यांमुळे चिडलेली आहे.

"नाही पण घरात गप्प गप्प असते."

" अग उद्या ऑफिस मधे मोठी मीटिंग आहे. त्याच्या तयारी साठी मी उशीरा आलो. प्रीती घरून तयारी करते आहे. इतक तर समजून घ्या ना. ती ऑफिस मधे किती मोठ काम करते. तरी घरी साधी रहाते तुमच करत. आता ही तीच तिच्या टीम सोबत काम सुरू आहे."

" हो पण आम्ही ही दिवसभर एकटे असतो. थोड बोलावसं वाटत. " नाना म्हणाले.

" माझ्याशी बोला मी गप्पा मारतो. तुम्हाला काय दिवसभर कोणी ना कोणी तरी हव का बोलत बसायला. तुमच्या मुळे आम्हाला किती त्रास होतो. सारख कोणी ना कोणी आलेलं असत. चहा पाणी सुरूच. जरा कमी करा हे. तुमच्या कडून ही काम होत नाही. आम्ही दोघ ही बिझी असतो." आशिषने शेवटी विषय काढला.

" आशिष तू काय बोलतो आहेस? कोणी आलं तर बर वाटत आणि त्या लोकांच तरी तुम्ही कुठे नीट करता. प्रिति तोंड उतरवून काम करते. बाईला बोलवते. " माई म्हणाल्या.

"अरे मग ती थकते. ऑफिस घर दोघ सांभाळते."

" घर असल की येणारे जाणारे असणारच. "

" इतके? "आशिष चिडला होता.

" मी करत होते की इतके वर्ष. "माई म्हणाल्या.

"कोणी सांगितलं होत? एवढी ओळख करून ठेवायची गरज नव्हती. जरा आमचा ही विचार करा. या पुढे मला विचारल्या शिवाय कोणाला बोलवू नका. " आशिष म्हणाला.

" हे आमच घर आहे. आम्हाला हव ते आम्ही करू. " माई म्हणाल्या.

" ठीक आहे मग आम्ही आमची रहायची वेगळी सोय बघायची का?" आशिष म्हणाला.

"शांत व्हा चला जेवून घ्या. " प्रीती मधे पडली.

" तु मधे बोलू नकोस. तू याला शिकवते. " माई ओरडल्या.

" नाही हो आई, मी काही तक्रार केली नाही. फक्त पाहुणे कमी करा अस म्हटली. " प्रीती म्हणाली.

" बघितल तू इतक करते तरी यांना किंमत नाही. यापुढे आलेल्या पाहुण्यांच आपण काही करायच नाही. तुमच घर तुमचे पाहुणे तुमच तुम्ही बघा." आशिष रागाने आत गेला.

रागात जेवण झालं. दोघ रूम मधे आले .

" आशिष शांत हो. "

" मी शांत आहे. हे अस होत म्हणुन मी नाना माईंना काही बोलत नाही. पण त्यांना समजत नाही का. सारख आपल्याला बोलतात. " आशिष म्हणाला.

" पूर्वी असे पाहुणे येत नव्हते का? "

" येत होते आम्हाला किती डिस्टर्ब होत होतं. अभ्यासाला जागा नाही. आम्ही किती सांगायचो ते ऐकत नाहीत. आपलाही विचार करायला हवा. आता सहन होत नाही. "आशिष अजून चिडचिड करत होता.

दुसर्‍या दिवशी नेहा घरी आली. माई तिला सगळं सांगत होत्या." त्या प्रीतीच ऐकून आशिष आम्हाला दोघांना खूप फाडफाड बोलला. आता घर आहे तर पाहुणे येणारच. काय कराव अस आहे. त्याने तिला करून आणली. आपल्या पसंतीची असती बरोबर केल असत. "

" या पुढे अस बोलत जावू नकोस माई. प्रीती वहिनी किती हुशार आहे. किती पगार आहे तरी घरच सगळं करते. दादा बरोबर आहे. जरा आता आले गेलेले कमी करा. तुम्हाला ही आराम होत नाही. दादा वहिनी बिझी असतात. विचार बदल माई. करमत नसेल तर संध्याकाळी थोड फिरून येत जा. माझ्याकडे येत जा. "नेहा समजावत होती.

दोघांना राग आला होता. कधी दुसर्‍याच ऐकायची सवय नाही. आता मुलांपुढे काही चालत नव्हतं.

गावाहून लग्न पत्रिका आली.

" जूने संबंध आहेत. जाव लागेल. नाहीतर त्यांना राग येईल. " माई बोलत होत्या.

" कुठे उतरणार? " आशिषने विचारल.

" अण्णांकडे, ते नेहमी शहरात आले की आपल्याकडे उतरतात. नेहमी आम्हाला बोलवतात. त्यांना बघा आता काय करू काय नको अस होईल." माई म्हणाल्या.

" अस काही होणार नाही. सरळ आपल्या घरी जा. " आशिष म्हणाला.

" आपल घर कधीच बंद आहे. परत काहीच सामान नाही आम्ही अण्णांकडे जावू." नाना म्हणाले.

ते ऐकत नाहीत बघून आशिष काही म्हणाला नाही.

नाना, माई गावाला गेले. अण्णांकडे पाहुणे होते. त्यांनी विशेष उत्साह दाखवला नाही. हे दोघ उगीच आले अस त्यांना झाल होत . चहा पाणी झालं.

"तुमची उतरायची सोय कुठे आहे? " त्यांनी विचारलं. नाना माई समजले ते तिथून नानांच्या मित्राकडे आले. त्यांच घर लहान होतं. त्यामुळे त्यांनी त्यांना थांबा म्हटलं नाही.

नाना माई रिक्षात बसले.

"आता कुठे जायच? कोणालाच आपण आलेल नको आहे. काय लोक आहेत. " माई चिडल्या होत्या.

"आपल घर लहान आहे तरी आपण बरोबर एडजेस्ट करतो. प्रत्येकाच स्वागत करतो." नाना म्हणाले.

" हो ना कधीच कोणाला इथे राहू नका म्हटलं नाही. दरवेळी गावाला आलो की आपण आपल्या घरी उतरतो म्हणून या लोकांचा स्वभाव समजला नाही." माई ही नाराज होत्या.

"लोक कसे वागतात. स्वार्थी नुसते." नाना म्हणाले.

" आपल्याला ही असच पाहिजे यापुढे आशिष प्रीतीला त्रास होईल अस करायच नाही."

" हो बरोबर. "

हे लग्न घरी आले. तिथे गर्दीत त्यांना जमत नव्हतं. कस तरी एक दिवस राहिले. लग्न लागल्यावर लगेच घरी निघाले. आशिषने टॅक्सी बूक करून दिली होती. दोघ घरी आले.

संध्याकाळी आशिष, प्रीती घरी आले.

" कशी झाली ट्रीप?" आशिषने विचारल.

ते सगळं सांगत होते.

" आम्ही सांगतो ते तुम्हाला पटत नाही. घरच्यां पेक्षा बाकीचे लोक महत्वाचे वाटतात. बघितल लोकांना आपण एक दिवस ही नको असतो. तुम्ही त्यांच नेहमी करतात. आता तरी नाही म्हणायला शिका." आशिष बडबड करत होता. नाना, माई मुकाट्याने ऐकत होत्या.

"बरोबर आहे आशिष. आता तू म्हणशील ते करू. " नाना म्हणाले.

पुढच्या आठवड्यात अण्णांच फोन आला. ते हॉस्पिटल मध्ये येणार होते.

" तुम्ही कुठे उतरणार आहात? " नानांनी विचारल.

" तिकडे तुमच्याकडे. "

" नको. इकडे जमणार नाही. आम्ही तुम्हाला बाहेर भेटायला येतो. मुलाच लग्न झालं. सूनबाई मुलगा दोघ नोकरी करतात त्यांना त्रास नको. घर ही लहान आहे. " नाना म्हणाले.

"ठीक आहे नाना. "त्यांनी फोन ठेवला.

त्यांनी माईंकडे बघितलं.

"बरोबर केलं. स्वार्थी नुसते. आपल्याकडे बरे दोन दोन दिवस आरामात रहातात. आता अजिबात नाही." माई म्हणाल्या.

प्रीती आतून ऐकत होती. बर झालं लवकर समजल. विचार करत ती स्वयंपाकाला लागली.