दुखणं-2

दुखणं
तरीच म्हटलं...अगं काय आई तू..तिच्या येण्याने मूड खराब का करून घेतेस?"

"नाहीतर काय..बरं आत्या आली, तासभर बसली आणि गेली निघून, त्यात इतकं दिवसभर तोंड पाडून बसायला काय झालं??"
तिची बहीण म्हणाली..

दोघी बहिणी आईला समजवत होत्या..त्यांचं बोलणं असह्य झाल्यावर आई ओरडली,

"गप बसा गं मुलींनो...काही कळत नाही तुम्हाला, उगाच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं.."

असं म्हणत आई खोलीत निघून गेली. डॉक्टर मैत्रिणीने जेवून घेतलं आणि ती आईच्या खोलीत गेली.

"आई काय झालं काही सांगशील का?"

आई अजूनही विचारातच होती, अखेर आई आपल्या थोरल्या लेकीकडे मन मोकळं करू लागली.

"तुझी आत्या..तुझ्या बाबांची धाकली बहीण. तिच्या लग्नात तुझ्या बाबांनी निम्मी कमाई खर्ची घातली. त्यांच्या आई वडिलांच्या एक रुपया दिला नाही, का तर म्हणे मुलगा काय कामाचा. उतारवयात त्यांनी सगळी इस्टेट मुलीच्या नावे केली. हे सगळं मी मोठ्या मनाने सहन केलं. पण जेव्हा आपल्याला आर्थिक अडचण आली, तुझ्या शिक्षणाचा खर्च, बहिणीचा खर्च, नवीन घराचा खर्च आला तेव्हा तुझ्या बाबांनी तिच्याकडे मदत मागितली तर एक रुपया मिळणार नाही म्हणाली तुझी आत्या. तुझ्या बाबांनी ते हसत मान्य केलं, त्यांना नातं तुटायला नको होतं. एवढं करूनही आत्या दरवर्षी येऊन तिला हवं ते मागून घेऊन जाते..मला सांग मी काही कमी केलं का तिला? कधी अपमान केला का? पण त्यांना कळायला नको का की जरी आई वडिलांनी सगळी संपत्ती आपल्याला दिली असली तरी भावाला स्वतःहून देणं आपलं कर्तव्य आहे..इतकं करूनही नातेवाईकात तुझी आत्या माझा अपमान करते.. असं वाटतं चांगुलपणा दाखवून चुकीचं केलं मी.."

आईच्या जुन्या जखमा भलभळत होत्या. तोच त्रास आईला सतत होत होता. पण आज मुलीशी बोलून त्यांना बरं वाटलेलं, दुसऱ्या दिवशी आई ताजीतवानी दिसत होती.

डॉक्टर मैत्रिणीला यावरून काहीतरी जाणवलं, तिने तडक काजलला फोन लावला आणि म्हणाली,

"तुझ्या सासूबाईंना माझ्याकडे घेऊन ये.."

"अगं पण..."

"तू आण फक्त.."

काजल गाडी काढते आणि सासूबाईंना सांगते,

"आई, माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे, तिच्या हाताला गुण आहे खूप..तुम्ही चला माझ्यासोबत.."

सासूबाई लगेच तयार झाल्या आणि तिच्यासोबत गेल्या..

डॉक्टर मैत्रीण त्यांची वाटच बघत होती..त्या येताच तिने म्हटलं..

"या..या..बसा..मी कॉफी सांगते.."

"नको गं बाई, तू एवढी मोठी डॉक्टर, आमचा पाहुणचार केलास तर बाहेर पेशंट ताटकळत बसतील."

"मावशी काळजी करू नका.बाहेर पेशंट नाहीयेत, संध्याकाळी जास्त गर्दी असते, तुम्ही बसा निवांत.."

डॉक्टर मैत्रिणीने काजलला बाहेर जायला सांगितलं..

"थांबते की मी.."

"नाही, मी पेशंटच्या नातेवाईकांना आत थांबू देत नाही.." डॉक्टर मैत्रीण टेचात म्हणाली तसं काजलने तिला वाकुल्या दाखवल्या..

काजल बाहेर जाताच डॉक्टर मैत्रिणीने सासूबाईंना झोपायला लावलं. उगाच आपलं डोक्याला हात लाव, मनगटाला फिरवून बघ असे उद्योग तिने चालू केले जेणेकरून सासूबाईंना वाटायला हवं की खरंच ही काहीतरी चेक करतेय..

"या आता, खुर्चीवर बसा.."

डॉक्टर मैत्रिणीने त्यांना समोर बसवलं आणि म्हणाली,

"तुम्हाला मधेच काम करता करता थकवा येतो?"

"हो.."

"शरीर जड होतं आणि रात्री झोप येत नाही?"

"अगदी बरोबर.."

"मधेच रडू येतं... कुठेतरी निघून जावंसं वाटतं??"

"अगदी खरंय बाई..कोणत्याच डॉक्टरला कळलं नाही हे, तू खूप हुशार दिसतेस.."

🎭 Series Post

View all