दुखणं-3 अंतिम

दुखणं
"मावशी कारण मला कळलंय तुम्हाला काय झालं आहे ते.."

"काय झालं मला? काही गंभीर तर नाही ना?"

"नाही नाही..तुमच्या मेंदूत काही गुंता झालाय, तो औषधाने सुटेल लगेच."

"खरंच? म्हणजे मला बरं वाटेल ना?"

"100%.."

"देव करो अन तुझ्या तोंडात साखर पडो.."

"मावशी...तुमचे हात चेक केले मी..किती झिजलेत हो..फार कष्ट केलेले दिसताय तुम्ही.."

हे ऐकताच सासूबाईंना एकदम भरून आलं..

"काय सांगू बाई तुला..सासरी आले अन सासूने जात्यावर गहू दळायला बसवलं दिवसभर... दिराने शेतात राबवून घेतलं यापासून ते त्यांच्या मुलांना किती कष्टात वाढवलं हे सगळं मावशी सांगू लागल्या.."

तास उलटला, काजलचा कॉफीचा दुसरा कप संपला आणि तिने तिसऱ्यांदा कॉफी मागवली तेव्हा तो रामू तिरस्काराने तिच्याकडे बघू लागला..

"मावशी..अहो इतके पेशंट पाहिले मी पण तुमच्याइतके कष्ट कुणीच केले नसतील..पण तुमच्या कष्टांची जाणीव आहे का तुमच्या कुटुंबाला?"

डॉक्टर मैत्रिणीने त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आणि सासूबाईंनी पुढचा अजून एक तास त्यांचं जाणीवपुराण ऐकवलं..त्यात 20 मिनिटं काजलचे गाऱ्हाणे, 10 मिनिटे मुलांचे आणि उरलेला अर्धा तास नवऱ्याचे असे गाऱ्हाणे ऐकवले.."

काजलला आता असह्य झालं, ती न विचारताच आत आली..

"अजून किती वेळ?"

डॉक्टर मैत्रिणीला तिचा वैताग कळला, तिला म्हणाली..

"ये बस..झालंच आमचं..तर मावशी, या गोळ्या घ्या वेळेवर आणि पुढच्या पंधरा दिवसांनी परत या.."

काजल प्रश्नचिन्ह घेऊन सासूबाईंना घेऊन घरी गेली..

"काय केलंस गं माझ्या लाडक्या सासूला??" काजलने हळूच विचारलं,

"काही नाही...तू गोळ्या दे त्यांना फक्त.."

चार दिवसांनी काजलचा मैत्रिणीला फोन..

"मॅडम काय जादू केलीत हो तुम्ही सासूबाईंवर? अगदी ठणठणीत झाल्या गं सासूबाई..आणि रोज विचारताय, पंधरा दिवस झाले का..तुझ्या मैत्रिणीकडे जायचंय म्हणून.."

डॉक्टर मैत्रिणीचा निशाणा अगदी बरोबर लागलेला..पंधरा दिवसांनी काजल सासूबाईंना क्लिनिकमध्ये सोडून गेली आणि पूर्वानुभवावरून झालं की फोन करा असं सांगितलं.

डॉक्टर मैत्रिणीने परत चेक केलं, गोळ्या दिल्या आणि परत विषय सुरू केला..

"फार गुणी आहेत हो तुमची मुलं.. चांगले संस्कार केलेत तुम्ही.."

बस एवढं वाक्य ती म्हणाली अन सासूबाईंनी सगळा इतिहास कथन केला..

कसं त्यांनी मुलांना वळण लावली, तिच्या जावांचे मुलं कशी वाया गेली, त्यांच्या नणंदेने कसं तिच्या मुलींना सून करून घ्यायचा आग्रह धरला आणि त्यांनी कसा विरोध केला...अगदी सगळं..

"मावशी मानलं तुम्हाला, तुम्ही इतकं केलंत सर्वांसाठी आणि खंबीरपणे सर्वांसाठी उभ्या राहिलात.. तुमचं कुटुंब बघता दुसरी कुणी असती तर टिकली नसती हा.."

दोन तास झाले आणि काजल सासूबाईंना घ्यायला आली..तिला सासूबाईंच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती, वेगळाच आत्मविश्वास दिसत होता..

सासूबाईं आज स्वतःला शाबासकी देत थकत नव्हत्या..

काजलने अखेर डॉक्टर मैत्रिणीला फोन करून विचारलंच..

"काय खाऊ घातलंस गं माझ्या सासूला? तुझ्याकडे आल्यापासून घरात एकदम खुश राहायला लागल्या, आळशीपणा निघून गेला...सगळ्या कामात स्वतःहून पुढे होऊ लागल्या.."

मैत्रिणीने सांगितलं,

"काही आजार हे शरीरात नसतात तर मनात असतात...या वयातल्या बायकांनी खूप कष्टाने आपला संसार इथवर आणलेला असतो. या प्रवासात त्यांना असंख्य वेदना, असंख्य त्याग, मानसिक आणि भावनिक पिळवणूक, विश्वासघात आणि अपार कष्ट भोगलेले असतात..त्या सर्वांना पार करून त्या इथवर येतात तेव्हा त्यांना त्यांचा सांसारिक यशाचं कौतुक वाटतं..

पण ज्या आपल्या त्यागामुळे आणि कष्टामुळे संसार यशस्वी झाला त्या आपल्या कष्टाची आज कुणीच दखल घेत नाही हे त्यांचं दुखणं असतं..

आपण स्वतःचं मन मारून कित्येक तडजोडी केल्या त्या तडजोडीची किंमत कुणाला नाही हे त्यांचं दुखणं असतं..

जी गोष्ट आज त्यांचा मुलांना आणि सुनांना इतक्या सहजासहजी मिळते त्या गोष्टीसाठी आपल्याला किती झगडावं लागलं हे त्यांचं दुखणं असतं..

एवढं सगळं करून आपल्याला जर कुणी किंमत देत नसेल तर काय उपयोग त्या कष्टांचा? हे सततचे विचार हेच त्यांचं दुखणं असतं...

त्यांची व्यथा आतल्या आत कोंडली गेली की पडसाद शरीरावर उमटतात, व्यथा बाहेर निघाली की मोकळं वाटतं त्यांना आणि आजार पळतात..

"अगं बाई...किती गहन विचार केलास तू..माझ्या डोक्यात हे कधी आलंच नसतं, आणि गोळ्या कसल्या दिल्या तू त्यांना?"

"साध्या व्हिटॅमिन्स च्या आहेत.."

"अरे देवा..त्या म्हणताय की त्या गोळ्यांमुळे त्यांचं दुखणं थांबलं... आता तुझ्याशिवाय कुठेच कोणत्याच डॉक्टरकडे जाणार नाही असं म्हणताय...वा रे डेंटिस्ट..!"

डॉक्टर मैत्रीण हसू लागली...तेवढ्यात दोन बायका नॉक करून आत आल्या,

"मॅडम, या माझ्या सासूबाई... याना सेम त्या काजलच्या सासूबाईंसारखा त्रास होतोय, त्या म्हणाल्या की याचा गुण फक्त तुमच्याकडेच लागतो.."

मैत्रिणीने डोक्यावर हात मारून घेतला..

तिची असिस्टंट हातात एका हातात ड्रिल घेऊन दुसऱ्या हाताने डोकं खाजवत बसली...

समाप्त

🎭 Series Post

View all